शहरं
Join us  
Trending Stories
1
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
2
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
3
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? UAE विरुद्ध खेळणार नसल्याची मोठी माहिती आली समोर
4
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
5
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
6
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
7
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
8
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
9
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
10
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
11
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
12
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
13
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
14
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
15
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
16
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
17
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
18
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
19
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?
20
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र

टोरंटोत सुखद भूकंप ! काही महिन्यांत भारताला मिळू शकतो नवा जगज्जेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 05:37 IST

गेल्या वर्षी थेट जिवंतपणी दंतकथा बनलेल्या विश्वनाथन आनंदला मागे टाकून गुकेश भारताचा क्रमांक एकचा खेळाडू बनला.

भारतीय भूकंपाचे धक्के टोरंटोत बसले आहेत. कारण, ज्यामुळे भूकंप होतो त्या टेक्टोनिक प्लेट्स सरकल्या आहेत... ही वाक्ये बुद्धिबळाचा रशियन सम्राट मानल्या जाणाऱ्या गॅरी कास्पारोव्हची आहेत आणि त्याचा थेट संबंध प्रत्यक्ष भूकंपाशी नव्हे तर गुकेश डी. या अवघ्या सतरा वर्षांच्या भारतीय छोऱ्याने जिंकलेल्या फिडे कॅन्डिडेट्स स्पर्धेशी आहे. या स्पर्धेचा विजेता जगज्जेतापदाच्या लढतीत विद्यमान जेत्याला आव्हान देतो आणि डोम्माराजू गुकेश हा चेन्नईत राहणारा तेलुगू किशोर ही स्पर्धा जिंकणारा जगातील सर्वांत तरुण खेळाडू ठरला आहे. त्याने गॅरी कास्पारोव्हचाच विक्रम इतिहासजमा केला. तोदेखील तब्बल पाच वर्षांच्या फरकाने. 

४० वर्षांपूर्वी, १९८४ मध्ये २२ वर्षांच्या गॅरी कास्पारोव्हने ही स्पर्धा जिंकून अनातोली कारपोव्हला जगज्जेतापदासाठी आव्हान दिले होते. आता पुढच्या विश्वविजेत्याच्या लढतीत चीनच्या डिंग लिरेनपुढे गुकेशचे आव्हान असेल. युरोपियन खेळाडू नसलेली ही अपवादात्मक लढत असेल. अजून या लढतीची तारीख व स्थळ ठरले नसले तरी गुकेशच्या चमत्कारी कामगिरीने जगभर आतापासून तिची चर्चा सुरू झाली आहे. कास्पारोव्हने टेक्टोनिक प्लेट्स सरकल्या, असे जे म्हटले त्यालाही जागतिक बुद्धिबळातील भारताच्या प्रभावाचा लक्षवेधी संदर्भ आहे. भारत व बुद्धिबळ म्हटले की पहिले नाव डोळ्यासमोर येते त्या विश्वनाथन आनंदने स्वत:च्या कामगिरीने बुद्धिबळ घराघरात पोहोचवला, त्याला प्रतिष्ठा मिळवून दिली, तरुण मुलांना प्रेरणा दिली, यशासाठी पाठीवर कौतुकाची थाप तर अपयशानंतर दिलासा दिला, त्या आनंदच्या योगदानाला कास्पारोव्हने दिलेली ही दाद आहे. 

काही महिन्यांपूर्वी रमेशबाबू प्रज्ञानानंदा व त्याही आधी आपल्या नाशिकच्या विदित गुजराथीने जागतिक मंचावर देखणी कामगिरी नोंदविली. यंदाच्या कॅन्डिडेट्स स्पर्धेतही हे दोघे चांगले खेळले. पण, गुकेश अप्रतिम खेळला. गुकेशने प्रज्ञानानंद व विदितला या स्पर्धेतही हरवले. चौदा फेऱ्यांमध्ये पाच विजय, अलिरेझा फिरौजाविरुद्ध एकमेव पराभव आणि आठ बरोबरीतून ९ गुणांसह कॅन्डिडेट्स स्पर्धाच नव्हे तर आनंदसह सगळ्या ज्येष्ठांची मनेही जिंकली. फिरौजाविरुद्ध गुकेश हरल्यानंतर त्याचे सांत्वन करण्यासाठी, उमेद वाढविण्यासाठी आनंद गेला तेव्हा त्याच्या लक्षात आले, की त्याला अशा सांत्वनाची गरजच नाही. वयाच्या मानाने प्रौढ वाटावा, इतका गुकेश मानसिकदृष्ट्या खंबीर आहे. 

स्पर्धा जिंकल्यानंतर गुकेशनेही सांगितले, की त्या पराभवानंतरच आपण विजेतेपद मिळवू शकतो हा आत्मविश्वास आला. बुद्धिबळासाठी स्थिरचित्त वृत्ती, शांत परंतु तितकाच खंबीर स्वभाव अशा ज्या गुणांची आवश्यकता आहे, ती गुकेशमध्ये आहे आणि त्याच बळावर तो अत्यंत वेगाने यशाची एकेक पायरी चढत पुढे निघाला आहे. एखादे यश हुकले तरी त्यावर तो खूप विचार करत बसत नाही. अपयश पाठीवर टाकून जिद्दीने पुढचे सामने खेळतो. जानेवारी २०१९ मध्ये १२ वर्षे, ७ महिने व १७ दिवसांत तो जगातील दुसरा सर्वांत तरुण ग्रॅण्डमास्टर बनला. सर्जेई कर्जाकिन याचा विक्रम अवघ्या १७ दिवसांच्या फरकाने हुकला. परंतु, त्याची खंत करीत तो बसला नाही. गुकेशचे कुटुंब मूळचे आंध्र प्रदेशातील गोदावरी डेल्टा भागातील रहिवासी. वडील रजनीकांत हे कान-नाक-घसा सर्जन, तर आई पद्मा मायक्रोबायोलॉजिस्ट. चेन्नईत त्यांचा व्यवसाय आहे. सातव्या वर्षांपासून तो बुद्धिबळाकडे वळला असला आणि नववा वाढदिवस साजरा करण्याआधीच एशियन स्कूल चेस चॅम्पियनशिप जिंकली असली तरी त्याची जागतिक स्तरावरील झेप हा अवघ्या दीड-दोन वर्षांतला चमत्कार आहे. 

२०२१ च्या ऑगस्टमध्ये तो ३११ व्या स्थानी होता. वर्षभरात चक्क ३८ व्या स्थानी पोहोचला. त्यानंतरच्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमधील नेत्रदीपक कामगिरीने त्याला पुढच्या ऑगस्टमध्ये टॉप-२० मध्ये पोहोचविले. त्यानंतर महिनाभरात त्याने २७०० गुणांकनाचा टप्पा गाठला आणि ही कामगिरी करणारा बुद्धिबळ इतिहासातला तो तिसरा सर्वांत तरुण खेळाडू ठरला. महिनाभरानंतर, ऑक्टोबर २०२२ मध्ये त्याने विश्वविजेता मॅग्नस कार्लसनला पराभूत केले. जगज्जेता बनल्यानंतरचा कार्लसनचा तो पहिला पराभव होता. गेल्या वर्षी थेट जिवंतपणी दंतकथा बनलेल्या विश्वनाथन आनंदला मागे टाकून गुकेश भारताचा क्रमांक एकचा खेळाडू बनला. दरम्यान, आपला १७ वा वाढदिवस गुकेशने पुन्हा कार्लसनला पराभूत करून साजरा केला आणि तो जागतिक मानांकनात टॉप-१० मध्ये पोहोचला. गुकेशची ही घोडदौड पाहता काही महिन्यांत भारताला नवा जगज्जेता मिळू शकतो. त्यासाठी गुकेशला शुभेच्छा देऊया!

टॅग्स :Chessबुद्धीबळ