शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

घसरत्या अर्थकारणाचे चटके जसजसे बसू लागतील, तशी लोकांचीही भाषा बदलेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 06:32 IST

सामान्य माणसांना आर्थिक चर्चेत फारसा रस नाही. त्याला देवाधर्माची, मंदिर-मशिदीची व जुन्या सरकारातील लोकांच्या घेतल्या जात असलेल्या सुडाची भाषा अधिक आवडते. अर्थकारण हा लोकचर्चेचा विषय नाही.

देशात सर्वाधिक खप असलेल्या मारुती उद्योग समूहाने गुडगाव व इतर दोन ठिकाणच्या आपल्या कारखान्यांना टाळे लावण्याचा निर्णय घेतला आहे. आयसीआयसी बँक, टाटा स्टील, वेदान्त, एचडीएफसी, टाटा मोटर्स, रिलायन्स उद्योग आणि ओएनजीसी हे एके काळी नफ्यात चालणारे उद्योग व अर्थसंस्था तोट्यात आल्या आहेत. सेन्सेक्स पडल्याने गुंतवणूकधारकांचे अडीच लक्ष कोटी रुपये बुडाले आहेत. आर्थिक वृद्धी थांबून ती अपेक्षेहून खाली गेली. देशभरच्या नागरिकांची क्रयशक्ती कमी झाल्याने बाजार मंदावला. बँकांमधील ठेवी घसरल्या आणि बँकांची वाढ होण्याऐवजी त्या उतरंडीला लागल्या. देशातील मूलभूत उद्योग तोट्यात गेले. अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर पाचव्या क्रमांकावर होती, ती कधीचीच सातव्या क्रमांकावर आली. बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे आणि अनेक लहान-मोठ्या कंपन्यांनी कामगार कपातीला सुरुवात केली आहे. देशाचे हे अर्थचित्र भयकारी आहे, परंतु सरकारला त्याची फिकीर दिसत नाही.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी अर्थकारणाविषयी चिंता व्यक्त करून याला सरकारी धोरणेच जबाबदार आहेत असे म्हटले, तर त्यावर ‘ते काँग्रेसच्या पोपटासारखे बोलत आहेत’ असे भाष्य प्रकाश जावडेकर या मंत्र्याने केले. कोणताही मंत्री, अर्थमंत्र्यासह या स्थितीवर बोलत नाही. खोटी व चढेल आकडेवारी लोकांना ऐकवून जनतेची फसवणूक करण्यातच सारे नेते व माध्यमे गुंतली आहेत. देशाला व सामान्य माणसांना आर्थिक चर्चेत फारसा रस नाही. त्याला देवाधर्माची, मंदिर-मशिदीची व जुन्या सरकारातील लोकांच्या घेतल्या जात असलेल्या सुडाची भाषा अधिक आवडते. त्यामुळे अर्थकारण हा लोकचर्चेचा विषय नाही. मात्र, घसरत्या अर्थकारणाचे चटके जसजसे बसू लागतील, तशी लोकांचीही भाषा बदलेल. सगळ्या विमान कंपन्या बुडीत खाती चालत आहेत. एअर इंडिया ही सरकारी कंपनी विकायला निघाली आहे. बीएसएनएलची सगळी यंत्रणाच बंद होत असल्याने एक लाखांवर लोक बेकार होणार आहेत.

मोटार उद्योगातील ही संख्या १० लाखांवर जात आहे. सामान्य माणसे पगारावर जगतात. हे पगार कमी करण्याचे धोरण अनेक कंपन्यांनी आखले आहे. रिकाम्या जागा त्या भरत नाहीत. सरकारातील नोकरभरतीही थांबली आहे. उद्योगांतील घसरणीमुळे अभियांत्रिकी महाविद्यालये बंद पडत आहेत आणि पदवी घेऊनही तिचा उपयोग काय, असा प्रश्न विद्यार्थ्यांना आताच भेडसावू लागला आहे. व्याजदर कमी केल्याने बँकांतील ठेवीवर मिळणारे व्याज घेऊन जगणारे चिंतेत आहेत, तर व्यापार बसल्याने बँकांमध्ये येणाऱ्या खुल्या ठेवीही कमी झाल्या आहेत. मोटारी व मोटारसायकलींचे खप अनुक्रमे ३५ व ३९ टक्क्यांनी कमी झाल्याने दुकानदारांकडे त्याचे जत्थे पडून आहेत आणि तरीही काही कंपन्या त्यांच्याकडे नवी वाहने नियमितपणे पाठवून त्यांची अडचण वाढवित आहेत. उद्योगांसोबतच शेतीचे क्षेत्रही निराशाजनक आहे. सेवेचे क्षेत्र या दोहोंच्या भरवशावर वाढत असल्याने त्याचीही वाढ खुंटली आहे, परंतु निवडणुका संपल्यापासून सगळे राजकारणी यावर केवळ गप्प राहिले आहेत. सणासुदीच्या दिवसांत ही चर्चा अनिष्ट म्हणूनही ती होत नसावी, पण ज्यांना झळ बसायची, त्यांना ती बसायची थांबत नाही.

मॉल्स रिकामे राहू लागले आणि केवळ औषधांच्या दुकानांतच लोकांची बेसुमार गर्दी वाढलेली दिसत असेल, तर ते अर्थकारणाएवढेच आरोग्याचेही चांगले लक्षण नाही, परंतु लोकांचे लक्ष्य अन्यत्र वेधण्याचे अनेक फंडे सरकारजवळ आहेत. त्यात काश्मीर आहे, ३७० हे कलम आहे, अयोध्येचा खटला आहे, मोदींची भाषणे आहेत, हिंदुत्वाच्या गर्जना आहेत आणि जोडीला भाजपच्या सभासदांची वाढवलेली संख्या आहे. विरोधी पक्ष दुबळे असले की, जनतेपासून काय-काय आणि किती-किती दडवून ठेवता येते, याचे याहून विरळे उदाहरण दुसरे नसेल. राज्यांच्या निवडणुका तोंडावर आहेत, त्यात घोषणाबाजीची स्पर्धा आहे आणि याच सुमारास विरोधी पक्षातील बिलंदर व लोभी माणसे सत्ताधारी पक्षात येत आहेत. तात्पर्य, अर्थकारणाचे मातेरे होत असले, तरी राजकारण व सत्ताकारण जोरात आहे आणि त्याच्या हवेत देशाला काही काळ शांत राहता येणारे आहे.

टॅग्स :Economyअर्थव्यवस्था