संयत, नैसर्गिक अभिनयाचा सम्राट हरपला 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2020 06:03 AM2020-11-17T06:03:36+5:302020-11-17T06:05:29+5:30

ख्यातनाम बंगाली अभिनेते सौमित्र चटर्जी यांचे रविवार दि. १५ नोव्हेंबर रोजी कोलकाता येथे निधन झाले. गेली सहा दशके गाजवणाऱ्या या अभिनयसम्राटाविषयी... 

The emperor of moderate, natural acting lost | संयत, नैसर्गिक अभिनयाचा सम्राट हरपला 

संयत, नैसर्गिक अभिनयाचा सम्राट हरपला 

Next

 - राजू नायक, संपादक, लोकमत, गोवा  
सुप्रसिद्ध बंगाली  लेखक अमितव नाग एकदा सौमित्र चटर्जींची मुलाखत घेत होते. त्यांनी सौमित्रदांना विचारले,‘मृत्यूबद्दलची तुमची कल्पना काय आहे..?’ आपले ते प्रांजळ हास्य चेहराभर पसरवीत सौमित्रदा उत्तरले,‘नाही हो, मला काहीच नाही सांगता यायचं. पण मला जीवन म्हणजे काय हेही कळलेले नाही. अद्यापही शोध जारीच आहे!’ 


कोलकातातील एका रुग्णालयातील खाटेवर गेले ४० दिवस पहुडले असताना सौमित्रदांनी याच स्थितप्रज्ञवृत्तीने जीवन आणि मृत्यूचा विचार केलेला असेल. 
सहा दशकाहून अधिक काळ बंगाली नाट्य आणि चित्रसृष्टीवर आपल्या अभिनयाची मोहिनी टाकलेले सौमित्र चटर्जी यांचे रविवार, दि. १५ रोजी कोविड-१९ आणि त्यासोबत वृद्धापकाळात स्वाभाविकपणे सोबतीस येणाऱ्या अन्य व्याधींमुळे निधन झाले. ते आणखी दोन महिने जगते तर ८६ वर्षांचे झाले असते. बॉलिवूडची लांबलचक सावली अंगावर वागवणाऱ्या मराठी वृत्तपत्रांना या निधनाची विशेष दखल घ्यावीशी वाटली नाही. पण त्यामुळे त्यांनी रंगमंच व चित्रपटांबरोबरच एकंदर बंगाली संस्कृतीसाठी दिलेले योगदान कमी प्रतीचे ठरत नाही. सौमित्र चटर्जी म्हणजे सत्यजित रे यांच्या तब्बल १७ चित्रपटातून चमकलेले अभिनेते. रे यांच्या अपू आणि फेलुदा यासारख्या अजरामर व्यक्तिमत्त्वांना सौमित्रदांनी पडद्यावर साकारले. पण रे यांच्यामुळे ते प्रकाशात आले असे नाही म्हणता यायचे. किंबहुना अभिनयाच्या बाबतीत नेहमीच सकस असलेल्या बंगालच्या मातीतून रे यांनी एकदा सौमित्रदांना उचलले आणि ते निरंतर त्यांच्या अभिनयाच्या प्रेमातच राहिले. अर्थात रे यांच्या कुशल निर्देशनामुळे सौमित्रदा जागतिक कीर्तीचे कलावंत म्हणून जगासमोर आले, हे सांगणे न लगे. 


रे यांच्या ‘अपुर संसार’ या चित्रपटातून अपू ही व्यक्तिरेखा रंगवण्यासाठी जेव्हा सौमित्रदांनी १९५९ साली चित्रसृष्टीत प्रवेश केला तेव्हा त्यांचे वय होते २३ वर्षांचे. चारुलता, अभिजन, अरण्येर दिन रात्री यापासून देवी, गणशत्रू आणि घरे बाइरेपर्यंतच्या रे यांच्या प्रत्येक चित्रपटात ते होते. अर्थात, यादरम्यान त्यांनी मृणाल सेन, तपन सिन्हा आणि अजोय कार या तत्कालीन मातब्बर बंगाली दिग्दर्शकांसाठीही अनेक चित्रपटातून भूमिका केल्या. लक्षात घेतले पाहिजे की, तो काळ उत्तमकुमार नामक मॅटिनी आयडॉलच्या उत्कर्षाचा काळ होता. देखण्या उत्तमकुमारची अभिनयाची समजही उत्तमच होती. त्या काळात समांतर सिनेमाचा जोर नसतानाही वेगळ्या पठडीतील संयत, पण नैसर्गिक अभिनय हेच भांडवल घेऊन येणे तसे धाडसाचे होते. ते धाडस सौमित्रदांनी केले आणि बंगाली सिनेरसिकांनी त्यांना डोक्यावर घेतले.


अभिनयाचे वेड सौमित्रदांना तारुण्यातच लागले. महाविद्यालयीन स्तरावरील नाटकातून भूमिका करताना त्यांनी पुरस्कारही मिळवले. पण त्यांना शिशिर भादुडीसारखा रत्नपारखी अभिनेता-निर्देशक भेटला आणि त्यांच्या अभिनयाचा वारू अक्षरश: उधळला. शंभू मित्रांसारख्या मातब्बरांचा रंगमंचावरील वावर मनोभावे वाखाणणाऱ्या बंगाली रसिकांना सौमित्रदांनी अक्षरश: भुरळ घातली. चित्रपटात नाव कमावल्यानंतरही ते रंगमंचाला विसरले नाहीत. किंबहुना रंगमंचालाच आपण पहिली पसंती देईन, असे ते कीर्तीच्या शिखरावर असतानाही स्पष्टपणे सांगायचे. सौमित्रदा व्रतस्थ अभिनेते होते. आपण करत असलेल्या भूमिकेसह अन्य भूमिकांचे संवादही ते कंठस्थ करत, इतकेच नव्हे तर आपण कुठे चुकू नये यासाठी संपूर्ण संहिताच आपल्या हस्ताक्षरात लिहून काढत. सौमित्र हे रे यांच्याप्रमाणेच बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन सात वर्षांआधी कोलकात्यात भरले होते आणि बंगाली रसिकांनी तेही डोक्यावर घेतले होते. 

Web Title: The emperor of moderate, natural acting lost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.