मुख्यमंत्री, महाराष्ट्र
पंतप्रधान आणि देशाचे लाडके नेते नरेंद्र मोदी यांचा आज ७५ वा वाढदिवस. राष्ट्रहितासाठी कायम तत्पर असे कर्मयोगी नेते असलेल्या नरेंद्र मोदीजी यांच्या हातून कायम अशीच देशसेवा घडत राहो, त्यासाठी त्यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो, यासाठी मी त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा देतो. राजकारणात सलग २५ वर्षे संवैधानिक पदांवर कार्यरत असणे ही सोपी गोष्ट नसते. या अडीच दशकात लोकप्रियतेचा आलेख सतत उंचावत राहणे, नव्हे तो वैश्विक होणे, हेच या प्रवासाचे फलित आहे. ही केवळ त्यांच्या लोकप्रतिनिधीत्त्वाची २५ वर्षे नाहीत, तर संवैधानिक पदांवरील कर्तव्यपूर्तीचा, लोकसेवेचा कालखंड आहे.
महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर वाटचाल करणारे मोदीजी महाराष्ट्राच्या विषयांना कायमच प्राधान्य देत आले आहेत. पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी ते भक्कमपणे राज्याच्या पाठीशी उभे असतात. मोदीजींनी महाराष्ट्राचा एकही विषय प्रलंबित ठेवला नाही. यावर्षी तर प्रधानमंत्री आवास योजनेतील ३० लाख घरे त्यांनी महाराष्ट्राला दिली. आज महाराष्ट्रात १० लाख कोटींची पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत, यामागे निश्चितपणे मोदीजींचे भक्कम पाठबळ आहे. परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र राज्य सातत्याने पहिल्या क्रमांकावर राहिले आहे. यामागेसुद्धा पंतप्रधान मोदीजी यांचा भक्कम पाठिंबा आहे.
वाढवण बंदर, नवी मुंबई विमानतळ, पुण्याचे नवीन विमानतळ, नागपूर विमानतळाचे आधुनिकीकरण, अमरावती विमानतळ, अमरावतीचा टेक्सटाइल पार्क, गडचिरोली पोलाद सिटी, पालखी मार्ग, मुंबई-नागपूर-पुण्यातील मेट्रोचे प्रकल्प, छत्रपती संभाजीनगरमधील डीएमआयसी, ऑरिक सिटी, जलसंधारणाचे प्रकल्प, महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांसाठी विशेषत्त्वाने मिळालेले पॅकेज, नदीजोड प्रकल्प अशा प्रत्येकच प्रकल्पात ते महाराष्ट्राच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत.
अनेकदा वैयक्तिक भेटी झाल्या, त्यांचे मार्गदर्शन प्राप्त झाले. खरेतर ही संधी माझ्यासाठी नेहमीच सौभाग्यदायी असते. ते आमच्या विशाल परिवाराचे कुटुंबप्रमुख सुद्धा आहेत. त्यामुळे समस्या सांगितली की त्यावरील समाधान त्यांच्याकडे हमखास मिळते. दोन गोष्टीत ते कधीही गल्लत करीत नाहीत. जेव्हा पक्षाचा विषय असतो, तेव्हा ते सरकार मध्ये आणत नाहीत आणि जेव्हा सरकारी विषय असतो, तेव्हा पक्ष मध्ये आणत नाहीत. अगदी भेटीच्या वेळेतही पक्ष आणि विकासाचे विषय अशी चर्चेची स्वतंत्र रचना असते.
राममंदिराचे निर्माण, ३७० कलम रद्द करणे, तीन तलाकवर बंदी, गरीब कल्याणाचा कार्यक्रम, सर्जिकल स्ट्राइक, एअर स्ट्राइक,ऑपरेशन सिंदूर यातून त्यांचे कणखर नेतृत्व दिसलेच. महिला, शेतकरी, युवा, वंचित अशा प्रत्येक घटकांसाठी शेकडो निर्णय घेत त्यांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडविले. २५ कोटी लोक दारिद्र्यरेषेवर येणे, ११ वर्षांत गरिबांना तीन कोटी घरे, १५ कोटी घरांना नळजोडणी, १२ कोटी शौचालयांची निर्मिती, ६८ लाख फुटपाथ विक्रेत्यांना पीएम स्वनिधी; अशा कितीतरी योजना सांगता येतील. फक्त एक आकडा पुरेसा आहे. ४३.८ लाख कोटी रुपये थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले. गरीब कल्याणासोबतच देश सुधारणांच्या एका नव्या वाटेवर स्वार झाला आहे.
नरेंद्र मोदीजींची अनेक वैशिष्ट्ये आहेत. पण, त्यातील सर्वांत महत्त्वाचा भाव कुठला असेल तर ते सर्वांत आधी एक स्वयंसेवक आहेत. ते पूर्णवेळ प्रचारक होते. त्यानंतरसुद्धा संघटनमंत्री म्हणून मोठा कालखंड त्यांनी भाजपमध्ये काम केले. पंतप्रधानपदी असताना त्यांनी जो राष्ट्रधर्म, जी कर्तव्यपरायणता जपली; त्याचे रहस्य या त्यांच्या स्वयंसेवकत्वात दडले आहे.
स्वयंसेवक हा कर्मयोगी असतो आणि त्याची निर्णयप्रक्रिया अतिशय साधी, सोपी आणि सरळ असते. अगदी आपल्या दोन मित्रांचेच भांडण सुरू असेल, तर कोणता तोडगा काढला तर त्यात त्या दोघांचे हित सामावले असेल, घरातील एखादा वाद असेल तर कोणता तोडगा संपूर्ण कुटुंबासाठी हितकारक आहे, हे ओळखून त्याप्रमाणे निर्णय घेतला जातो. मोदींवर तर राष्ट्राची जबाबदारी आहे, त्यामुळे राष्ट्रहिताशी ते कधीही तडजोड करीत नाही. ज्यातून राष्ट्रहित साधले जाणार आहे, तोच निर्णय घेण्याकडे त्यांचा कल असतो.
२०१४ मध्ये देशात असलेली प्रचंड अनागोंदी, भ्रष्टाचाराच्या साम्राज्याला कंटाळलेले जनमानस आणि त्यातून देशाला एक नवीन आकार देत, भारताचा चौथ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेपर्यंत झालेला प्रवास... ही संपूर्ण वाटचाल असो की, आज अमेरिकेच्या टॅरिफविरोधात आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशीचा मंत्र घेऊन तितक्याच ठामपणे उभा असलेला भारत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्व कौशल्याचा परिचय आजच्या नव्या भारताने दिला आहे. हा कालखंड पहाता-अनुभवता येणे आणि त्या प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी होता येणे, यासारखे भाग्य नाही.