सारे काही व्यवस्थित असताना सव्वादोनशे प्रवासी व दोन्ही पायलटसह एअर इंडियाच्या बारा कर्मचाऱ्यांना घेऊन अहमदाबादवरून लंडनकडे झेपावलेल्या विमानाच्या दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा अवघ्या सेकंदाच्या अंतराने बंद होतो. साहजिकच इंजिने बंद पडतात. विमानाला पुरेशी उंची गाठता येत नाही. ते कोसळते आणि अतिभीषण विमान अपघाताची नोंद इतिहासात होते. थोडक्यात, प्रतिकूल हवामान, पक्ष्याची धडक किंवा इंजिनासह विमानातील कोणत्याही भागात तांत्रिक बिघाड ही कारणे गेल्या १२ जूनच्या अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरील या भीषण अपघाताला कारणीभूत नाहीत, तर इंधनपुरवठा थांबल्याने दोन्ही इंजिने बंद पडली, असा निष्कर्ष एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्यूरो अर्थात एएआयबीने प्राथमिक अहवालात काढला आहे. हा निष्कर्ष अजिबात पचनी पडणारा नाही, हे स्पष्ट आहे.
कॅप्टन सुमित सभरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर यांच्यातील संवादाचा हवाला या निष्कर्षासाठी एएआयबीने दिला असला तरी खुद्द सरकारचा त्यावर विश्वास दिसत नाही. हवाई वाहतूक मंत्री व राज्यमंत्र्यांनी हा अहवाल प्राथमिक असल्याचे सांगून सारवासारव केली आहे. सरकारच्या या भूमिकेमुळे या अपघाताबद्दलची सुरुवातीपासूनची उदासीनताच ठळक बनली आहे. हे सारे संतापजनक आहे. एक तर प्राथमिक अहवाल बाहेर यायलाच एक महिना लागला. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी, काही छोटे-मोठे उद्योजक, व्यावसायिक, इंग्लंडमधील नातेवाइकांकडे जाणारे भारतीय किंवा कोणत्या तरी निमित्ताने भारतात आलेले इंग्लंडवासी अशा अनेकांचा जीव या अपघातात गेला. अपघातावेळी विमानात असलेल्या २४२ जणांपैकी केवळ एक जण चमत्कारिक पद्धतीने वाचला.
हे विमान लगतच्या वैद्यक महाविद्यालयाच्या इमारतीवर कोसळले. तेव्हा दुपारचे जेवण घेत असलेले विद्यार्थी व कर्मचारी मिळून २९ जणदेखील मरण पावले. विमानाने पेट घेतल्यामुळे मृतदेह जळून कोळसा झाले होते. इतके की डीएनए चाचणीद्वारे त्यांची ओळख पटविण्यासाठी खूप दिवस लागले. तरीही २६० जणांचीच ओळख पटली. हे सारे काळीज पिळवटून टाकणारे असूनही सरकार किंवा विमान वाहतुकीशी संबंधित यंत्रणांची कातडी थरथरली नाही. आधी ब्लॅक बाॅक्स अमेरिकेला पाठवला जाणार असल्याचे सांगितले गेले. नंतर त्याचा इन्कार करण्यात आला. इतक्या गंभीर विषयावर टोलवाटोलवी झाली. आताही एएआयबीचा अहवाल प्राथमिकच आहे आणि त्यात केलेेला दावा कोणालाही फारसा पटणारा नाही.
बोइंग ड्रीमलायनरसारख्या अद्ययावत, आधुनिक विमानाच्या दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा एका सेकंदांच्या अंतराने बंद होणे अगदीच अशक्य कोटीतली गोष्ट म्हणावी लागेल. त्याबाबत एक पायलट दुसऱ्याला विचारतो आणि दुसरा पायलट आपण तसे काहीही केलेले नाही, असे सांगतो. दोघांचे संभाषण काॅकपिट रेकाॅर्डरवर रेकाॅर्ड होते. हे सारे अकल्पित व धक्कादायक आहे. कारण, हजारो तासांच्या उड्डाणाचा अनुभव गाठीशी असलेल्या वैमानिकांच्या हातून अशी घोडचूक होणे शक्य नाही. त्यांनी ते अजाणतेपणी किंवा जाणीवपूर्वक करणेही शक्य नाही. म्हणूनच वैमानिकांच्या संघटनेने हा अहवाल पूर्णपणे फेटाळून लावला आहे. अपघातात मरण पावलेल्या अन्य कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनीही ही शक्यता फेटाळून लावली आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञांनी अशा धक्कादायक अहवालामागे काहीतरी काळेबेरे असावे, असा संशय व्यक्त केला आहे. त्यापैकी बहुतेकांच्या आक्षेपाचा रोख आहे की, हा सारा खटाटोप बोइंग कंपनीला वाचविण्यासाठी आहे.
बोइंग ७८७ ड्रीमलायनर हे दूर अंतरावरील प्रवासासाठी अत्यंत सुरक्षित विमान आहे, असा दावा आणि मोठा प्रचार केला जात असला तरी त्याच्या बांधणीत काही दोष आहेत, असा गाैप्यस्फोट काही व्हिसलब्लोअरनी केला होता. त्याशिवाय बोइंग ७३७ विमानातील असेच दोष उघडकीस आणणाऱ्या व्हिसलब्लोअरचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. हेदेखील महत्त्वाचे की, बोइंग ही शंभर वर्षांपेक्षा जुनी अमेरिकेतील बहुराष्ट्रीय कंपनी आहे. अशा मोठ्या कंपनीचे व्यवहार, आरोप व आक्षेपांना राजकीय कंगोरे असतातच. बोइंग कंपनी तर राजकीय पक्ष, नेत्यांना निवडणुकीसाठी पैसा देते आणि त्याबदल्यात कर चुकविते, असा आरोप आहे. काही वर्षांपूर्वी या मुद्द्यावर अमेरिकेन नागरिकांनी एक मोहीमदेखील उघडली होती. एकंदरीत एएआयबीचा हा अहवाल संशयास्पद ठरतो आणि त्यामुळे अपघाताचे गूढ उकलण्याऐवजी वाढले आहे.