शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
2
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
3
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
4
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
5
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
6
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
7
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
8
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
9
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
10
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
11
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
12
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
13
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
14
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
15
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
16
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
17
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
19
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
20
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!

गणराज्यदिनाच्या शुभेच्छा !

By admin | Updated: January 25, 2017 23:32 IST

आज देश आपला ६७ वा गणराज्य दिन साजरा करीत आहे. सांसदीय लोकशाही, संघराज्य पद्धती, नागरी अधिकार आणि न्यायव्यवस्थेचे स्वायत्तपण ही घटनेची प्रमुख वैशिष्ट्ये

आज देश आपला ६७ वा गणराज्य दिन साजरा करीत आहे. सांसदीय लोकशाही, संघराज्य पद्धती, नागरी अधिकार आणि न्यायव्यवस्थेचे स्वायत्तपण ही घटनेची प्रमुख वैशिष्ट्ये त्यात आजवर सुरक्षित राहिली आहेत. लोकसंख्या वाढली; पण देशाचे सर्व क्षेत्रातील उत्पन्नही त्या प्रमाणात वाढले आहे. देशात आजवर चौदा पंतप्रधान मिळाले. त्यात नियमितपणे निवडणुका झाल्या आणि लोकांचा लोकशाहीवरचा विश्वासही वाढता राहिला. सांसदीय लोकशाही वा राज्यघटना हे आता देशाच्या चिंतेचे विषय राहिले नाहीत. आताच्या काळजीचे विषय देशात वाढणारी विषमता आणि जनमानसात वाढत चाललेली धर्मांधता आणि जातीयता हे आहेत. विषमता ही सगळ्या सामाजिक अस्वस्थतांना जन्म देणारी बाब असली तरी देशाचे राजकारण व त्याचे नेतृत्व त्याविषयी फारसा विचार करताना अजून दिसत नसणे ही आताच्या चिंतेची महत्त्वाची बाब आहे. १९२९ मध्ये तेव्हाचे व्हाईसरॉय लॉर्ड इर्विन यांना लिहिलेल्या पत्रात गांधीजी म्हणाले, ‘‘तुमचे मासिक वेतन २१ हजार रुपये म्हणजेच दिवसाकाठी ७०० रुपये आहे तर देशातील सामान्य माणसाचे दैनिक मिळकत दोन आणे आहेत. तुमचे वेतन येथील सामान्य माणसांच्या मिळकतीहून २५ हजार पटींनी मोठे आहे. तिकडे तुमच्या इंग्लंडमध्ये पंतप्रधानांना मिळणारे वेतन सामान्य नागरिकांच्या मिळकतीहून ९० पटींनी अधिक आहे. आमची ही लूट तुम्ही कधी थांबविणार आहात.’’ इर्विन यांनी गांधीजींच्या या पत्राला व प्रश्नाला उत्तर दिले नाही. देशाची आजची स्थितीही गांधीजींनी वर्णन केलेल्या स्थितीहून फारशी वेगळी नाही. आज भारताच्या एक टक्के लोकांजवळ देशाची ५८ टक्के संपत्ती एकवटली आहे, तर उरलेल्या ९९ टक्के लोकांजवळ फक्त ४२ टक्के संपत्ती वितरित, पण असमान स्वरूपात आहे. आपण एका अस्वस्थ ज्वालामुखीवर बसलो आहोत या वास्तवाची दखल आपल्या राजकारणाने व समाजकारणाने तात्काळ घेण्याची गरज आहे. देशाची लोकसंख्या १३० कोटींच्या घरात गेली असून, तीत २६ कोटी लोक अल्पसंख्य या वर्गात जमा होणारे आहेत. एक कोटीहून कमी लोकसंख्या असणाऱ्या जगातील देशांची संख्या १००हून अधिक आहे. ही बाब लक्षात घेतली की या देशात अल्पसंख्यकांना राष्ट्रीय प्रवाहात सोबत घेण्याची गरजही साऱ्यांना कळणारी आहे. दुर्दैव याचे की देशातल्या या मोठ्या वर्गाला डिवचण्याचे, चिडविण्याचे व तिच्यावर नको तसे हल्ले करण्याचे उद्योग देशाच्या सत्ताधाऱ्यांकडूनच होताना आता दिसत आहेत. देश साऱ्यांना आपला वाटावा व त्यात एकात्मता नांदावी म्हणून राज्यघटनेने सेक्युलॅरिझमचा (सर्व धर्मसमभावाचा) स्वीकार केला आहे. मात्र आजचे सत्ताधारी त्याच पवित्र भावनेची टवाळी करण्यात व बहुसंख्याकवादाचा उदो उदो करण्यात दंग आहे. जगात सुरू असलेल्या धार्मिक हिंसाचाराची जराही दखल नसण्याची व आपल्याच गुर्मीत मस्त राहण्याची ही मानसिकता बदलणे हे समाजधुरिणांएवढेच राजकारणाच्या नेत्यांचेही काम आहे. समाजाच्या दुभंगावर आपले राजकारण उभे करण्याचा प्रयत्न करणारे त्यातले काही पुढारी व पक्ष पाहिले की आपल्या लोकशाहीने ६७ वर्षात आम्हाला फारसे काही शिकविले नसावे असेच मनात येते. येथे अजून शेतकरी आत्महत्त्या करतात आणि बेकारांची टक्केवारी कमी होतांना दिसत नाही. गरिबांची गरिबी दूर करणे दूर, त्या साऱ्यांना ‘‘कॅशलेस’’ करण्याच्या ध्यासाने सरकारला ग्रासले आहे. देशात आंतरराष्ट्रीय दर्जाची एकही शिक्षण संस्था वा विद्यापीठ एवढ्या काळात उभे राहिले नाही. इंदिरा गांधींच्या काळापर्यंत भारत हा जगातील १४०हून अधिक देशांच्या ‘नाम’ या संघटनेचा नेता होता. आज या संघटनेचे नाम वा निशाण फारसे कुठे दिसत नाही. एकेकाळी देशाचे शेजार संबंध चांगले होते. रशियाशी मैत्री होती आणि अमेरिकेशी सख्य होते. पाकिस्तान व चीन हे दोन देश वगळता तेव्हा देशाला साऱ्या जगासह शेजारच्या प्रदेशातही विश्वासू मित्र होते. आज रशिया पाकिस्तानसोबत भारताच्या काश्मीर या भूमीवर संयुक्त लष्करी कवायती करतो आणि चीन नेपाळच्या सैनिकांना आधुनिक शस्त्रांबाबतचे प्रशिक्षण देतो. अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकिर्दीत भारताचे अमेरिकेशी असलेले संबंधही प्रश्नांकीत झाले आहे. बांगला देश, म्यानमार व श्रीलंका यासारखे जवळचे देशही भारताशी हातचे राखून संबंध ठेवणारे आहेत. वाढता विकासदर, औद्योगिकरणाचा विस्तार आणि तंत्रविज्ञानाच्या क्षेत्रातील प्रगती ही आपल्या वाटचालीची एक चांगली दिशा असताना बाकीच्या दिशा अशा अंधारलेल्या असणे हीच खरी देशासमोरची समस्या आहे. आजचा गणराज्यदिन या संदर्भात देशाच्या उभारणीचे नवे संकल्प सुचविणारा, त्याला नव्या प्रतिज्ञा घ्यायला सांगणारा आणि आपल्यातले दोष व संकुचितपण दाखवून त्याला राष्ट्रीय एकात्मतेच्या दिशेने नवी वाटचाल करायला शिकविणारा ठरावा. भारतीय राज्यघटना, तिचे निर्माते, स्वातंत्रलढ्याचे असामान्य नेतृत्व आणि देशाचा तेजस्वी इतिहास या साऱ्यांची आपल्याकडून ही अपेक्षा आहे. या अपेक्षेची पूर्तता करण्याचे बळ गणराज्यदिनाच्या आजच्या मुहूर्ताने आपल्या साऱ्यांना द्यावे ही शुभेच्छा.