शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मोदींची ‘मन की बात’ तर राहुल यांची ‘जन की बात’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 03:52 IST

एकरूपता हा मोदींचा तर विविधतेत एकता हा राहुल यांचा मार्ग आहे. देशाची मागणीही विविधता राखून देश एक राहावा ही आहे. आपली मागणी व गरज समजायलाही समाजाला काही काळ द्यावा लागतो. तो त्याला आता मिळाला आहे.

निवडणुकीचा चौथा चरण झाला असून, ती निम्म्यापर्यंत पूर्ण झाली आहे. येत्या काही काळात तिचा सातवा चरण पूर्ण होऊन, ती निकालाच्या मार्गाला लागेल. या संपूर्ण काळात देशाने दोनच नेत्यांना ठळकपणे समोर पाहिले. एक अहंकारतुल्ल नरेंद्र मोदी आणि ‘मी तुमच्याकडे विद्यार्थी म्हणून आलो आहे’ अशी नम्र भूमिका घेतलेले राहुल गांधी. बाकीचे पुढारी त्यांच्या राज्यांच्या प्रादेशिक रिंगणातच तेवढे राहिले. परिणामी, ‘राष्ट्रीय’ कोण आणि ‘प्रादेशिक’ कोण, याचीही कल्पना देशाला आली. त्याहून महत्त्वाची बाब ही की, ही निवडणूक मोदींचे हिंदुत्व अन् राहुल गांधींची सर्वसमावेशक राष्ट्रीयता यात झाली. कडवेपणा, कर्मठपणा, उद्दामपणाला उर्मटपणाची जोड आणि बहुसंख्यांकवादाचा धाक ही या निवडणुकीतील एक बाजू, तर उदारमतवाद, समन्वयाची वृत्ती, नम्रपणाला काही जास्तीचे शिकण्याच्या ओढीची जोड, प्रेम व आत्मीयतेने समाजमन जिंकण्याची वृत्ती आणि बहुसंख्येएवढेच अल्पसंख्यही आपलेच भारतीय आहेत, ही तिची दुसरी बाजू. बाकीचेही धावले, पण थकून जाऊन ते आपल्या कुंपणातच राहिले. त्यातल्या काहींना राष्ट्रीय ओळख होती, पण प्रतिष्ठा व प्रतिमा नव्हती. नावे मोठी होती, पण आवाका लहान होता.

आपल्या गल्लीत, गावात किंवा राज्यातच ते शेर होते. मोदींना आव्हान देण्याचे सामर्थ्य फक्त एकट्या राहुल गांधींनी दाखविले व तेही पातळी आणि सन्मान न सोडता. त्यांनी मोदींना वादविवादाचे आव्हान दिले, पण मोदींना संवाद जमत नाही. ते एकटे बोलतात. बाकीच्यांनी नुसते ऐकायचे असते. याउलट राहुल साऱ्यांशी बोलत होते. साऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत होते. निवडणुकीच्या काळातच मोदींचे सरकार विरोधी पक्षातील नेत्यांवर दावे लावत होते, त्यांच्या घरावर छापे घालत होते आणि त्यांच्यामागे पोलिसांचा ससेमिरा लावत होते. त्याचा कोणताही प्रतिवाद राहुल वा त्यांच्या पक्षाने केला नाही. ‘ते’ असे करणारच. आम्ही मात्र आमचे काम शांततेने करीत राहू, ही त्यांची भूमिका राहिली. सोनिया, प्रियांका व मनमोहन सिंग यांनीही त्यांच्या प्रचारसभांत सभ्यतेची पातळी कायम राखली. उलट मोदी, शहा, योगी, इराणी, गिरीराज आणि सैती सारखे भाजपचे नेते पातळीखाली उतरूनच बोलताना देशाला दिसले.

मोदींनी इतिहास सांगितला, पुराणांचे दाखले दिले, कधी राम तर कधी कृष्ण आणला. सावरकर आणि गोळवलकर आणले. राहुलने शेतकरी व बेरोजगार आणले. बंद पडलेले कारखाने, थंड बस्त्यात पडलेल्या योजना, दलित व अल्पसंख्यांकांवरील हल्ले, स्त्रियांची विटंबना आणि शेतकऱ्यांची दुरवस्था आणली. त्यांची व्यासपीठेच वेगळी होती. मोदी काश्मीरवर बोलले, ते अरुणाचलावर भाष्य करताना दिसले. राहुल देशावर बोलताना आढळले. झालेच तर ही निवडणूक सर्वसाधनसमृद्ध मोदी व अपुऱ्या आणि प्रसंगी मोडक्या साधनानिशी असलेले राहुल यांच्यातील होती, परंतु निवडणुकीच्या आरंभापासूनच मोदींची लोकप्रियता उतरणीला लागलेली, तर राहुलची चढणीला लागलेली दिसली. मोदींना लोक ‘फेकू’ म्हणायचे, मग ‘चौकीदार चोर है’ म्हणू लागले. राहुलला एके काळी ‘पप्पू’ म्हणणारी माणसे ती भाषा विसरली व त्यांची भाषणे मन लावून ऐकू लागली. झालेच तर मोदी ‘मन की बात’ बोलत होते, तर राहुल ‘जन की बात’ बोलताना दिसले. एका अर्थाने हे द्वंद्वयुद्ध झाले. त्यात एक पहिलवान वयस्क, अनुभवी, साधनसंपन्न आणि साऱ्या सामुग्रीनिशी मोठा व बलवान दिसला, तर दुसरा काहीसा नवशिका, पण बुद्धी व मन लावून बोलणारा आणि आपली लढत ही आपली नसून देशाची आहे, हे समजून खेळणारा दिसला. आपल्यासोबत कोण आहे वा नाही, टाळ्या कोण वाजवतो व वाजवीत नाही, याची त्याला काळजी दिसली नाही. मोदी मात्र टाळ्या वाजविणारे, ढोलताशे आणि हारतुरे यासह सारा जामानिमा घेऊनच मैदानात आलेले दिसले. त्यांना काही जागी श्रोते व प्रेक्षक नव्हते, पण त्यांचा आवाज व तयारी तेवढीच होती. राहुल प्रौढांशी प्रौढांसारखे, तरुणांशी तरुणांसारखे आणि मुलींशी त्यांना आवडेल तसे बोलले... देश यातून कुणाला डोक्यावर घेतो हे आता पाहायचे.

नेतृत्व, वक्तृत्व, प्रश्नांची जाण, जनतेशी जुळवून घेण्याची वृत्ती आणि साऱ्या समूहावर आपली छाप (धाक नव्हे) सोडण्याची क्षमता हे कोणत्याही चांगल्या नेत्याचे गुण आहेत. त्यातून भारतासारख्या बहुधर्मी, बहुभाषी आणि संस्कृतीबहुल देशात प्रदेशपरत्वे लोकांचे प्रश्न वेगळे असतात. ज्याला देशाचे नेतृत्व करायचे, त्याला या सगळ्या विविध समूहांशी संवाद साधता आला पाहिजे. त्यातील गरिबांची भाषा बोलता आली पाहिजे आणि ती बोलताना तो साऱ्यांसाठी बोलतो, असे लोकांना वाटले पाहिजे. जवाहरलाल नेहरूंनी गांधींजीविषयी लिहिताना म्हटले, ‘त्यांचे आणि माझे अनेक बाबतीत मतभेद होते, पण हा देश त्यांना जेवढा समजला, तेवढा तो दुसऱ्या कुणालाही समजला नाही, हे मी जाणतो.’ समाज समजावा लागतो, तो समजून घ्यावा लागतो. त्यासाठी आपल्या अहंता बाजूला साराव्या लागतात. मोदी आणि त्यांचा संघपरिवार यांची वृत्तीच ही की, देशाच्याच नव्हे तर साऱ्या जगाच्या समस्या आम्हाला समजल्या आहेत. त्यांची उत्तरे आमच्या उपरण्याचा गाठीत बांधली आहेत आणि आताचा प्रश्न त्या गाठी सोडण्याचा व आपले उपाय त्या प्रश्नांवर चोपडण्याचाच तेवढा आहे. साऱ्या प्रश्नांना एकच उत्तर द्यायचे, तर ते देणे सोपे आहे. ‘साऱ्या समस्यांवर कुराण हा उपाय आहे’ किंवा ‘वेदांमध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरे आहेत’ यासारख्या जुनाट श्रद्धा किंवा सगळ्या निळ्या आकाशाला भगवा रंग फासण्याची आकांक्षा ही याच मानसिकतेची चिन्हे आहेत. याउलट जगातला प्रत्येक माणूस वेगळा व स्वतंत्र आहे. त्याला बुद्धी, ज्ञान व प्रज्ञा आहे, त्याच्या आशाआकांक्षा आहेत, त्या त्याच्या स्वतंत्र इच्छेनुसारच विचारात घेतल्या पाहिजेत, ही आधुनिक जगाची शिकवण व मागणी आहे.

मोदी आणि राहुल यांच्यातील वाद या दोन भूमिकांमधील आहे. एकाच पठडीत वावरणाऱ्या, तीच ती बौद्धिके व भाषणे ऐकून पाठ केलेल्या माणसांना त्यांच्या विषयात उंची येईल, पण अन्य ज्ञानशाखांमध्ये त्यांना स्थान असणार नाही. एकांगी भूमिका घेणारे अनेकांगी प्रश्न सोडवू शकणार नाहीत आणि सारे जग साºया माणसांना एकाच चष्म्याने पाहता येणार नाही. विविधता कायम राखून एकता आणि विविधता मारून एकरूपता या दोन भिन्न विचारसरणी आहेत. त्यातली पहिली लोकशाहीची तर दुसरी हुकूमशाहीची आहे. भारताने लोकशाहीचा स्वीकार केला आहे. त्यासाठी त्याने ब्रिटिशांशी दीडशे वर्षांची झुंज दिली आहे. आपल्याला हवी तशी विविधांगांना न्याय देणारी घटना त्याने बनविली व स्वीकारली आहे. राहुल गांधी हे या नव्या भूमिकेचे प्रतिनिधी आहेत. खरा संघर्ष जुनकट परंपरा टिकविणे आणि देशाला आधुनिक वळण देणे या दोन प्रवृत्तींमधील आहे.

यातली मोदींची प्रवृत्ती पहिली, तर राहुल गांधींची दुसरी आहे. या दोघांतून देशाला आपला नेता निवडून घ्यायचा आहे. २०१९ची निवडणूक ही देशाला नवे वळण देणारी आणि त्याच्या वृत्ती-प्रवृत्तींमध्ये वेगळेपण आणणारी आहे. देश म्हणजे सर्वसमावेशकता आणि राज्य म्हणजे न्याय ही यातली एक वृत्ती आहे, तर देश म्हणजे धर्म वा त्यातील बहुसंख्य लोक ही त्यातली दुसरी प्रवृत्ती आहे. साऱ्यांना एकत्र राखायचे, तर समझोते, तडजोडी आणि देवाणघेवाण यासोबत माणुसकी आणि आत्मीयता या गुणांची गरज आहे. याउलट आम्ही एकटे सांगणारे आणि बाकीचे सारे निमूटपणे ऐकणारे, अशी भूमिका घेणाऱ्यांना फक्त आज्ञाधारक व भयभीतच लागत असतात. स्वतंत्र देशातील नागरिकांना असे निव्वळ आज्ञाधारक वा सत्ताभित राहता येत नाही. त्यांना स्वतंत्र मत असते व ते व्यक्त करण्याचा अधिकार असतो. देशाचा विकास त्यांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाच्या फुलण्यावर व विकसित होण्यावर अवलंबून असतो. त्याला कुणा एकाच्या वा एका संस्थेच्या विचारसरणीत बसविण्याचा प्रकार, हे फुलणे व विकसित होणे थांबविणारा असतो. म्हणून ही निवडणूक महत्त्वाची व त्यातील आपले मतदानही महत्त्वाचे आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी