प्रभू चावला, ज्येष्ठ पत्रकार
अलीकडेच वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी त्यांच्या 'एक्स' हँडलवर प्रदर्शित केलेले छायाचित्र बरेच काही सांगून जाते. अमेरिकेचे वादग्रस्त वाणिज्यमंत्री हॉवर्ड ल्युटनिक आणि राजदूत सर्जियो गोर हसतमुखाने छायाचित्रासाठी उभे राहिले आहेत. भारत-अमेरिका संबंधात अचानक संचारलेली नवी अनौपचारिकता या छायाचित्रात दिसते. आदर, आदब यापेक्षाही मैत्रीचा भाव झळकतो. यापूर्वी सरकारी दौऱ्यातील अशी छायाचित्रे क्वचित सार्वजनिक केली जात. गोर यांच्या बाबतीत मात्र हे वेगळेपण आहे.
पारंपरिकदृष्ट्या राजदूत म्हटले की 'जरा बाजूला नेऊन कानगोष्टी करून आपले म्हणणे पटवून देणारा' असा आजवरचा अनुभव. ही मंडळी आक्रमकपणे प्रकाशझोतात राहत नाहीत. मात्र, दिल्लीतल्या राजनैतिक रंगमंचावर नव्याने अवतरलेले भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनी ही पारंपरिक प्रतिमा बाजूला ठेवली. ते केवळ ३८ वर्षाचे आहेत. इतकी मोठी जबाबदारी दिले गेलेले हे सर्वात तरुण राजदूत ! त्यांची सळसळत्या ऊर्जेने भरलेली कारकीर्द वाजतगाजत राहील असे दिसते. संरक्षण आस्थापने, राज्याच्या राजधान्या, कंपन्यांच्या बोर्डरूम्स, राजकीय चव्हाटे अशा सगळ्या ठिकाणी त्यांच्या भेटी देऊन झाल्या आहेत. आपल्या निवासस्थानी त्यांनी भपकेबाज पार्त्या ठेवल्या. मंत्रिगण, खासदार त्यांना जाऊन केवळ भेटत नाहीत तर या भेटी प्रतिष्ठेचा भाग म्हणून मिरवतातही.
रशियात जन्मलेले गोर ट्रम्प यांचे निकटवर्ती असून, व्हाइट हाऊसमध्ये अध्यक्षांच्या व्यक्तिगत कार्यालयात एकेकाळी त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. एकेकाळी इलॉन मस्क त्यांनी त्यांचे वर्णन 'साप' असे केले. व्यक्तिगत सुरक्षा व्यवस्थेत ते नाक खुपसतात असे मस्क यांचे म्हणणे होते. गोर यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनीही अपात्र ठरवून बाजूला केले होते. भारताच्या बाबतीत राजनीतीतले त्यांना काही कळत नाही असे बोल्टन यांना वाटत असे. गोर म्हणजे ट्रम्प यांच्या निकट कोंडाळ्यातला भारतविरोधी आवाज असल्याचे त्यांच्या टीकाकारांचे म्हणणे आहे.
इतर देशांचे राजदूत अधिक संयमी दिसतात. युरोप, जपान, चीन, रशिया या देशांचे राजदूत एकप्रकारे अदृश्यपणे वावरतात. अधिकृत बैठकांना उपस्थित राहतात. मोजक्या शब्दांत पत्रके काढतात. औपचारिक हस्तांदोलन करतात.. गोर यांच्या आधी एरिक गार्सेटी यांनी अमेरिकेचे राजदूत म्हणून काम केले. तेही उत्साही होते; परंतु त्यांनी मर्यादाभंग केला नाही. गरमागरम पत्रकार परिषदा, उद्योग क्षेत्रात खेळीमेळीचा वावर, संसदीय हस्तांदोलने अशा गोष्टी पीयूष गोयल यांच्यासमवेत अमेरिकेचे वाणिज्य मंत्री हॉवर्ड ल्युटनिक आणि राजदूत सर्जियो गोर. ते करत नसत. गोर नेमके हेच करत आहेत.
गेल्या महिन्यात भारतीय लष्कराच्या पश्चिम मुख्यालयात गोर एका उच्चस्तरीय दौऱ्यासाठी गेले. भारत-अमेरिका पॅसिफिक कमांडचे कमांडर अॅडमिरल सॅम्युअल जे पापारो त्यांच्याबरोबर होते. पश्चिम आघाडीवरच्या धोरणात्मक बाबी, प्रत्यक्ष कामगिरीसाठीची सज्जता वगैरे गोष्टी त्यांना तेथे सांगण्यात आल्या. एरवी असा तपशील टाळला जातो. देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी त्यावर संताप व्यक्त केला. गोर राज्याराज्यांत जात आहेत. उद्योगसमूहांशी बोलत आहेत. पार्थ्यांसाठी त्यांनी आपले निवासस्थान खुले केले आहे. माजी परराष्ट्र सचित आणि राज्यसभेचे खासदार हर्षवर्धन श्रृंगला यांनी गोर यांच्या सन्मानार्थ स्वागत समारंभ ठेवला. खासदारांची मांदियाळी तेथे हजेरी लावून गेली.
देशातील राजकारणी, सैन्यदल, औद्योगिक क्षेत्रातील मुखंड, खासदार, राज्य पातळीवरचे नोकरशहा यांच्याशी गोर यांची सततची सलगी 'त्यांचा अंतस्थ हेतू काय आहे?' असा प्रश्न उपस्थित करते. दिल्लीच्या धोरणांवर वॉशिंग्टनचा अवाजवी प्रभाव आहे हे सांगायला पुरावा म्हणून विरोधी पक्ष याचा वापर करतात. गोर ज्याला 'पूल बांधणे' म्हणतात त्याला विरोधक 'प्रभाव टाकणे', 'गळी उतरवणे' आणि भारताच्या निर्णय यंत्रणेत ठरवून केलेली 'घुसखोरी' मानतात. यामुळे अमेरिकन प्राधान्यक्रम पुढे सरकण्याचा धोका उद्भवतो. हे जे घडते आहे ते अपघाताने नाही, ठरवून चालले आहे. भारत-अमेरिका व्यापार कायदा पुढे न्यायला गोर यांनी मदत केली. रशियन तेलाशी जोडलेल्या आयात शुल्काविषयी वाटाघाटी केल्या. एआय पुरवठा साखळी आणि सेमीकंडक्टर्सविषयी 'पॅक्स सिलिका जाहीरनाम्या'च्या बाबतीत पुढाकार घेतला. या जास्तीच्या 'गुंतण्या' विषयी विरोधी नेत्यांनी सावधगिरीचा इशारा द्यायला सुरुवात केली आहे. नव्याने आलेले विदेशी राजदूत अमेरिकी नौदल अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन संवेदनशील लष्करी चर्चेत सामील होतात, याला राजनीती म्हणावयाचे की सफाईदारपणे दाखवलेले वर्चस्व?
त्यांच्या पूर्वसुरींनी शिष्टाचाराची मर्यादा पाळली. गोर ती ओलांडत आहेत. त्यातून होणारे नुकसान मोठे असेल. अभिजनांच्या पार्ष्या, समाजमाध्यमांवर फिरणारे फोटो यातून अंतःपुरात प्रवेश मिळवून भारतीय सत्तासंरचनेच्या पायरीवर उभे राहण्याचा प्रयत्न गोर करत आहेत. यातून 'भारत अमेरिकेच्या तालावर नाचतो' या संशयाला बळकटी मिळणार आहे. विरोधकांचे आक्षेप योग्य आहेत. गोर यांच्या दिल्लीतील अतिउत्साही वावरण्याचे काय परिणाम होतील? याचा विचार केला पाहिजे. राजदूतांनी पडद्यामागे राहून काम करावे. सल्ले देऊ नयेत.
Web Summary : Sergio Gore's active engagement raises questions. His approach contrasts past ambassadors. Critics fear undue US influence, calling it a deliberate intrusion into Indian decision-making. Is it diplomacy or dominance?
Web Summary : सर्जियो गोर की सक्रियता सवाल उठाती है। उनका तरीका पिछले राजदूतों से अलग है। आलोचकों को अनुचित अमेरिकी प्रभाव का डर है, इसे भारतीय निर्णय लेने में जानबूझकर घुसपैठ कहा गया है। क्या यह कूटनीति है या वर्चस्व?