शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
11
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

अग्रलेख: गांधी युगाची शताब्दी! शंभर वर्षांपूर्वी मांडलेली भूमिका अजरामर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 09:29 IST

काँग्रेसचे बहुमत असतानाही शेड्यूल कास्ट फेडरेशनचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आंबेडकरांची निवड केली गेली. हा गांधी युगाचाच महिमा हाेता

मोहनदास करमचंद गांधी यांचे दक्षिण आफ्रिकेतून १९१५ मध्ये आगमन झाले. आफ्रिकेतील वर्णद्वेषाविरुद्ध त्यांनी दिलेला लढा आणि त्यामागची भूमिका सर्वत्र माहीत झाली होती. भारतात येताच त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यासाठी चालू असलेल्या राष्ट्रीय चळवळीत स्वत:ला झोकून दिले. त्यांचे गुरू गोपाळकृष्ण गोखले यांनी त्यांना संपूर्ण देशाचा प्रवास करण्याचा सल्ला दिला होता. शेतकरी, कामकरी, उपेक्षित वर्गाच्या समस्यांचा प्रभाव त्यांच्यावर पडला. परिणामी, त्यांनी  चंपारण्यातील शेतकऱ्यांच्या लढ्यात भाग घेतला. स्वातंत्र्य लढ्याशी पहिल्यांदाच शेतकरी जाेडणारा हा सत्याग्रह हाेता. गुजरातमधील खेडा येथील सत्याग्रहदेखील त्याचवर्षी लढविला गेला. त्याचे नेतृत्वच गांधी यांनी केले हाेते.

आताच्या उत्तर प्रदेशात असलेल्या गाेरखपूरजवळील चोरीचौरा येथे सत्याग्रहाचा तिसरा  लढा १९२२ मध्ये उभा राहिला. शांततेच्या मार्गाने लढणाऱ्या सत्याग्रहींवर पाेलिसांनी बेछूट गाेळीबार केला. त्याचा प्रतिकार करताना सत्याग्रहींनी पोलिसांवर हल्ला करून काही पोलिसांना ठार केले. गांधींना हा हिंसाचार मान्य नव्हता. त्यांनी तातडीने चाैरीचाैराचा सत्याग्रह स्थगित केला. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अधिवेशन तत्कालीन मुंबई प्रांतातील बेळगाव येथे २६ ते २८ डिसेंबर १९२४ यादरम्यान पार पडले. या अधिवेशनासाठी महात्मा गांधींची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. लाेकमान्य टिळकांचा राष्ट्रीय चळवळीवर, पर्यायाने काँग्रेसवर प्रभाव हाेता. त्यांचे निधन १९२० मध्ये झाले हाेते आणि दुसऱ्या बाजूला शेतकरी, कामकरी, आदिवासी, हरिजन आदी समाजघटकांना स्वातंत्र्य लढ्याच्या मुख्य प्रवाहात आणण्याची एकही संधी महात्मा गांधी साेडत नव्हते.

परिणामी, भारतीय स्वातंत्र्य लढ्याला व्यापक प्रतिसाद मिळू लागला आणि गांधी युगाचा प्रारंभ झाला. विविध सत्याग्रहांतील अनुभवांच्या आधारे महात्मा गांधींनी ‘सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह’ ही त्रिसूत्री मांडायला सुरुवात केली हाेती. टिळक युगात जहाल- मवाळ हा वाद हाेऊन स्वातंत्र्य लढ्यात विभागणी झाली हाेती. बेळगावमधील काँग्रेस अधिवेशनाची शताब्दी आज साजरी केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य लढ्याच्या दीर्घ कालखंडात महात्मा गांधींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एकमेव अधिवेशनाकडे पाहिले पाहिजे. कारण पुढे काँग्रेसची राष्ट्रीय चळवळ याच त्रिसूत्रीने चालविण्यात आली. बेळगावमध्ये शंभर वर्षांपूर्वी झालेल्या काँग्रेस अधिवेशनाचे ऐतिहासिक महत्त्व यासाठी आहे की, याच अधिवेशनात ‘सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह’ या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा निर्णय झाला. ही राष्ट्रीय चळवळ सामान्य माणसांच्या झाेपडीपर्यंत पाेहाेचविण्याचे वळण महात्मा गांधींनी घ्यायला लावले. देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यादिवशी महात्मा गांधी काेलकात्यात उसळलेल्या हिंदू- मुस्लीम दंगली शमविण्यासाठी पायपीट करीत हाेते.

सत्तेचा परीघ  त्यांना कधीच स्पर्श करू शकला नाही. बेळगावचे काँग्रेस अधिवेशन अपवादात्मक ठरले आणि खऱ्या अर्थाने भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील गांधी युग सुरू झाले. त्या अर्थाने आज हाेत असलेले शताब्दी अधिवेशन म्हणजे गांधी युगाचीच शताब्दी आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून आठवे दशक चालू असले तरी त्या स्वातंत्र्यावर गारूड झालेले गांधी युग ना यत्किंचितही कमी लेखले जाऊ शकते, ना इतिहासाच्या पानापानांतून बाजूला करता येते. जगभरातील राजकीय, आर्थिक आणि पर्यावरणीय संघर्ष पाहिले, तर महात्मा गांधींनी बेळगावच्या काँग्रेस अधिवेशनात मांडलेल्या ‘सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह’ या तत्त्वांना आजही तितकेच महत्त्व आहे. गांधी युगापासूनच स्वातंत्र्य लढ्याला व्यापक पाठिंबा मिळू लागला. परिणामी, लाहाेर येथे १९२९ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अधिवेशनात पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मांडला गेला. ही चळवळ पुढे चालू ठेवण्यासाठी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना राज्यघटना तयार करणाऱ्या मसुदा समितीचे प्रमुखपद देण्याचा आग्रह गांधींनी केला. राज्यघटना समितीत काँग्रेसचे बहुमत असतानाही शेड्यूल कास्ट फेडरेशनचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आंबेडकरांची निवड केली गेली. हा गांधी युगाचाच महिमा हाेता.

सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, राजेंद्र प्रसाद, खान माेहम्मद अब्बास खान, खान अब्दुल गफार खान, चक्रवर्ती राजगाेपालाचारी, अनुग्रह नारायण सिन्हा, जयप्रकाश नारायण, आचार्य कृपलानी, माैलाना अब्दुल कलाम आझाद, अशी नेतृत्वाची फळी याच गांधी युगाने उभारली. सध्याच्या द्वेषाच्या आणि धार्मिक उन्मादाच्या पार्श्वभूमीवर शंभर वर्षांपूर्वी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली या अधिवेशनात मांडलेली भूमिका अजरामर झाली. त्यामुळे ही काँग्रेसच्या अधिवेशनाची नव्हे, तर महात्मा गांधी युगाची शताब्दी आहे.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीcongressकाँग्रेस