मंगलमूर्ती गजाननाचे आगमन आज होत आहे. हा देवच असा आहे की त्याचे आगमन प्रसन्नतेचा शिडकावा करीत येते. बाप्पाकडे पाहिल्यावर प्रसन्नतेची जाणीव न होणारा माणूस विरळा. नास्तिकाच्या चेहऱ्यावरही कौतुकाचे स्मित उमटविणारा हा देव आहे. हौसेने घरात येणारा व कुटुंबीयांकडून कौतुक करून घेणारा असा हा देव आहे. त्याचा धाक वाटत नाही. त्याच्या पूजेत काही कमी-जास्त झाले तर तो रागावेल, कोपेल अशी धास्ती वाटत नाही. दीड दिवस असो वा दहा दिवस, तो आपला घरातला असतो. त्याला आणताना जितका आनंद होतो, तसाच त्याला निरोप देताना डोळे पाणावतात. पुढील वर्षी लवकर या, अशा प्रेमळ अधिकारवाणीने त्याला निरोप दिला जातो.
योग्य धोरण असते तर यावर आवश्यक ती उपाययोजना करण्याचे निदान प्रयत्न तरी झाले असते. संपत्ती निर्माण करणारे उद्योजक व सरकार यांच्यात संवाद राहिलेला नाही. परस्परांबद्दल अविश्वास आहे. देशातील गुंतवणूक वाढत नाही, कारण सरकार कधी काय निर्णय घेईल याचा भरवसा उद्योग क्षेत्राला राहिलेला नाही. अनिश्चिततेचे वारे असले की त्याचा आर्थिक क्षेत्रावर दुष्परिणाम होतो. करचक्राचे शुक्लकाष्ठ मागे लागण्याची भीती आहेच. देशाचे भले चिंतणाºया अनेक उद्योजकांचे ऐकण्याच्या मन:स्थितीत सरकार नाही. चार जाणकारांचे विचार ऐकावेत, त्यांचा सल्ला घ्यावा, जगातील वेगवेगळ्या प्रवाहांची व त्यांच्या परिणामांची माहिती करून घ्यावी, त्यातून येणाºया शहाणपणानुसार कारभार करावा ही परंपरा सध्याच्या सरकारला मान्य नाही. उलट लोकसभेत बहुमत मिळाल्यामुळे बाहेरील शहाणपणाची गरज काय, अशा गुर्मीत सरकार आहे. ही एकप्रकारे मनमानीच म्हटली पाहिजे. ही सरकारची मानसिकता बदलली जावो. अचानक झटका देणारे निर्णय घेण्याची वा आधी घेतलेले निर्णय फिरविण्याची हौस या सरकारला आहे. सरकारच्या अशा स्वभावामुळे आर्थिक मरगळ ही आर्थिक मंदीच्या दिशेने जाण्याची धास्ती वाटते. योग्य निर्णय घेण्याची सुबुद्धी मिळाली तर आर्थिक मंदीची झळ काही प्रमाणात तरी कमी होऊ शकते. बुद्धी आणि विवेकाचा कारभार ही मरगळ दूर करू शकतो. म्हणून गणरायाकडे प्रार्थना करावीशी वाटते की बाबा, शहाण्यांचे ऐकण्याची आणि आर्थिक निर्णय विवेकाने घेण्याची बुद्धी, आमच्या राज्यकर्त्यांना दे. पुढील वर्षी तुझे स्वागत अधिक उत्साहाने करण्यासाठी हा वर गरजेचा आहे.