हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत,नवी दिल्ली
‘पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांच्या हत्येला जबाबदार असलेला प्रत्येक दहशतवादी आणि त्याला आश्रय देणाऱ्याला भारत शोधून काढून शिक्षा करील’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, तेव्हा पाकिस्तानला तो अगदी स्पष्ट शब्दात इशारा होता. गुळमुळीत शाब्दिक खेळ हा मोदींचा स्वभाव नव्हे. यावेळी कोणाला कल्पनाही करता येणार नाही, अशी काही कारवाई ते करतील आणि पाकिस्तानच्या मर्मावरच नेमका आघात होईल, हे निश्चित आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये सैन्यदले आणि प्रशासनाने अनेक चुका केल्या, हे अमान्य करताच येणार नाही. गेल्या ३५ वर्षांत दहशतवाद्यांकडून कधीही पर्यटकांवर हल्ला झालेला नाही. त्यामुळे ‘असे काही घडणारच नाही’, हे जणू गृहीतच धरले गेले. ‘यावेळी पर्यटनस्थळे लक्ष्य होऊ शकतात’, असा इशारा गुप्तचरांनी देऊनही हे क्रूर हत्याकांड घडले.
पहलगाममधील बैसरन परिसर मिनी स्वित्झर्लंड असूनही तिथे पर्यटन सेवा देणाऱ्यांसाठी साध्या परवान्याची पद्धतही नाही. हजारो पर्यटकांना घेऊन कुणीही कुणाच्याही परवानगीशिवाय कुठेही जावे, असे चालले होते. आता तेच दहशतवाद्यांचे सोपे लक्ष्य ठरले आहे. पुलवामात १४ फेब्रुवारी २०१९ रोजी आत्मघातकी बॉम्बर्सनी सीआरपीएफ जवानांच्या बसवर केलेल्या हल्ल्यात ४० जवान ठार झाले होते. यासंदर्भातील डावपेचात्मक बाबी हाताळणाऱ्यांचे मत असे की, पहलगाम म्हणजे पुलवामा नव्हे. भारतीय सैन्याने त्या हल्ल्याचा सूड म्हणून पाकिस्तानमधील बालाकोटवर अचानक हवाई हल्ला करून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. यावेळी भारत बालाकोटच्या पुढे जाईल आणि पाकिस्तानविरुद्ध दीर्घ युद्ध पुकारेल, अशी चर्चा आहे.
२०१९ मध्ये मोदी निवडणुकीच्या तणावाखाली होते. लोकसभा निवडणुका दोन महिन्यांवर होत्या. विरोधी पक्षांनी सुरक्षेत गलथानपणा झाल्याचा ठपका ठेवला होता, परंतु आज २०२५ मध्ये विरोधी पक्षही मोदींच्या ठामपणे पाठीशी आहेत. सिंधू जल करार स्थगित करून भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध आर्थिक युद्ध पुकारले आहे. पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले उचलली जातील, असे अंतस्थ सूत्रांकडून समजते.
नितीश, बिहार आणि भाजपबिहार विधानसभेच्या २४३ पैकी २०० जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडी जिंकेल, असे भाजपचे म्हणणे आहे. विरोधी पक्षांमधील प्रमुख नेते आपल्या छावणीत आणण्याचाही पक्षाचा प्रयत्न चालला आहे. अलीकडेच एक केंद्रीय मंत्री काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार अखिलेश प्रसाद सिंह यांना भेटले. अखिलेश प्रसाद यांची बिहार प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी होताच नेमकी संधी साधण्यासाठी भाजप लगेच पुढे सरसावला. ‘पक्षात चांगले भवितव्य असेल. राज्यसभेतील खासदारकीही पुन्हा मिळेल’, असे आमिष दाखवण्यात आले. तूर्तास तरी अखिलेश प्रसाद सिंह यांनी याविषयी फारशी उत्सुकता दाखवलेली नाही. राष्ट्रीय जनता दल आणि इतर पक्षातले काही प्रमुख नेते आपल्या छावणीत आणण्याचे प्रयत्नही भाजपने चालविले आहेत.
सरकारने कितीही नाकारले तरी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा स्मृतिभ्रंशाचा आजार वाढत चालल्याच्या बातम्या आहेत. माणसाची विचार करण्याची शक्ती, स्मृती आणि तर्कावर कोणकोणते आजार परिणाम करू शकतात, यावर चर्चेलाही ऊत आला आहे. नितीशकुमार यांनी स्मृतिभ्रंशामुळे काय-काय गडबडी केल्या त्याचे भांडवल विरोधी पक्ष करणार. बिहारमधील निवडणुकांवर या सगळ्याचे सावट घोंगावते आहे. मुख्यमंत्र्यांच्या प्रशासकीय प्रतिमेवरही त्याची सावली दिसते. प्रशासकीय कुचंबणा टाळण्यासाठी केंद्रीय मंत्री लल्लन सिंह, भाजपचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि नितीशकुमार यांच्याजवळच्या असलेल्या काही नोकरशहांचा एक अनौपचारिक गट तयार करण्यात आला आहे. सर्व महत्त्वाचे निर्णय हा गट देतो आणि या व्यवस्थेबद्दल भाजपचे नेतृत्व अत्यंत समाधानी आहे. या पार्श्वभूमीवरच भाजपने विधानसभा निवडणुकीनंतरही नितीशकुमार हेच मुख्यमंत्री राहतील, असे जाहीरही करून टाकले. म्हणजे, नितीशकुमार हे नामधारी राहतील आणि प्रत्यक्षात भाजपलाच राज्य करता येईल.
harish.gupta@lokmat.com