महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात काही आत्मसमर्पित नक्षलवाद्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचाराने प्रेरित होऊन अहिंसेचा मार्ग पत्करण्याचा निश्चय केला असून वर्तमान काळातही गांधीजींचे शांती आणि अहिंसेचे तत्त्वज्ञान किती प्रासंगिक आहे याची पुन्हा एकदा प्रचिती आणून दिली आहे. या ५६ नक्षलवाद्यांनी गांधीवादी विचारदर्शन परीक्षा अव्वल गुणांनी उत्तीर्ण करून सर्वांनाच सुखद धक्का दिला आहे. पुण्यातील आदर्श मित्र मंडळ आणि गडचिरोली पोलिसांनी संयुक्तपणे राबविलेल्या या उपक्रमांची प्रशंसा करावी तेवढी कमीच आहे. अशाच एका आगळ्यावेगळ्या प्रयत्नांतर्गत अलीकडेच नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात बंदिवानांची त्यांच्या मुलाबाळांशी गळाभेट घडविण्यात आली होती. कुठलीही व्यक्ती जन्मजात गुन्हेगार नसते तर ती परिस्थितीचा बळी ठरत असते. मार्ग भरकटलेल्या अशा लोकाना समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याची संधी निश्चितच मिळायला हवी आणि प्रशासनाकडून ती दिली जाते, हे अतिशय स्तुत्य आहे. देशापुढे आज नक्षलवादाचे फार मोठे आव्हान आहे. महाराष्ट्रासोबतच झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहार, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेश ही राज्ये नक्षलवादाच्या विळख्यात सापडली आहेत. या समस्येवर तोडगा काढण्यासंदर्भात भिन्न मतप्रवाह असले तरी सशस्त्र कारवाईपेक्षा सामाजिक दृष्टिकोनातृून नक्षल चळवळ आटोक्यात आणता येऊ शकते यावरच सरकारचा अधिक विश्वास आहे. त्या अनुषंगाने २००५ साली राज्य सरकारने नक्षल आत्मसमर्पण योजना सुरू केली होती आणि त्याचे सकारात्मक परिणाम समोर आले आहेत. गेल्या ११ वर्षात जवळपास ६०० नक्षलवाद्यांनी नक्षल चळवळीचे सिद्धांत नाकारून सामान्य जीवन जगणे पसंत केले आहे. १९६७ साली पश्चिम बंगालच्या नक्षलबाडीतून एका विशिष्ट उद्दिष्टपूर्तीसाठी उदयास आलेली नक्षल चळवळ आता केवळ हिंसाचार आणि दहशत माजविण्यापुरतीच मर्यादित राहिली आहे. या चळवळीत सामील होणारे बहुतांश तरुण हे नक्षल तत्त्वज्ञानापेक्षा त्यांचा पोषाख आणि बंदुकीच्या आकर्षणाने तिकडे वळत असल्याचे एका सर्वेक्षणात अधोरेखित झाले आहे. काही वेळेला बळजबरीने बंदुकीच्या धाकावर मुलामुलींना नक्षलवादात खेचले जाते. कालांतराने यापैकी अनेकांचा स्वप्नभंग होतो आणि आपल्याच लोकांच्या रक्तपाताने विचलित त्यांची मने नक्षल चळवळीतून बाहेर पडण्यासाठी धडपडू लागतात. अंध:कारमय वर्तमानातून प्रकाशमय भविष्याची आस धरणाऱ्या या नक्षलवाद्यांना मदतीचा हात पुढे करणे हे शासन आणि समाजाचेही कर्तव्य आहे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे असे साने गुरुजी म्हणत. नक्षल संकटातून मुक्तीचेही हेच गमक आहे.
नक्षल्यांची गांधीगिरी
By admin | Updated: August 18, 2016 06:25 IST