शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
6
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
7
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
8
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
9
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
10
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
11
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
12
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
13
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
14
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
15
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
16
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
17
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
18
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
19
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
20
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!

मुस्लिमांनी संस्कृत शिकलेलं चालतं, मग शिकवलेलं का चालत नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 06:33 IST

मुस्लिमांनी संस्कृत शिकलेले चालते, पण शिकविलेले चालत नाही ही अकलेची दिवाळखोरी आहे. निवडणुकांत भरघोस यश मिळाल्याने या मंडळींना ‘हिंदू राष्ट्रा’ची स्वप्ने पडू लागली आहेत. पण ते अशा क्षुद्र आणि भिक्कार विचारांच्या पायावर असेल तर कसे चालेल?

केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा असलेल्या बनारस हिंदू विद्यापीठात एका मुस्लिमाला संस्कृतचा प्राध्यापक नेमले जाण्यावरून तेथील विद्यार्थ्यांचे आंदोलन भारताला लाज आणणारे आहे. गेल्या काही वर्षांत हिंदुत्ववाद्यांनी सत्ताकारण व प्रशासनावर पगडा बसविला आहेच. पण त्यांनी आता विद्यादानाच्या पवित्र क्षेत्रातही नादानपणा सुरू करावा, ही घोर चिंतेची बाब आहे. संस्कृतमध्ये डॉक्टरेट मिळविलेल्या फिरोज खान या तरुणाची १० अर्जदारांमधून संस्कृत विद्याधर्म विज्ञान विभागाच्या साहित्य शाखेत साहाय्यक प्राध्यापकपदी गुणवत्तेवर निवड झाली. एका मुस्लिमाने आपल्याला देववाणी संस्कृत शिकवावी यास विरोध करून तेथील सुमारे २५० विद्यार्थ्यांनी उघड आंदोलन सुरू केले. याला संघ परिवारातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची फूस आहे, हे लपून राहिलेले नाही.

नाही म्हणायला विद्यापीठाचे कुलगुरू राकेश भटनागर यांनी फिरोज खान यांचे समर्थन केले असले तरी बेशिस्त, वाह्यात विद्यार्थ्यांना ते वठणीवर आणू शकलेले नाहीत. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय या वादात गप्प आहे, हे कदाचित त्याचे कारण असावे. बिच्चारे फिरोज खान, जीवाच्या भीतीने, मोबाइल फोनही बंद करून, मूळ गावी निघून गेले आहेत. विद्यार्थी वर्ग घेऊ देत नाहीत आणि विद्यापीठ प्रशासनही ‘तुम्ही व्हा पुढे, आम्ही पाहतो कोण अडवते ते,’ अशी खंबीर भूमिका घेत नाही. पहिली गोष्ट म्हणजे आपला अध्यापक कोण असावा, कोणत्या धर्माचा असावा, हे विद्यार्थ्यांनी ठरवणे ही तद्दन मुजोरी आहे.
मुस्लिमांनी संस्कृत शिकलेले चालते, पण शिकविलेले चालत नाही ही अकलेची दिवाळखोरी आहे. याच हिंदुत्ववाद्यांनी राजस्थानमध्ये सरकारी संस्कृत विद्यालये सुरू केली. त्यात बहुसंख्य विद्यार्थी मुस्लीम असल्याचे अभिमानाने सांगितले जाते. संस्कृत भाषा ही कोणाही एका समाजवर्गाची किंवा धर्माची मक्तेदारी नाही. अभिजात संस्कृत साहित्य हा अभिमानास्पद जागतिक वारसा आहे. उद्या कोणी हिंदू वैदिक पौरोहित्य सेवा पुरविणारी कंपनी काढली व त्यात एखादा मुस्लीम ‘भटजी’ नोकरीवर ठेवला किंवा सरकारी देवस्थान असलेल्या पंढरपूर किंवा सिद्धिविनायक मंदिरात मुस्लीम पुजारी नेमला तर हिंदू धर्माचा विटाळ झाला, अशी ओरड रास्त ठरेल का?
जर्मन कवी गटे कालिदासाचे अभिजात शाकुंतल डोक्यावर घेऊन नाचल्याचा टेंभा मिरविणारे हेच धर्म आणि संस्कृतीरक्षक मॅक्समुुलर या संस्कृत विद्वानाचा ‘पं. मोक्षमुल्लर’ म्हणून गौरव करतात. पूर्वी याच कर्मठ मंडळींनी संस्कृत ही फक्त ब्राह्मणांनी शिकण्याची भाषा आहे, असा माज केला होता. आपल्याकडे ज्ञानेश्वर माउलींना सुबोध भाषेत ज्ञानेश्वरी कथन करण्याची गरज त्यामुळेच भासली. संस्कृतचे शुद्ध उच्चार करता येत नाहीत त्यांना ‘म्लेच्छ’ म्हणून हिणवणे, याच काळात सुरू झाले. पुढे हा शब्द फक्त मुस्लिमांना वापरण्याची विकृती आली. मुघलांच्या काळात जीवाच्या भीतीने किंवा मानमरातबाच्या लालसेने औरंगजेबाचा भाऊ दारा शुकोह याला संस्कृत शिकविण्यासाठी काशीच्या पंडितांमध्ये चढाओढ लागल्याचे दाखले इतिहासात मिळतात. या दाराने ५२ उपनिषदांचे फारसीमध्ये भाषांतर केल्याने संस्कृत विटाळली नाही की हिंदू धर्म बाटला नाही.
ब्रिटिशांचा अंमल सुरू झाल्यावरही अनेक पंडित सोवळे नेसून साहेबाला संस्कृत शिकवायला त्याच्या घरी जात असत. अनेक ब्रिटिश अभ्यासकांनी संस्कृत-इंग्रजी शब्दकोष प्रसिद्ध केले. ब्रिटिशांनी तर संस्कृत पाठशाळा सुरू केल्या. पोटभरू संस्कृत शिक्षक तेथे रुजू झाले. हा सर्व पूर्वेतिहास पाहता आता बनारस हिंदू विद्यापीठातील निंद्य प्रकारामागे धर्म हेच एकमेव कारण आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. लागोपाठ दोन निवडणुकांमध्ये भरघोस यश मिळाल्याने या मंडळींना ‘हिंदू राष्ट्रा’ची स्वप्ने पडू लागली आहेत. पण त्यांच्या कल्पनेतील ‘हिंदू राष्ट्र’ अशा क्षुद्र व भिक्कार विचारांच्या पायावर उभे राहणार असेल तर अशा कलुषित ‘हिंदू राष्ट्रा’त भारतमाताही नांदायला तयार होणार नाही!