शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
2
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
3
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
4
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
5
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
6
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
7
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
8
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
9
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
10
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
11
सेंट जॉर्जेसला लिव्हर ट्रान्सप्लांटचा परवाना; रुग्णालयातील डॉक्टरांना शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण
12
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
13
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
14
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
15
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
16
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
17
"नोटांनी भरलेली बॅग मी आल्याबरोबर कपाटात..."; खळबळ उडवणाऱ्या व्हिडीओवर संजय शिरसाटांनी सोडलं मौन
18
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
19
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध
20
“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार

‘मान्सूनचा पॅटर्न’ खरोखरच बदलला आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 08:42 IST

ऋतू बदलतात ते हवामानामुळे नव्हे. ऋतुचक्र आहे तसेच आहे. भारतीयांचे भविष्य मान्सूनशी जोडलेले आहे आणि ते निराशाजनक नाही, तर उज्ज्वल आहे.

डॉ. रंजन केळकर, निवृत्त महासंचालक, भारतीय हवामानशास्त्र विभाग

हल्ली अशी एक मानसिकता आहे की, निसर्गात, आकाशात, वातावरणात काही तरी विपरीत घडत आहे. टीव्हीवरील ब्रेकिंग न्यूज अनेकदा या भावनेला दुजोरा देणाऱ्या असतात. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात महाप्रलय होणार, वर्षभराचा पाऊस एका रात्रीत पडला, मान्सून इतक्या लवकर कधीच आला नव्हता, वगैरे. लोकांची दुसरी एक विचारसरणी आहे की, त्यांनी आखलेल्या चौकटीत निसर्गाने बसले पाहिजे. बहुतेक नैसर्गिक प्रक्रिया पद्धतशीरपणे आणि वेळेनुसार घडत असतात. मात्र, त्यात लष्करी शिस्तबद्धता असावी, ही अपेक्षा करणे हा एक विचित्र अट्टाहास आहे. निसर्गाने स्वतःच्या हालचालींसाठी पुष्कळ मुभा राखलेली आहे. त्याशिवाय निसर्गाने अनेक रहस्ये झाकून ठेवलेली आहेत, ज्यांचा उलगडा अजून व्हायचा आहे.

हवामान बदलाची चर्चा जगभर सातत्याने होत असताना मान्सूनच्या भवितव्याची चिंता भारतीय जनतेला वाटणे साहजिक आहे. दररोज प्रकाशित होत असलेले नवनवीन वैज्ञानिक निष्कर्ष आणि बातम्या या चिंतेत भर घालत आहेत. म्हणून ‘मान्सूनचा पॅटर्न खरोखरच बदलला आहे का?’ या प्रश्नाचे उत्तर शोधणे गरजेचे आहे. 

मागील सात-आठ वर्षांत देशात भीषण दुष्काळ पडला होता का? - नाही, मान्सून सामान्य राहिला होता. अलीकडच्या काळात देशाचे अन्नधान्य उत्पादन घटले आहे का ? - नाही, उलट ते वाढले आहे. असे आठवते का की, एकदा मान्सून आलाच नाही? - नाही. तो तर दर वर्षी न चुकता येतोच येतो. मान्सूनने त्याचा मार्ग बदलला आहे का?, तो कधी केरळऐवजी राजधानी दिल्लीत हजर झाला आहे का? - नाही. आपल्याला आश्वस्त करणारी गोष्ट ही आहे की, मान्सूनचा मूलभूत पॅटर्न होता तसाच आहे, तरीही.. 

‘बदले बदले मेरे सरकार नजर आते हैं,वो जो बदले तो जमाने की हवा भी बदली।’ 

या ‘चौदवी का चांद’ चित्रपटातल्या गीताप्रमाणे सर्वांना असे वाटत आहे की, मान्सून काहीसा बदलला आहे, आणि ते चुकीचे नाही. 

मान्सूनमध्ये महत्त्वाचा असा जो एकमात्र बदल होत आहे तो हा की, पावसाळ्यातील अतिवृष्टीच्या घटना वाढत आहेत. याचे कारण हे आहे की, वैश्विक तापमानवाढीमुळे हवेची बाष्प धारण करण्याची क्षमता बळावली आहे. त्यामुळे मान्सूनच्या हलक्या, रिमझिम सरींऐवजी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता वाढली आहे. थोड्या वेळात पडणाऱ्या प्रचंड पावसाला ढगफुटी हे नवे नावही मिळाले आहे. दुसरा एक बदल लोकांना जाणवत आहे की, नैऋत्य मान्सूनच्या आगमनाच्या आणि परतीच्या तारखा बदलत आहेत. काही म्हणतात की, ऋतुचक्र बदलले आहे. खरे पाहिले तर हा हवामान बदल नाही. मान्सून दर वर्षी आपले एक नवे रूप घेऊन येत असतो. कधी तो लवकर येतो, जसे यंदा आपण पाहत आहोत, कधी तो उशीर करतो, कधी रेंगाळतो. पण, हे बदल कायमचे नसतात आणि ते सीमित असतात.

अतिवृष्टी मान्सूनमधली असो किंवा इतर महिन्यातली असो, तिचे तीन प्रमुख दुष्परिणाम घडून येतात : शहरी पूर, भूस्खलन आणि शेतीचे नुकसान. आपण हे समजून घेणे गरजेचे आहे की, हे दुष्परिणाम बऱ्याच अंशी मानवनिर्मित असतात. शहरी लोकसंख्या सातत्याने वाढत गेली आहे, पण त्या मानाने पाण्याचा निचरा करणाऱ्या प्रणालींचा विकास झालेला नाही. डांबरी रस्त्यांवर पावसाचे पाणी साचते, ते वाहून जायची सोय नसते आणि थोड्याच वेळात शहरात पूरपरिस्थिती निर्माण होते. एरवी कोरड्या असलेल्या नद्या दूरवर झालेल्या ढगफुटीमुळे अचानक तुडुंब वाहू लागतात, तेव्हा अवैधपणे नदीच्या पात्रात बांधलेली घरे कोसळतात आणि लोक दगावतात. 

या सर्व गोष्टींसाठी मान्सूनला जबाबदार धरणे बरोबर नाही. भूस्खलनाचेही तसेच आहे. जर एखाद्या जागी लागोपाठ काही दिवस पाऊस पडत राहिला, तर जमीन खोलपर्यंत ओली होऊन घसरू शकते. डोंगराच्या कड्यावर हा धोका सर्वाधिक असतो आणि नेमके तेथेच लोक घरे बांधतात किंवा झोपडपट्ट्या उभारतात आणि प्राण गमावतात. येथेही मान्सून दोषी नसतो. अतिवृष्टीचा तिसरा विपरीत परिणाम होतो तो शेतीवर, म्हणजे उभ्या पिकांवर. शेतामधून पाणी वाहून जायला वाट नसली, तर पिकांचे नुकसान अपरिहार्य आहे. स्थानिक हवामानाशी सुसंगत असलेली आणि जोरदार पावसात टिकून राहणारी पिके निवडणे अगत्याचे आहे. 

सारांश, मान्सूनचे मूळ स्वरूप होते तसेच आहे, त्यात आमूलाग्र बदल झालेला नाही आणि होण्याचे संकेत नाहीत. ऋतुचक्र आहे तसेच आहे. ऋतू बदलतात ते पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यामुळे, हवामानामुळे नाही. हवामान बदलामुळे काय होऊ शकते, हे समजून घेऊन आपण खबरदारीचे उपाय करू शकतो. राजकवी भा. रा. तांबे यांनी शंभर वर्षांपूर्वी लिहिले होते, 

‘असेच वारे पुढे वाहतील, मेघ वर्षतील, शेते पिकतील, गर्वाने या नद्या वाहतील...’ 

भारतीयांचे भविष्य मान्सूनशी जोडलेले आहे आणि ते निराशाजनक नाही, तर उज्ज्वल आहे. 

टॅग्स :monsoonमोसमी पाऊसRainपाऊस