गोव्याचे पर्यटन अनिश्चिततेच्या विळख्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2019 01:43 AM2019-10-08T01:43:25+5:302019-10-08T01:44:28+5:30

किनाऱ्यांवर भरती रेषेला खेटून उभे असणारे ‘शॅक’ हे गोव्यातील पर्यटनातले एक प्रमुख आकर्षण.

Goa's tourism is a well-known uncertainty | गोव्याचे पर्यटन अनिश्चिततेच्या विळख्यात

गोव्याचे पर्यटन अनिश्चिततेच्या विळख्यात

Next

- अनंत साळकर  - सहाय्यक संंपादक (वृत्त)

पर्यटन हा गोव्याच्या अर्थव्यवस्थेला आकार देणारा सर्वात मोठा उद्योग अनिश्चिततेच्या लाटेत हेलकावे खाऊ लागला आहे. गुंतवणुकीचे स्वागत करण्याच्या नादात कायदे आणि नियम धाब्यावर बसवणाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण स्वीकारल्याचे दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत. त्यातच काही अपेक्षित तर काही अकल्पित घटनांनी या क्षेत्रातील उद्योजक हवालदिल झाले आहेत.

किनाऱ्यांवर भरती रेषेला खेटून उभे असणारे ‘शॅक’ हे गोव्यातील पर्यटनातले एक प्रमुख आकर्षण. या तात्पुरत्या आहारगृहांतून पर्यटकांची खाण्यापिण्याची सोय व्हायची आणि स्थानिकांना रोजगार मिळायचा. मात्र पर्यटन मौसम सुरू होण्याच्या सप्ताहभर आधी राष्ट्रीय हरित लवादाने शॅक उभारणीवर बंदी घातलीे. किनारपट्टी नियमनाचा आराखडा वेळेत सादर करण्यास गोवा सरकारला आलेले अपयश हे या बंदीमागचे प्रमुख कारण. असा आराखडा तयार करणारी यंत्रणा आपल्याकडे नसल्याचे कारण देत सरकारने चेन्नईतील एका खासगी संस्थेस ते काम दिले. सरकारी कामांची जशी बोळवण करतात, तशीच या कामाची बोळवण या संस्थेने केली.

परिणामी तिने दिलेल्या अहवालाच्या विरोधात किनारपट्टीत तीव्र जनक्षोभ उसळला. अल्पकालाच्या लाभासाठी दीर्घकालीन नुकसान करून घ्यायचे नाही, याच्याशी किनारपट्टीतली बहुसंख्य जनता ठाम राहिली आहे. लोकांच्या संतापाची झळ खुद्द मंत्र्यांनाही बसू लागल्यावर आता दुरुस्तीच्या प्रक्रियेला गती देण्यात आली आहे. मात्र अंतिम आराखडा निश्चित होईपर्यंत बराच कालावधी जाईल. तोपर्यंत न्यायदेवतेकडून काही दिलासा मिळावा म्हणून उच्च न्यायालयाला साकडे घालण्यात आले. न्यायालयाने तूर्तास कठोर भूमिका स्वीकारलेली नाही; पण शॅकचालकांना उमेद लाभावी, असेही काही झालेले नाही.

थॉमस कूकसारख्या प्रतिष्ठित आणि प्रस्थापित कंपनीचे बंद पडणेही गोव्यातील पर्यटन क्षेत्राला हादरे देऊ लागले आहे. खिसा सढळ सोडणारा बहुसंख्य ब्रिटिश पर्यटक याच कंपनीच्या माध्यमातून गोव्यात यायचा. एअर इंडियाने यावर तोडगा म्हणून थेट हिथ्रो ते गोवा अशी विमानोड्डाणे जाहीर केली असली तरी केवळ प्रवास हाच सहलीचा एकमेव भाग नसतो. विश्वासार्हता हा पश्चिमी जगतातील पर्यटनासाठीचा अग्रगण्य निकष असतो. जुजबी उपचारांना ब्रिटिश पर्यटक दाद देईल, अशा भ्रमात गोव्यातल्या पर्यटन क्षेत्राने राहू नये.

रशिया आणि देशी पर्यटकांच्या भरवशावरच यंदा चुलीवर आधण ठेवावे लागणार आहे. यात भर पडली आहे ती गोवा-इंग्लंड दरम्यान सप्ताहात तीन विमानफे-या करणा-या टीयूआय यूके या जगातील सर्वात मोठ्या चार्टर एअरलाइनला गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिलेला विशेष दर्जा मागे घेण्याच्या निर्णयाची. हा विमानतळ नौदलाच्या ताब्यात आहे. नौदलाने आपल्या सोयीनुसार विमान उड्डाणाच्या वेळेत केलेले बदल टीयूआयला गैरसौयीचे वाटत असल्याने गोव्यातली उड्डाणेच रद्द करण्याच्या निर्णयापर्यंत व्यवस्थापन आलेले आहे. यातून चार्टर पर्यटकांच्या आवकीवर विपरीत परिणाम होणार असल्याने पर्यटन क्षेत्र धास्तावले आहे. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांना शिष्टाईसाठी साकडे घालण्यात आले असून नौदल कसा प्रतिसाद देते यावर बरेच काही अवंलबून असेल.

गोव्याच्या पर्यटनाला काही अपप्रवृत्तींकड़ून विकृत वळणाने न्यायचा यत्न होत असल्याची ओरड गेली अनेक वर्षे होते आहे. अरमान मेहता या ठकसेनाने गोव्यात ‘न्यूड पार्टी’चे आयोजन केले असल्याची जाहिरात सोशल मीडियावरून प्रसारित केली. पोलिसी हिसक्याला घाबरून दिल्ली-बिहार-पश्चिम बंगाल असा पलायनाचा प्रवास करणाºया मेहताला पोलिसांनी चतुर्भुज केले. विषयलंपटांकडून पैसे उकळण्यासाठी तो बनाव रचल्याचे मेहताने कबूल केलेय, असे पोलीस सांगत असले तरी गोव्याच्या पर्यटनाला शरीरविक्रीचा ओंगळवाणा आयाम कधीच जडला आहे, हे नाकारता येणार नाही. अशा अपप्रवृत्तींकडे पर्यटन ओलीस पडले तर सभ्य पर्यटक गोव्याकडे पाठ करण्याचा धोका गडद होतो.

पर्यटन क्षेत्रातील जाणकारांच्या आणि दीर्घकालीन व्यवसायाचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून गुंतवणूक केलेल्यांच्या अस्वस्थतेमागचे एक कारण हेही आहे. त्यातच मात्र, भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये, यासाठीच्या नियोजनास आताच गांभीर्याने हात घालणे श्रेयस्कर ठरेल. व्यसनाधीनतेच्या विळख्यातून राज्याच्या पर्यटनाला बाहेर काढणे हे सरकारी तिजोरीच्याच हिताचे आहे. सोन्याचे अंडे देणारी कोंबडी मुरगाळण्याच्या प्रयत्नात जर शिथिल बनलेली प्रशासन यंत्रणा असेल तर तिला सरकार सहजतेने वठणीवर आणू शकते. सरकारकडे तशी इच्छाशक्ती आहे का, हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे.

Web Title: Goa's tourism is a well-known uncertainty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा