शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

गुरू नानकांची शिकवण जागतिक गरजेची

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 04:54 IST

गुरू नानकदेव यांची ५५० वी जयंती साजरी केली जात असताना जगभरात शांतता, समानता व समृद्धी नांदावी यासाठी त्यांचे विचार आणि शिकवण आज पूर्वीहून अधिक समर्पक ठरणारी आहे.

- एम. व्यंकय्या नायडूमहान आध्यात्मिक नेते गुरू नानकदेव यांची ५५० वी जयंती साजरी केली जात असताना जगभरात शांतता, समानता व समृद्धी नांदावी यासाठी त्यांचे विचार आणि शिकवण आज पूर्वीहून अधिक समर्पक ठरणारी आहे. संकुचित दृष्टी, कट्टरता आणि वैचारिक खुजेपणाने जग अधिकाधिक विखुरले जात असताना व्यक्ती, समाज आणि देशांना व्यापून टाकणारा अंध:कार दूर करण्यासाठी आपल्याला गुरू नानकदेव व इतर आदर्श गुरूंनी दाखविलेल्या मार्गाचे अनुकरण करणे गरजेचे आहे. गुरू नानकदेवजी यांच्यासारख्या सिद्ध पुरुषांच्या कालातीत संदेशांनी आपली दृष्टी सतत विस्तारत गेली आहे.सर्वसामान्य माणूस जे पाहू शकत नाहीत ते गुरू नानकदेव यांच्यासारखे द्रष्टे पाहू शकतात. ते त्यांच्या अंतर्ज्ञानाने व विचाराने लोकांचे जीवन समृद्ध करतात. ‘गुरू’ या शब्दाचा खरा अर्थच तो आहे. जो प्रकाश दाखवितो, शंकांचे निरसन करतो व योग्य मार्ग दाखवितो तोच खरा गुरू. आपण आयुष्यात काहीही करत असलो तरी आपल्यापैकी प्रत्येकाला गुरू नानकदेव यांच्यासारख्या थोर व्यक्तीपासून खूप काही शिकण्यासारखे आहे.गुरू नानकदेव समानतेचे खंदे समर्थक होते. जात-पात, धर्म आणि भाषा यावर आधारित भेदाभेद व स्वतंत्र ओळख त्यांच्या दृष्टीने पूर्णपणे गैरलागू होते. जात व उच्चनीचता विरहित समाजाची स्थापना हे त्यांचे उद्दिष्ट होते. महिलांचा सन्मान व लैंगिक समानता ही गुरू नानकदेव यांच्याकडून घेण्याची आणखी एक महत्त्वाची शिकवण आहे. गुरू नानकदेव म्हणायचे, जी स्त्री पुरुषाला जन्म देते ती हलक्या दर्जाची कशी असू शकते? स्त्री व पुरुष या दोघांवर परमेश्वराची सारखीच कृपा असते व दोघांना आपल्या कृत्यांचा विधात्याकडे सारखाच जाब द्यावा लागतो. त्यांच्या दृष्टीने परमेश्वर हाच सर्व जगाचा निर्माता आहे व सर्व माणसे समान म्हणूनच जन्माला येतात. त्यांच्या सर्वच काव्यरचनांमध्ये सहजीवन आणि सर्वांनी समन्वितपणे काम करण्याचा धागा कायम दिसून येतो.‘वसुधैव कुटुंबकम’ या संस्कृत वचनाला अनुसरून गुरू नानकदेव यांनीही गुरुमुखीमध्ये एक कवन केले आहे. त्याचा मराठीत भावार्थ असा आहे : जेव्हा तो ‘माझे’ व ‘तुझे’ असा विचार करणे बंद करतो तेव्हा त्याचा कोणालाच राग येत नाही. पण जेव्हा तो फक्त माझे आणि माझे यालाच चिकटून राहतो तेव्हा तो मोठ्या संकटात सापडतो. मात्र जेव्हा विधात्याची ओळखपटते तेव्हा त्याला सर्व क्लेषांंपासून मुक्ती मिळते.

गुरू नानकदेव यांच्या बाबतीत आणखी एक लक्षणीय बाब अशी की, त्यांनी शीख धर्माचे केवळ तात्त्विक सिद्धांत सांगितले नाहीत तर ते व्यवहारात, आचरणात आणले जातील याचीही व्यवस्था केली. ‘लंगर’ हे समानतेच्या तत्त्वाचे व्यवहारी रूप आहे. या ‘लंगर’मध्ये सर्व जाती-पातींचे, धर्मांचे व प्रदेशांतील भाविक एका पंगतीत बसून सामायिक भोजन करतात. असे भाविक जेथे जमतात त्याला पवित्र ‘धर्मस्थळ’ म्हटले जाते आणि असा धार्मिक मेळावा ‘संगत’ म्हणून ओळखला जातो. गुरू नानकदेव हिंदू व मुसलमान यांच्यात भेद मानत नसत हेच यावरून दिसते. त्यांच्या लेखी कोणताही देश परदेश नव्हता व कोणतेही लोक परके नव्हते. गुरू नानकदेव यांनी १६ व्या शतकात आंतरधर्मीय संवादाला सुरुवात केली आणि त्या वेळच्या बव्हंशी धर्मांच्या धुरिणांशी त्यांनी चर्चा केलेली होती. शांतता, स्थैर्य व सहकार्याला बळ मिळेल यासाठी विचारांची आदानप्रदान व अर्थपूर्ण संवाद साधू शकणाऱ्या त्यांच्यासारख्या आध्यात्मिक नेत्यांची जगाला गरज आहे. गुरू नानक यांची दृष्टी व्यवहार्य आणि समग्र होती. त्यांची दृष्टी सर्वसंग परित्यागाची नव्हे तर सक्रिय सहभागाची होती. तपस्वी आणि संन्यासी या दोघांच्या मधला गृहस्थाश्रमाचा मार्ग निवडला. तो मार्ग आदर्शही होता. कारण त्यामुळे व्यक्तीच्या सामाजिक, ऐहिक व आध्यात्मिक उन्नतीची संधी उपलब्ध होते. त्यांनी आपल्या अनुयायांना काम करा, भक्ती करा आणि वाटून घ्या हे ध्येय शिकविले. प्रामाणिक कष्ट करून कमवा व होणारी कमाई गरजूंनाही वाटून द्या, असा त्यांचा आग्रह असायचा. प्रत्येकाने आपल्या संपत्तीचा दहावा भाग गरजूंसाठी खर्च करावा, असे त्यांनी सुचविले होते. ही कल्पना त्यांनी ‘दशवंध’ म्हणून मांडली. विविध धर्म व आध्यात्मिक परंपरांमधील उत्तम गोष्टींचा मिलाफ करणारे अलौकिक संतपुरुष, अशी गुरू नानकदेव यांची ओळख सांगणे चपखल ठरेल.
भारतातील पंजाबमधील डेरा बाबा नानक साहिब व पाकिस्तानमधील कर्तारपूर येथील गुरुद्वारा दरबार साहिब यांना थेट जोडणारी रस्ता मार्गिका सुरळीतपणे सुरू झाली याचा मला आनंद वाटतो. या कर्तारपूरमध्ये गुरू नानकदेव यांचे आयुष्याची शेवटची १८ वर्षे वास्तव्य होते. या मार्गिकेमुळे भारतातील शीख भाविकांची गुरुद्वारा दरबार साहिबला विनासायास जाण्याची सोय झाली आहे.गुरू नानकदेव यांनी त्यांच्या कृती व उक्तीतून जो सार्वकालिक संदेश दिला तो पाच शतकांपूर्वीएवढाच आजही उपयुक्त आहे. आपण त्यांचा हा संदेश आत्मसात करून व दैनंदिन जीवनात प्रत्यक्षात आचरणात आणून त्यानुसार आपले वागणे-बोलणे सुधारले तर जगात शांतता व शाश्वत विकासाच्या नव्या युगाला आपण नक्कीच गवसणी घालू शकू.(उपराष्ट्रपती)