शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

फटाक्यांनाच लावा  ‘फटाके’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 04:52 IST

Fire cracker : येत्या काही दिवसांत थंडी वाढेल व कोरोनाची लाट येण्याची भीती आहे. ती दिवाळीत किंवा त्यानंतर आली तर दिवाळीत फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण टाळणे उपकारक ठरेल.

 

एकेकाळी दिवाळीत फटाक्यांच्या लडींच्या कडकडाटाने पहाटे जाग यायची. (अलार्मकाका फेकून मारला तर भलेमोठे टेंगूळ येईल, अशा साबणाने दरवाजा ठोठवून निजलेल्यांना उठवत असल्याचा गैरसमज गेल्या काही वर्षांत विनाकारण झाला आहे. अर्थात त्यावेळी अभ्यंगस्नान करताना उटणे लावल्यावर दातावर दात वाजतील एवढे थंडीने कुडकुडत असायचे. आता फटाक्यांच्या लडी फुटणे कमी झाले आहे आणि थंडीने कुडकुडणे तर केव्हाच हरवून गेले आहे. यंदा कोरोना, लॉकडाऊन यामुळे अनेक लोक घरी बसलेले असताना दिवाळीची सुटी आली आहे. बेरोजगारी, वेतनकपात वगैरे आर्थिक संकटांमुळे दिवाळीच्या उत्साहावर सावट आहे. अशा परिस्थितीत लोकांनी फराळ, कपडालत्ता यावर थोडाफार खर्च केला तरी फटाके उडवण्याची चैन यंदा कितपत होईल, याबद्दल साशंकता आहे. येत्या काही दिवसांत थंडी वाढेल व कोरोनाची लाट येण्याची भीती आहे. ती दिवाळीत किंवा त्यानंतर आली तर दिवाळीत फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण टाळणे उपकारक ठरेल.

कोरोनामुळे श्वसनास त्रास होत असताना प्रदूषणामुळे रुग्णवाढीचा धोका आहे. नेमकी हीच बाब हेरून राजधानी दिल्ली व पश्चिम बंगालमध्ये दिवाळीच्या आसपास फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात आली. महाराष्ट्रातही अशी बंदी लागू करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. तूर्त फटाके फोडण्यावर सरसकट बंदी आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला नसला तरी दिवाळीत फटाके फोडू नका, असे आवाहन  सरकारने केले आहे. अर्थात बंदी घालणे व आवाहन करणे यात जमीन-अस्मानाचे अंतर आहे. कोरोनाच्या धोक्यामुळे मास्क न घालणाऱ्यांना दंड करण्याचा बडगा उगारूनही अनेकजण मास्क न घालता किंवा तो खाली उतरवून बिनदिक्कत फिरत आहेत. महाराष्ट्र सरकार मंदिरे खुली करीत नसल्याने राजभवनपासून रेशीमबागेपर्यंत अनेक ठिकाणी भक्तमंडळी अस्वस्थ आहेत.

घंटानाद, महाआरती, निवेदने, पिटिशन असा ‘गोंधळ’ घालणे सुरू असताना दिवाळीत फटाकेबंदी केली तर कदाचित काही धर्ममार्तंड दुखावतील व ऐन दिवाळीत महाविकास आघाडीला ‘फटाके लावण्याचे’ काम करतील, अशी भीती मंत्रिमंडळाच्या बैठकीत व्यक्त झाली. अत्यंत प्रदूषणकारी मोजक्या फटाक्यांवरच बंदी घालावी, असाही पर्याय सुचवला गेला. मात्र त्यावरही ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे आता महाराष्ट्रातील जनता सद‌्सद‌्विवेकबुद्धीचे दर्शन घडवेल आणि स्वयंशिस्त पाळेल, अशी अपेक्षा आहे. राजधानी दिल्लीत थंडी आणि प्रदूषणाने डोके वर काढले आहे. दिवाळीपूर्वी पंजाबमध्ये गव्हाचे पीक हाती आल्यावर शेतातील कुडाकचरा जाळून टाकला जातो. त्याचवेळी हिमालयातून येणारे वारे दिल्लीच्या दिशेने वाहत असल्याने ते सोबत धूर घेऊन येतात.

टेरीच्या अहवालानुसार दिवाळीच्या सुमारास यामुळे दिल्लीतील प्रदूषणात तब्बल ४० टक्क्यांनी वाढ होते. याखेरीज दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबाद, फरिदाबाद, गुडगाव, सोनीपथ वगैरे भागात मोठ्या प्रमाणावर कारखाने असून, ते सातत्याने प्रदूषण करीत असतात. दिल्ली शहरात किमान ७८ ते ८० लाख छोटी-मोठी वाहने आहेत. या व अशा अनेक कारणास्तव दिल्लीतील प्रदूषण याच काळात कमालीचे वाढते. त्यातच आता कोरोनाचे रुग्ण दिल्लीत पुन्हा वाढू लागल्याने सरकारने फटाकेबंदी लागू केली. तिकडे पश्चिम बंगालमध्ये छट पूजा, काली पूजा, कार्तिक पूजेच्या निमित्ताने फटाक्यांची आतषबाजी केली जात असल्याने कोलकाता उच्च न्यायालयाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फटाके फोडण्यावर बंदी लागू केली. 

महाराष्ट्रात दिवाळीनंतर कोरोनाची मोठी लाट येणार, अशी भीती काहीजण व्यक्त करीत आहेत तर खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आता कोरोनाची लाट येणार नाही, असे भाकीत वर्तवले. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून एक वर्ष फटाके फोडण्याचे टाळले तर काही बिघडणार नाही. राज्यातील फटाक्यांची बाजारपेठ दीडशे-दोनशे कोटी रुपयांच्या घरात असल्यास गेल्या काही वर्षांत ती २५ टक्क्यांवर आली आहे. यंदा कोरोनाचे भय आणि आर्थिक तंगी यामुळे फटाके विक्री जेमतेम १० टक्क्यांवर येईल, अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात एखाद्याला ‘फटाके लावणे’ हा शब्दप्रयोग केला जातो. अतिरेकी कारवाया करणारे घातपाती कटकारस्थानांचा उल्लेख अमुक शहरात ‘फटाके वाजणार’, असा करतात. कुठल्याही अर्थाने फटाके फोडणे, लावणे, वाजवणे गैरच. यंदाची दिवाळी आरोग्यदायी व शांततापूर्ण ठरो हीच प्रार्थना.

टॅग्स :fire crackerफटाके