अखंड चैतन्यमयी जगणे आपल्या वाट्याला यावे असे प्रत्येकालाच वाटते. दिवाळीचा हा सण या भावनेची जाणीव करून देणारा. माजघरापासून दारावरचा प्रत्येक कोपरा न् कोपरा पणतीने उजळून निघतो आणि मनातल्या सांदीकोपऱ्यात दडलेल्या अंधारालाही दूर लोटल्याचा भास घडवून आणतो. दीपावलीचे हेच वैशिष्ट्य असल्याने सणांचा राजा म्हणून याकडे पाहिले जाते. बाहेर पेटलेल्या छोट्याशा दिव्याची ज्योत कुठेतरी खोल अंतमर्नात जागल्याची आठवण करून देते आणि हे आयुष्य दुसऱ्याला प्रकाश देण्यासाठी जगावं, ही स्वाभाविक जाणीवही करून देते. दर वर्षी येणारी ही दिवाळी नवे काहीतरी शिकवून जातेच. हल्लीच्या शहरी कोलाहलात शिरशिऱ्या थंडीचा अनुभव देणारी दिवाळी हरवत चालली आहे. ही खंत असली तरी आनंदाची प्रक्रिया मात्र तशीच आहे. त्यामुळे कितीही व्यापारी वृत्ती या सणात घुसल्या तरी दिवाळीचा आनंद आजपावेतो कमी झालेला नाही. किंबहुना तो दर वर्षी वाढताना दिसतो आहे. यंदाची दिवाळी तशी उशिराच सुरू झाली. महाराष्ट्रात निवडणुका होत्या. त्याआधी सहा महिने केंद्रातील निवडणुका पार पडल्या. दोन्ही ठिकाणी मतदारांनी सत्तांतराच्या बाजूने कौल दिला. केंद्रात भाजपाने स्वबळावर सत्ता स्थापन केली. त्याच वेळी राज्यातही भाजपाचा विजयोत्सवी किल्ला बांधण्याचे काम सुरू आहे. मंत्रालयावरचा हा किल्ला बांधण्यासाठी शिवसेनेच्या मावळ्यांची गरज लागणार की नाही, हेही अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण यंदाची दिवाळी राज्यातही भाजपाचीच होती, हेही मतदारांनी स्पष्ट केले. सत्तांतराचा हा आनंद घेताना तो निर्भेळ नाही याची जाणीवही महाराष्ट्राने करून दिली आहे. एक प्रकारे ही विजयाची दिवाळी साजरी करताना वास्तवाचे भानही ठेवा, असा संदेश मराठी जनाने दिला. खरेतर प्रकाशाचे नाते हे थेट आत्म्याशी जोडले आहे, असे म्हणतात. त्यामुळे बाह्यरंगाच्या दीपोत्सवाबरोबरच अंतर्मनातल्या दिवाळीलाही तितकेच महत्त्व आहे. दिवाळीत आपण रांगोळ्यांनीही परिसर सजवितो. ठिपक्यांना जोडून जशी सुबक, सुंदर रांगोळी तयार होते, तशीच समाजाचीही रचना असते. माणसा-माणसांना जोडत मानवी साखळीची, सुहृदयांची एक अनोखी समाजरांगोळी तयार होते. माणसांना जोडण्याचा, त्यांना सोबत घेण्याचा आनंद प्रकाशाइतकाच अनोखा असतो. समाजातल्या सर्व घटकांना मग ते कुुुणी वंचित, अपंग, दुर्लक्षित अशा कितीतरी जणांना दिवाळीमुळे आपण मुख्य प्रवाहात आल्याचा आनंद होतो. अलीकडे काही सेलिब्रिटी कर्करुग्णांसोबत, अंधासोबत, वृद्धांसोबत दिवाळी साजरी करताना दाखविले जातात. त्यात प्रसिद्धीचा सोस असला तरी त्यानिमित्ताने वंचितवर्गाला काही क्षणांचा का होईना दिलासा मिळतो हेही तितकेच खरे. यंदा भारतीय शास्त्रज्ञांनी मंगळावर झेप घेत दिवाळीचा देशाभिमानाचा प्रकाशमयी आनंद याआधीच मिळवून दिला आहे. सर्वांत कमी खर्चात मंगळावर झेपावणारे पहिले यान भारतीयांनी तयार केले. त्यामुळे सातत्याने यशासाठी, प्रगतीसाठी अमेरिकेकडे रांग लावणाऱ्या तरुणांना ही बुद्धिमंतांची भूमी वाटायला लागली आहे. नवे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सियाचीनमध्ये सीमेवर असलेल्या जवानांसोबत दिवाळी साजरी करीत नवा संदेश देण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी पूरग्रस्त काश्मीरवासीयांसोबतही त्यांनी वेळ घालविला. सध्या पाकिस्तानी कुरापती वाढल्या असताना पंतप्रधानांची ही चाल सीमेवरील जवानांसाठी नक्कीच प्रेरणादायी असणार आहे. राजकीयदृष्ट्या हे वर्ष वळणाचे ठरले. त्यामुळे नव्या वर्षाकडून लोकांच्या खूप अपेक्षा आहेत आणि असणारही. दिवाळी जरी वर्षातून एकदा येत असली तरी दररोज आपल्या आयुष्यात दिवाळी असावी, अशी स्वाभाविक इच्छा असते. दिव्यांची माळ तयार होताना त्याचा प्रकाश सर्वदूर पसरायला हवा व सर्वसमानतेची दिवाळी प्रत्येकाच्या वाट्याला यायला हवी. अशी धारणा बाळगायला हवी; तरच दिवाळी साजरी केल्याचे समाधान लाभेल. इसिस आणि इबोला ही अतिरेकी आणि अनारोग्याची संकटे यंदा मानवतेवर आली आहेत. यंदा दिवाळीच्या निमित्ताने जगभर सुख-समृद्धीची संवेदना व्यक्त करतानाच अशा संकटांपासून लवकर सुटका होऊ दे, अशी प्रार्थना करावी लागणार आहे. अतिरेकी संकटे वाढल्याने ऐन दिवाळीत चोवीस तास खडा पहारा देणाऱ्या पोलिसांनाही सलाम ठोकला पाहिजे. आपण कुटुंबात दिवाळी साजरी करताना पोलीस असो वा सीमेवरचे जवान, त्यांची आठवण मनात साठवीत आनंद घ्यायला हवा. दीपावलीची शिकवणही तीच आहे. तोच आनंद, तेच परमार्थ, तेच सत्कर्म तोचि दिवाळी, दसरा... मनामनांतला, जनाजनांतला...
आनंद पसरूदे
By admin | Updated: October 24, 2014 03:04 IST