भयभीत माणूस ओळख गमावण्याची भीती!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 03:25 AM2020-06-15T03:25:41+5:302020-06-15T03:25:52+5:30

आपली संस्कृतीच नव्हे, तर विज्ञानही मानते स्पर्शाचे माहात्म्य

Fearful man afraid of losing identity | भयभीत माणूस ओळख गमावण्याची भीती!

भयभीत माणूस ओळख गमावण्याची भीती!

Next

- विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह

‘यूं तो कोई शिकायत नही मुझे मेरे आज से/मगर कभी-कभी बिता हुआ कल बहुत याद आता है...!’
हल्ली प्रत्येकजण कोरोना महामारी येण्याआधीच्या दिवसांची आठवण काढत असतो. मनाला येईल तेथे मस्त भटकणे, कामावर जाणे, मित्रांना भेटणे, आलिंगन देणे, लहान मुलांचे कोडकौतुक करणे, चटकन् उचलून घेत त्यांचा मुका घेणे.. या सर्व अगदी सहजपणे केल्या जाणाऱ्या गोष्टी आता जणू इतिहासजमा झाल्या आहेत. खरे तर या गोष्टींवर मर्यादा येऊन फार तर तीनच महिने झाले आहेत; पण तरीही न राहवून त्यांची पुन्हा पुन्हा आठवण येत राहते. पुन्हा ते दिवस कधी येतील, हाच एक प्रश्न एकसारखा मनात रुंजी घालत राहतो.

मी जेवढा आशावादी आहे तेवढाच कृतिनिष्ठही आहे. त्यामुळे माझे मन कधी निराशेच्या गर्तेत जात नाही; परंतु जे वास्तव समोर दिसत आहे. त्याचे विवेचन करणेही गरजेचे आहे. मानवता टिकली तरच आपण सारे टिकून राहू, असे मी माझ्या गेल्या आठवड्याच्या याच स्तंंभात लिहिले होते. त्यानंतर लगेचच मध्य प्रदेशात शाजापूर येथे वृद्ध रुग्णाला रुग्णालयात खाटेला बांधून ठेवल्याची बातमी वाचनात आली आणि मन पुन्हा विषण्ण झाले. त्या रुग्णाला बांधून ठेवण्याचे कारण काय, तर रुग्णालयाच्या बिलापैकी काही रक्कम द्यायची बाकी राहिली होती. माजी केंद्रीय कायदामंत्री अश्विनीकुमार यांनी यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयास पत्रही लिहिले. अशा घटना पाहिल्यावर आपला समाज कुठे चालला आहे, असा प्रश्न साहजिकच पडतो.



आता आर्थिक संकटात स्नेहभावही लोप पावण्याचा धोका निर्माण होत असल्याचे मला जाणवत आहे. भावा-भावांच्या, बहीण-भावाच्या, मुले आणि आई-वडिलांच्या व पती-पत्नींच्या नात्यातही दुरावा येत असल्याचे जाणवते. पूर्वी जी व्यक्ती क्षणभरही नजरेआड झाली तरी जीव व्याकुळ व्हायचा. आता तिच्या पार्थिवालाही हात लावायला कोणी पुढे येत नाही, असे दिसते. जे स्थलांतरित मजूर घराच्या अतूट ओढीने शेकडो कि.मी. पायपीट करत गावी गेले त्यांना गावकरी गावात किंवा कुटुंबीय घरात घ्यायला तयार नाहीत. एवढेच कशाला पूर्वी जे साधू-संत भक्त दिसले की, त्यांना चरणस्पर्श करता यावा म्हणून स्वत:हून पाय पुढे करायचे, तेच आता आशीर्वाद देतानाही हात आखडता घेत आहेत! आता त्यांची नेटवर प्रवचने सुरू आहेत. या महामारीने सर्व नातेसंबंध पार विस्कटून टाकलेत, हेच खरे!



मला आठवतंय, विद्यार्थी असताना शिक्षक जेव्हा प्रेमाने खांद्यावर हात ठेवायचे वा पाठ थोपटायचे तेव्हा केवढा आनंद व्हायचा. त्यांनी पाठ थोपटली की, दिवस कसा छान जायचा. भावाच्या मनगटावर बहिणीचे राखी बांधणे, आईने तिच्या सोनुल्याला चिऊ-काऊचा घास भरविणे, मुलाने वडिलांच्या पाठीवर घोडाघोडा खेळणे, एखाद्या पतीने पत्नीच्या वेणीत प्रेमाने गजरा माळणे, हे सर्व पुन्हा अनुभवता येईल का? मला आठवते, एखादा मित्र पाठीमागून येऊन अचानक हाताने डोळे झाकायचा तेव्हा वेगळेच स्नेहबंध जुळायचे. बऱ्याच वर्षांनंतर स्पर्श विज्ञानाविषयी वाचले तेव्हा कळले की, निसर्गाने आपल्याला स्पर्शज्ञानाची अनोखी देण विचारपूर्वक दिलेली आहे. एखाद्याचा हवाहवासा असलेला स्पर्श झाला की, त्याने आपल्या चित्तवृत्ती कशा प्रफुल्लित होतात, हे वैज्ञानिकांनीही प्रयोगांती सिद्ध केले आहे. संसदेत असताना अनेकदा पंतप्रधानांनी खांद्यावर हात ठेवून ‘विजय, कसे आहात?’, असे विचारले. तेव्हा मला नक्की जाणवले की, असा स्पर्श किती प्रेरणादायी असतो. अशा स्पर्शाने स्नेह, प्रेम व निर्धाराचे रसायन सक्रिय होते.

विज्ञान असे सांगते की, आपल्या त्वचेच्या आतल्या बाजूस दबावाची जाणीव करून देणारे ‘प्रेशर रिसेप्टर’ असतात. आपल्याला कोणी स्पर्श केला की, हे रिसेप्टर लगेच त्याची माहिती रासायनिक लहरींच्या स्वरूपात मेंदूला पाठवतात. या तरंग लहरी स्पर्शाच्या स्वरूपानुसार वेगवेगळ्या असतात. स्पर्श प्रेमाचा, स्नेहाचा असेल तर तणाव निर्माण करणाऱ्या हार्मोन्सची पातळी कमी होऊ लागते. वैज्ञानिकांनी प्रयोगांती असे सिद्ध केले आहे की, एकमेकांचे हात हातात घेतल्याने व आलिंगन दिल्याने तणाव निर्माण करणारे ‘कॉर्टिसोल’ हार्मोन कमी होते. त्याचबरोबर विश्वास निर्माण करणाऱ्या ‘ऑस्किटोसिन’ या हार्मोनचे प्रमाण वाढू लागते.



आता जरा याकडे भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने पाहूया. विकसित समाजांत गळाभेट घेणे बंद होऊन त्यांचा सामाजिक स्पर्श केवळ हातापुरता मर्यादित झाला आहे; पण आपल्या संस्कृतीत विविध स्पर्श आजही आपल्या जीवनाचे अविभाज्य भाग म्हणून टिकून आहेत. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन व शीख हे सर्वच गळाभेट घेतात. मैत्रिणी गळ्यात हात टाकून भेटतात. लहान मुले तर घनिष्ठतेने परस्परांच्या सहवासात राहतात. आपल्या संस्कृतीत चरणस्पर्श करण्यास फार महत्त्व आहे. मानसशास्त्र असे सांगते की, आपण मोठ्यांच्या पाया पडतो तेव्हा त्यांच्या मनात प्रेम, आशीर्वाद, संवेदना व सहानुभूतीचे भाव निर्माण होतात. त्यामुळे त्यांच्या चित्तवृत्ती ऊर्जेने भरून जातात. ती ऊर्जा नमस्कार करणाऱ्यांकडे संक्रमित होते. वाकून नमस्कार केल्याने आपल्यामध्ये विनम्रताही येते.



स्पर्शाचे माहात्म्य नीट समजावे यासाठी मी भारतीय संस्कृती व विज्ञानाचे दाखले मुद्दाम दिले. आज आपल्यावर इतरांना स्पर्श करण्यासही बंधने आली आहेत. याने आपल्या शरीर व मनावर किती वाईट परिणाम होत असतील, याचा विचार करा. सरळ सांगायचे तर ‘लॉकडाऊन’च्या काळात माणसं अधिक चीडचिडी होण्याचे हे एक प्रमुख कारण आहे. तणावाची हार्मोन्स वाढली असून, मनाला प्रसन्नता देणारी हार्मोन्स कमी झाली आहेत. हे असे दीर्घकाळ सुरू राहिले तर त्याने आपली जीवनशैली नक्कीच प्रभावित होईल.

लोक खूश नसतील तर त्यांचे सामाजिक व्यवहारही ठीक असणार नाहीत, हे वेगळे सांगायची गरज नाही. आज समाजात काय चाललंय ते पाहिले की हे लक्षात येईल. हे बघा, ही महामारी आज नाही तर उद्या संपेल, पण त्याने आपले वर्तन बदलता कामा नये, हा मुख्य मुद्दा. आलेल्या संकटाला तोंड द्यायचे, तेही नियम पाळूनच, पण काही झाले तरी आपल्यातील प्रेम व स्नेह टिकून राहायला हवा. कारण तीच आपली सर्वांत मोठी ताकद आहे. तेव्हा स्वस्थ राहा, आनंदी राहा. भविष्य नक्कीच सुवर्णमय असणार आहे!

Web Title: Fearful man afraid of losing identity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.