भारतीय अणुशक्ती केंद्राने (इस्रो) ५ हजार कि.मी.पर्यंत मारा करू शकणा-या शक्तिशाली क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केल्याची घटना सा-या देशाचा आपल्या सामर्थ्याविषयीचा अभिमान उंचावणारी व इस्रोमध्ये कार्यरत असलेल्या सर्व शास्त्रज्ञांचा गौरव वृद्धिंगत करणारी आहे. या क्षेपणास्त्राच्या माºयाच्या टप्प्यात चीन, रशिया व मध्य पूर्वेसह सारा आशिया खंड येणार आहे. शिवाय त्यात अण्वस्त्रे वाहून नेण्याचेही सामर्थ्य आहे. अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात भारताने आजवर केलेल्या प्रगतीच्या क्षेत्रातील हा नवा व सर्वोच्च टप्पा आहे. यामागे अंतराळ शास्त्रज्ञांच्या व क्षेपणास्त्रांची निर्मिती करणा-या वैज्ञानिकांच्या अनेक दशकांची मेहनत व संशोधक दृष्टी राहिली आहे. चीन हे भारताचे पहिल्या क्रमांकाचे शत्रूराष्ट्र आहे आणि त्याचे सैन्यबळ भारताच्या सैन्यदलाहून तीन पटींनी मोठे आहे. तो देश अण्वस्त्रधारी आहे आणि त्याची क्षेपणास्त्रेही शक्तिशाली आहेत. त्याच्या शस्त्रबळापुढे व आर्थिक ताकदीमुळे त्याने रशिया वगळता सारा आशिया खंडच आपल्या प्रभावाखाली आणला आहे. त्याचा भारताच्या अनेक प्रदेशांवर डोळा आहे व तो त्याने जगाला जाहीरपणे सांगितलाही आहे. अशा शत्रूला आवर घालायचा तर तो आपले सैन्यबळ वाढवून घालता येणार नाही. आपले रणगाडे व लढाऊ विमानेही हिमालयाच्या प्रदेशात फार दूरवर नेता येणार नाहीत. या स्थितीत त्याला जरब बसवायची तर भारताजवळ शक्तिशाली क्षेपणास्त्रे असली पाहिजेत आणि ती अण्वस्त्रे वाहून नेता येणारी असली पाहिजेत असा आग्रह देशांचे संरक्षणविषयक सल्लागार अजित डोवल हे गेली दोन वर्षे धरीत आहेत. क्षेपणास्त्रांचे आतापर्यंतचे चलन अंतराळ संशोधन व त्यात सोडावयाचे उपग्रह यापुरतेच मर्यादित राहिले असल्याचे सांगितले जात आहे. त्याही क्षेत्रात, एका क्षेपणास्त्राच्या आधारे शंभर उपग्रह अंतराळात सोडण्याचा भारताने केलेला विक्रम जगाला थक्क करून गेला आहे. त्याविषयीची तक्रार चीनने आंतरराष्टÑीय व्यासपीठांवर केलीही आहे. याच संशोधन कार्यासाठी वापरावयाची क्षेपणास्त्रे अण्वस्त्रे वाहून नेण्यासाठीही सज्ज करणे हे भारताचे या क्षेत्रातील नवीन व साहसी पाऊल आहे. नवे क्षेपणास्त्र बीजिंगच नव्हे तर शांघायपर्यंत मारा करू शकणारे आहे. उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम-उल-उन याने अतिशय शक्तिशाली क्षेपणास्त्र विकसित केले असल्याचा व ते अमेरिकेतील कोणत्याही शहरावर मारा करू शकणारे असल्याचा दावा केला आहे. मात्र त्याने त्यांची तशी चाचणी अद्याप केल्याचे दिसले नाही. आजवर त्याची क्षेपणास्त्रे चीनच्या समुद्रात व पॅसिफिक महासागराच्या मध्यापर्यंतच जाऊन पोहचली असल्याचे आजवरच्या त्यांच्या चाचण्यात दिसले आहे. याउलट भारताचे क्षेपणास्त्र ५ हजार कि.मी.चा मारा करू शकत असल्याची चाचणीच आता यशस्वी झाली आहे. चीन व पाकिस्तान या दोन्ही देशांनी दखल व धास्ती घ्यावी अशी ही बाब आहे. मात्र देशाच्या संरक्षण व्यवस्थेला तेवढ्यावर समाधानी राहून चालणार नाही. पाकिस्तान व चीन ही दोन्ही अण्वस्त्रधारी राष्ट्रे आहेत आणि त्यांच्याहीजवळ शक्तिशाली क्षेपणास्त्रे आहेत. त्यांच्यातल्या कोणी आपले क्षेपणास्त्र ५ हजार कि.मी.चा पल्ला गाठू शकणारे असण्याचा दावा अजून केला नाही. मात्र चीनचे शस्त्रबळ व अर्थबळ एवढे मोठे आहे की असे क्षेपणास्त्र तो केव्हाही विकसित करू शकेल. एखादेवेळी ते त्याच्या शस्त्रागारात असेलही. आपले शस्त्रबळ उघड न करण्याचे धोरण अनेक हुकूमशाही देश अवलंबत असतात. तथापि चीनने नुकत्याच केलेल्या त्याच्या शस्त्रास्त्रांच्या प्रदर्शनात असे क्षेपणास्त्र असल्याचे आढळले नाही. ही स्पर्धा आहे आणि तीत यशस्वी व्हायचे तर सदैव आपले बळ व वेग यात वाढ करीत नेणे आवश्यक आहे. भारतीय शास्त्रज्ञ व संरक्षण व्यवस्था यांच्यासमोर असलेले हे आव्हान मोठे आहे. नवे क्षेपणास्त्र यशस्वी करून त्यांनी यात एक मोठी मजल गाठली आहे. मात्र यापुढेही त्यांना या क्षेत्रात आणखी पुढे जायचे आहे. शस्त्रस्पर्धा ही कधीही थांबणारी बाब नाही. या स्पर्धेत जो थांबेल तो मागे पडेल आणि दुबळाही होईल. त्यामुळे आपल्या बळात सतत नवी भर घालणे हेच संरक्षणाचे खरे सूत्र आहे.
अंतहीन शस्त्रस्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 01:00 IST