डॉ. विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह
सेक्सच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीवर हल्ला होत आहे असे मी म्हटले तर आपल्याला थोडे विचित्र वाटेल. अनेक लोक म्हणतील की ही अतिशयोक्तीच झाली. परंतु, वास्तव मात्र असेच आहे. रणवीर अलाहबादिया या यूट्यूबरने समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लॅटेंट’ या यूट्यूब कार्यक्रमात ज्याप्रकारची बेशरम शेरेबाजी केली, ती तर केवळ एक वानगी आहे. प्रत्यक्षात अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाने इंटरनेटचे मायाजाल अभद्रता, शिवीगाळ आणि मेंदूतील सडक्या गोष्टींची कचराकुंडी झाली आहे. आपल्या तरुण पिढीच्या डोक्यात घाण भरण्याचे षड्यंत्र अत्यंत हुशारीने रचले गेले आहे.
हे षड्यंत्र समजून घेण्याच्या आधी ‘इंडियाज गॉट लॅटेंट’विषयी बोलू. टीव्हीवर ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ हा एक प्रसिद्ध कार्यक्रम चालतो. त्याच्या शीर्षकात टॅलेंटच्या जागी लॅटेंट असा बदल करून समय रैना याने यूट्यूबवर चॅनल सुरू केले. टॅलेंट या शब्दाचा अर्थ सर्वांना ठाऊक आहे. परंतु लॅटेंट हा शब्द प्रचलित नाही. अव्यक्त, गुप्त किंवा सुप्त असा लॅटेंट या शब्दाचा अर्थ आहे. थोडक्यात काहीतरी असे आहे जे सामान्यपणे बोलले जात नाही. गुप्त किंवा सुप्त, झाकून ठेवलेले असते. अत्यंत हुशारीने या शब्दाची निवड केली गेली असावी; जेणेकरून सेक्सचा मसाला भरला गेला तरी कायदेशीर अडचण न यावी. यात अशा गोष्टी सांगितल्या जात आहेत ज्या भले जाहीरपणे सांगितल्या जात नसतील; पण प्रत्यक्षात आहेत, असा बहाणा करता यावा. त्यामध्ये आई-बहिणींवरून दिल्या जाणाऱ्या शिव्यांसह कुणी महिला किंवा पुरुषाच्या अवयवांची व्याख्या समाविष्ट होऊ शकते. तुमच्या- आमच्यासाठी ही अश्लीलता आहे. परंतु, अलाहबादिया किंवा समय रैना यांच्यासारख्या लोकांसाठी हे पैसे कमावण्याचे माध्यम आहे. पॉड्कास्टवर शिवीगाळ करणारे यूट्यूबर्स कोट्यवधी कमावत आहेत. कारण लाखो लोक ते पाहतात. यूट्यूबसारखे व्यापारी माध्यम आपल्या माध्यमातून काय दाखवले जात आहे याकडे लक्ष देत नाही. त्यांना हिट्स किंवा सबस्क्रायबरची संख्या तेवढी महत्त्वाची असते. या निकषावर जो उतरेल तोच झोळी भरेल.
शिवीगाळ तसेच अंगप्रत्यंग, शारीरिक संबंधांच्या वर्णनापलीकडे जाऊन अलाहबादियाने एका स्पर्धकाला जे काही विचारले त्यामुळेच वादाला गंभीर वळण लागले. त्याने जे विचारले, ते या ठिकाणी मी सांगू शकत नाही; कारण आमचा विवेक अजून शाबूत आहे. तरीही सभ्य शब्दात सांगितले पाहिजे. रणवीरने स्पर्धकाला विचारले, की तू आपल्या आई-वडिलांना सेक्स करताना पाहण्यात आयुष्य घालवणार, की एखादेवेळी त्यात सहभागी होऊन ते कायमचे संपवून टाकणार? या प्रश्नावर तो स्पर्धक हसत होता. परंतु, तो व्हिडीओ पाहताना आणि ऐकताना माझे रक्त उसळले. हे कुठल्या प्रकारचे लॅटेंट आहे? निसर्गाची वाटचाल चालू राहण्याचे अविभाज्य माध्यम म्हणजे प्रणयलीला होत, हे सर्व जाणतात. म्हणून ती लीला रस्त्यावर करावयाची काय? आज इंटरनेटवरील जवळपास सर्व प्लॅटफॉर्म्स नंगानाच दाखवणारे अड्डे झाले आहेत. शिव्या तर इतक्या घाऊक दिल्या जातात की ऐकणाऱ्याला लाज वाटावी. स्त्रियांच्या संबंधातील शिव्या देण्यापर्यंत मुलींची मजल गेली आहे.
लैंगिक चर्चा करणाऱ्या स्टॅण्डअप कॉमेडियन्सना ऐकण्यासाठी लोक हजारो रुपयांची तिकिटे काढून येतात. ज्यांना खर्च करता येत नाही त्यांच्यासाठी समाजमाध्यमांवर व्हिडीओ टाकले जातात. लाखो लाइक्स मिळतात आणि पैशांचा पाऊस पडतो. भारतातील तरुण दररोज सरासरी अडीच तास वेगवेगळ्या समाजमाध्यमांवर फेरफटका मारत असतात, हे आपल्याला ठाऊक आहे काय? त्यातील सुमारे ४० मिनिटे ते रील्स पाहतात. इंटरनेटवर चांगले रील्सही आहेत हे खरे. परंतु सेक्सने भरलेल्या रील्सची संख्याही कमी नाही. येथे मी पोर्न फिल्म्स किंवा क्लिपिंगची तर गोष्टही करत नाही. अलीकडेच मी इंटरनेट उद्योगासंबंधी एक रिसर्च पेपर वाचत होतो. पोर्न पाहणाऱ्यांमध्ये जगात भारतीय सर्वात पुढे आहेत हे वाचून मला आश्चर्य वाटले. अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. आता तर भारतीयही पोर्न फिल्म तयार करू लागले आहेत. फिल्मी जगतातील काही नावेही समोर आली आहेत. ही मंडळी सॉफ्ट पोर्न तयार करून परदेशात विकतात. मस्तरामच्या कहाण्या बाजारात आधीपासूनच उपलब्ध होत्या. त्या आता व्हिडीओच्या रूपात दिसू लागल्या, असा युक्तिवाद काही जण करतील; परंतु मी त्या तर्काशी सहमत नाही. लैंगिक कहाण्यांची ती पुस्तके काही जणांच्या अतृप्तीचे शमन करत असतील; परंतु आज जे चालले आहे ते सरळ सरळ आपल्या संस्कृतीवर आक्रमण आहे.
ज्या अलाहबादियाची सध्या छीथू होते आहे त्याच्या कार्यक्रमात राजकारणातील बडे बडे नेते सामील झालेले आहेत. त्या कार्यक्रमात शिवीगाळ झाली नव्हती हे खरे. परंतु प्रश्न असा आहे की अशा लोकांना आश्रय कशासाठी द्यावा? एखाद्या देशाला संपवायचे असेल तर त्याची संस्कृती नष्ट करून टाका अशी एक जुनी म्हण आहे. आज काय चालले आहे?
असाही विचार जरूर करा की सेक्सच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीवर हल्ला करणाऱ्यांना कोट्यवधी रुपये कोण देत आहे? विचार तर आपल्या सरकारनेही केला पाहिजे. काही देशांतील लोक आपल्या कुंभमेळ्याला हजेरी लावतात, हिंदुस्थानी संस्कृतीचे पूजक होतात, यामुळे ते देश नाराज झाले असतील. तूर्तास आपण काय करतो आहोत, ही आपली चिंता आहे. पाश्चात्य आचारांच्या ज्वाळेत आपण होरपळून निघत आहोत..