आदिवासी कुटुंबातील अल्पवयीन मुली, त्या कुटुंबांना थांगपत्ता लागू न देता पळवायच्या आणि त्यांना आपल्या मुली परत येण्याची वाट पाहात वर्षानुवर्षे ताटकळत ठेवायचे हा अपराध असेल तर तो संघाच्या संस्थांनी केला आहे. गेल्या काही वर्षांत आसामच्या कोक्राझार, गोलपाडा, ढुबरी, चिरांग आणि बोंगाईगाव या जिल्ह्यांतील ३१ अल्पवयीन मुलींना त्यांच्या कुटुंबांच्या परवानगीवाचून या संस्थांनी गुजरात आणि पंजाबमध्ये नेले आहे. आदिवासी जमातीमधून आलेल्या या मुलींचे सक्तीने हिंदू धार्मिकीकरण करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे या परिवारातील संघटनांचे म्हणणे आहे. ते कितीही विश्वसनीय मानले तरी सक्तीने पळवून नेलेल्या मुलींचे धर्मांतरण करणे वा त्यांच्यावर, त्यांच्या किंवा त्यांच्या कुटुंबातील इतरांच्या माहितीवाचून एखाद्या धर्माचे संस्कार लादणे ही बाब त्या अपराधाची तीव्रता कमी होऊ देत नाही. एका राष्ट्रीय इंग्रजी नियतकालिकाने आसाममधून पळविलेल्या व पंजाब आणि गुजरातमधील कुठल्याशा आश्रमात बंदिस्त करून ठेवलेल्या या मुलींची व त्यांची वाट पाहाणाऱ्या त्यांच्या मातापित्यांची कमालीची हृदयद्रावक कथा प्रकाशीत केली आहे. या मुलींना असे पळवून नेणाऱ्यांत राष्ट्र सेविका समिती व सेवाभारती या संघ परिवारातील महिला संस्थांच्या कार्यकर्त्यांचा हात आहे आणि त्या साऱ्यांची नावे त्यांच्या मुलाखतीतील तशा कबुलीनिशी प्रकाशीत झाली आहेत. या अपराधाची दखल आसाम स्टेट कमिशन फॉर द प्रोटेक्शन आॅफ चाईल्ड राईट््स, चाईल्ड वेल्फेअर कमिटी व स्टेट चाईल्ड प्रोटेक्शन कमिटी या गुवाहाटी व दिल्लीस्थित शासकीय संस्थांनी घेतली असून त्यांनी कसून चौकशी चालविली आहे. धर्मांतरणासाठी पळवून आणलेल्या या मुली तीन ते नऊ वर्षे वयोगटातील आहेत. त्यांच्यातील अनेकींना धड बोलता येत नाही वा त्यांच्याकडून साधे मंत्रोच्चारही करवून घेता येत नाहीत असे म्हटले आहे. या सबंध काळात या मुली इकडे आणि त्यांचे आईबाप तिकडे एकमेकांसाठी अश्रू ढाळत आहेत. ‘तुमच्या मुली तुमच्याकडे सात-आठ वर्षांनंतर कधीतरी येतील’ एवढेच त्यांना घेऊन जाणाऱ्या तथाकथित सेविकांनी त्यांच्या कुटुंबांना मागाहून सांगितले आहे. दोनच वर्षांपूर्वी ट्युनिशियामधील शाळेत शिकणाऱ्या ३०० अल्पवयीन मुलींना पळवून नेऊन त्यांना बोकोहराम या अतिरेकी संघटनेने कडव्या धर्माची दीक्षा दिल्याची बाब उघडकीला आली. (त्या मुलींचा जो छळ केला गेला, त्याच्या अंगावर शहारे आणणाऱ्या बातम्या नंतर प्रकाशीत झाल्या.) त्या मुलींचा वापर जिवंत बॉम्ब म्हणून केल्याच्या वृत्तांताचाही त्यात समावेश होता. संघ परिवारावर असा आरोप कुणी करणार नाही. मात्र त्याच्या या कृत्याची तऱ्हा नेमकी तशीच असल्याचेही कुणी नाकारणार नाही. ज्या मुलींवर धर्माचा चांगला संस्कार करायचा त्याची सगळी माहिती त्यांच्या कुटुंबियांना देणे, त्यांचा पत्ता त्यांना कळविणे, त्यांच्याशी संपर्क साधण्याचा, त्यांच्याशी फोनवरून बोलण्याचा वा प्रत्यक्ष भेटण्याचा मार्ग त्यांना उपलब्ध करून देणे असे करणेही या परिवाराला शक्य होते. मात्र संबंध नाही, संपर्क नाही, माहिती नाही आणि आपल्या मुली कुठे आहेत याचा पत्ता नाही ही बाब तर तुरुंगात डांबलेल्या कैद्यांच्या स्थितीहूनही वाईट व दयनीय आहे. तुरुंगात असलेल्या आपल्या नातेवाईकांना भेटण्याची सोय कायद्यात आहे. या मुलींसाठी व त्यांच्या कुटुंबियांसाठी एवढीही सोय या संस्थांनी ठेवली नाही. असा प्रकार आपल्याकडील नक्षलवाद्यांनीही केला व अजून चालविला आहे. त्यांच्यापासून वाचवायला आपल्या अल्पवयीन मुलींच्या गळ््यात खोटी मंगळसूत्रे घालून त्यांना घरात डांबून ठेवण्याचा अघोरी प्रकार गडचिरोली जिल्ह्यातील अनेक आदिवासी कुटुंबांना करावा लागला व अजून ते तो करतात. नक्षल्यांना वैचारिक संस्कार घडवायचा होता. या संस्थांना धार्मिक संस्कार करायचा आहे हाच काय तो फरक. काही वर्षांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो आदिवासी मुलांना चांगले शिक्षण व चांगल्या शिक्षण संस्था मिळाव्या म्हणून तेव्हाचे गृहमंत्री व त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आर.आर. पाटील यांनी त्यांना पुण्यात नेले व त्यांच्या पुढील शिक्षणाची व्यवस्था केली. त्यातली अनेक मुले आजही पुण्यात या संधीचा लाभ घेत स्वत:चा विकास करीत आहेत. ही मुले आपल्या कुटुंबाशी संबंध ठेवतात, घरी जातात व परतही येतात. आर.आर. पाटील यांनी केला तो शालेय शिक्षणाचा एक चांगला प्रकार होता. आसामातील आदिवासी मुलींबाबत संघ परिवाराने चालविले आहे तो धर्मांतरणाचा व सक्तीच्या तुरुंगवासाचा प्रकार आहे. हा अघोरी प्रकार उघड झाल्यानंतर तरी देशातील ‘हिंदूहृदये’ आणि त्यांच्या लाटेवर केंद्रात सत्तेवर आलेले सरकार काही करते की नाही ते बघायचे... दरवेळी देशाबाहेरच्या धर्मांध अतिरेक्यांनी केलेल्या अशा अघोरी प्रकाराविषयी जोरात बोलणारी माणसे स्वदेशातील स्वधर्मी लोकांविषयी गप्प का राहतात हाही येथे विचारण्याजोगा प्रश्न असतोच.
त्या मुलींची तत्काळ सुटका करा
By admin | Updated: August 10, 2016 04:08 IST