-रवींद्र राऊळ, मुक्त पत्रकार
रात्रीच्या काळोखात चांदण्यांच्या प्रकाशात समुद्रकिनारी लागलेल्या होड्यांमधून स्मगलिंगच्या मालाचे खोके उतरले जात असतानाच झालेली हिरोची एंट्री, स्मगलरांची पळापळ आणि त्यानंतर त्या खोक्यांमध्ये सापडलेली सोन्याची बिस्किटे, हा हिंदी चित्रपटातला नेहमीचा सीन. कुख्यात तस्कर हाजी मस्तान आणि युसूफ पटेल यांच्या काळात स्मगलिंग तसे चालायचे खरे; पण आता ते ज्या सुरस आणि चमत्कारिक पद्धतीने चालते ते पाहून त्या चित्रपटांचे लेखकही चक्रावल्याशिवाय राहणार नाहीत.
दोन दशकांपूर्वी दाऊद इब्राहिम टोळीच्या आफताब बटकी याने चिनीमातीच्या भल्यामोठ्या भांड्यांमधून पाचशेच्या बनावट नोटांची बंडले थेट विमानाने आणली तेव्हा त्याच्या धाडसाचे अंडरवर्ल्डमध्ये कोण कौतुक झाले होते; पण आता ती कहाणी फिकी पडेल अशा एकापेक्षा एक शक्कली तस्करांकडून लढवल्या जाताहेत.
‘भारतातील तस्करी’ या शीर्षकाने प्रसिद्ध झालेल्या महसूल गुप्तचर संचालनालयाच्या ताज्या अहवालात या नव्या प्रकारांची माहिती मिळते. कधीकाळी भारतात तस्करी व्हायची ती प्रामुख्याने केवळ सोन्याची, बॉस्कीच्या कापडाची आणि घड्याळांची. आता सोने वगळले तर बाकीच्या वस्तू कधीच कालबाह्य झाल्यात. आता त्यांची जागा घेतलीय ती अमली पदार्थ, अवैध चलन आणि विशेषतः कोकेनच्या तस्करीने.
कोलकाता विमानतळावर मेंदीच्या पाकिटात लपवलेले सव्वाकोटी रुपयांचे विदेशी चलन, तर दिल्ली विमानतळावर ९४ कोटी रुपये किमतीचे सौदी रियाल दुबईला जाणाऱ्या लेहंग्यातून जप्त करण्यात आले. हैदराबाद आणि बंगळुरू विमानतळावरून दुबईला जाणाऱ्या चार प्रवाशांकडून सुमारे १४ कोटी रुपयांचे नैसर्गिक आणि कृत्रिम हिरे हस्तगत करण्यात आले ते त्यांच्याकडच्या चॉकलेटच्या पाकिटांतून. ‘डीआरआय’ने आतापर्यंत लेन्स सेंटर उपकरणे, कार इंजिन पिस्टन, मोल्ड तयार करणाऱ्या मशीन, फूड प्रोसेसर आणि घरगुती वस्तू यांसारख्या निर्यात मालामध्ये परदेशी नागरिकांनी वाहून नेलेले सोने जप्त केले आहे.
हवाई प्रवासानंतर कोकेन तस्करांचा आवडता मार्ग म्हणजे कुरिअर सेवा. गेल्यावर्षी ब्राझील येथील साओ पाउलो येथून आलेल्या एका पार्सलमध्ये थर्माकोलच्या बॉलमध्ये लपवलेले कोकेन दिल्लीत जप्त करण्यात आले. तपासणीत काही थर्माकोल बॉल इतरांपेक्षा जड असल्याचे आढळल्याने सर्व बॉल कापल्यानंतर अंदाजे १० हजारपैकी ९७२ बॉलमध्ये १९२२ ग्रॅम कोकेन सापडल्याचे अहवालात नमूद आहे. त्याच्या पुढच्याच महिन्यात कोस्टा रिका येथून आलेल्या पार्सलमध्ये मुंबईत लाकडी वस्तूंमध्ये लपवलेले कोकेन सापडले.‘डीआरआय’ने मे २०२३ मध्ये अफगाणिस्तानातून येणारे ५.५ किलो हेरॉईन भारत आणि पाकिस्तानदरम्यान अटारी सीमेवर पकडले होते. काही वेळा तस्करांनी रसायने आणि औषधांच्या नावाखाली अमली पदार्थांची निर्यात करण्याचाही प्रयत्न केला आहे. जानेवारीत बँकॉकसाठी नियत केलेल्या निर्यात मालामध्ये अधिकृतपणे हायड्रॉक्सीलिमाइन हायड्रोक्लोराइड समाविष्ट होते, हे फार्मास्युटिकल्स, ॲग्रोकेमिकल्स आणि रंगांच्या संश्लेषणामध्ये वापरले जाणारे संयुग. मात्र, ‘डीआरआय’च्या अधिकाऱ्यांनी ही खेप रोखली तेव्हा त्यात ५० किलो केटामाइन सापडले.
या आर्थिक वर्षात ९७५ कोटी रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले. मागच्या वर्षापेक्षा हे प्रमाण दुप्पट आहे. भारतात विमानतळावर पकडले गेलेल्या कोकेनचे प्रमाण ९ टक्क्यांनी वाढले आहे. भारतात प्रामुख्याने परदेशी नागरिक त्यांच्या शरीरात कोकेन लपवून विमानाने प्रवास करतात. बंगळुरू विमानतळावर एका परदेशी नागरिकाने मुलांच्या पुस्तकात कोकेन लपवले होते, तर मुंबई विमानतळावर परदेशी नागरिकाच्या केसांच्या विगमध्ये कोकेन सापडले. शॅम्पू, मॉइश्चरायझर, दारूच्या बाटल्या आणि साबणांमध्ये कोकेन लपवणे हे तर नेहमीचेच प्रकार.
दुबई आणि बँकॉकमध्ये स्वस्त असलेले सोने अनेकदा सागरी मार्गाने भारतात तस्करी करण्यासाठी आधी ते श्रीलंकेसारख्या शेजारील देशांमध्ये नेले जाते. तेथून मग मध्य समुद्रातील स्थानिक मासेमारी नौकांकडे हस्तांतरित केले जाते. ते मच्छिमार भारताच्या पूर्व किनारपट्टीवर ते सोने उतरवतात. मंडपम आणि वेधलाई किनाऱ्यांवर हा प्रकार सर्रास चालतो. जमीन आणि सागरी मार्गांव्यतिरिक्त भारताला दोन प्रमुख अमली पदार्थ केंद्रांशी जोडणारे डेथ क्रेसेंट (अफगाणिस्तान, इराण आणि पाकिस्तान) आणि डेथ ट्रँगल (म्यानमार, लाओस आणि थायलंड) हे तस्करीचे नवीन मार्गही उदयास आले आहेत. (पूर्वार्ध) ravirawool66@gmail.com