‘देवाच्या दारी मरण यावे’ अशी अनेक श्रद्धावान लोकांची भाबडी भावना असते. हेच मरण श्रेष्ठ मानले जाणार असेल तर कुणाही सरकारला धार्मिक स्थळी होणाऱ्या चेंगराचेंगरीचा व मृत्यूंचा खेद वाटायचा प्रश्नच उरत नाही. भाविकांचे असे मरण पाहत देव गाभाऱ्यात निर्धास्त असतो अन् सरकारही अशा मृत्यूंचा दोन-चार दिवस शोक पाळून नंतर बिनघोर झोपते. तिरुपती देवस्थानमध्ये बुधवारी रात्री चेंगराचेंगरी होऊन सहा भाविकांचा मृत्यू झाला, तर चाळीस जण जखमी झाले. वैकुंठ एकादशीच्या पार्श्वभूमीवर दर्शन मिळावे यासाठी भाविकांनी टोकन केंद्रांवर गर्दी केली होती. त्यावेळी एका केंद्रावर ही चेंगराचेंगरी झाली.
अशी घटना प्रथमच घडली असे नव्हे. उत्तरप्रदेशातील हाथरस येथे गेल्याच वर्षी भोलेबाबाच्या सत्संगात चेंगराचेंगरी होऊन १२१ लोक दगावले. मथुरा, केरळमधील सबरीमाला मंदिर, जम्मूमधील वैष्णोदेवी, साताऱ्यातील मांढरदेवी या धार्मिकस्थळी व अगदी कुंभमेळ्यातही चेंगराचेंगरी होऊन लोकांचा मृत्यू होण्याच्या घटना घडलेल्या आहेत. अफवांमुळेही अशा घटना घडल्या. मुस्लीम धर्माचे पवित्र स्थळ असलेल्या मक्का-मदिना येथेही सैतानाला दगड मारण्याच्या प्रथेवेळी चेंगराचेंगरी होऊन लोकांचा मृत्यू झाला. उत्तर टांझानियात एका चर्च सेवेदरम्यान चेंगराचेंगरीत २०२० साली वीस लोक दगावले. एका उपदेशकाने पवित्र तेल असल्याचे सांगत ते जमिनीवर ओतले. ते घेण्यासाठी गर्दी उसळली व चेंगराचेंगरी झाली. या घटनांनी धर्मांच्या सीमा ओलांडल्या आहेत. गर्दी, गैरव्यवस्थापन, अफवा, अंधश्रद्धा, चेंगराचेंगरी या सर्वधर्मीय बाबी आहेत. त्यावर विशिष्ट धर्माचा शिक्का नको.
केवळ गर्दीमुळे व चेंगराचेंगरीमुळेच घटना घडतात, असेही नव्हे. शासनाच्या ‘महाराष्ट्र भूषण’ कार्यक्रमात उष्माघाताने लोक दगावल्याचा इतिहास आहे. चेंगरांचेंगरीतील मृत्यू बहुतेक वेळा सामान्य माणसांच्या वाट्याला येतात. व्हीआयपी, बाबा, धर्मगुरू कधीही अशा गर्दीत नसतात. त्यांचे मार्ग आरक्षित असतात. आपले देवही नेमके अशा जागांवर विराजमान आहेत की जेथे डोंगरदऱ्या, अरुंद रस्ते आहेत. शहरांना-गावांना बायपास करणारे ‘बाह्यवळण’मार्ग आले. अनेक गावांनी स्वत:ला उड्डाणपुलांखाली झाकून घेत गर्दीपासून अलग करून घेतले. पण, देवतांना ‘बायपास’ कसे करणार? हा धार्मिक व श्रद्धेचा मामला आहे. ‘गुगल’ आता लोकांना रस्ता दाखवते. एखाद्या गावात सण, उत्सव असेल तर वाहतूक अन्य मार्गाने वळवली जाते. लोकही अशावेळी घराबाहेर पडणे टाळतात. पण धार्मिक स्थळांचे असे नव्हे. वैकुंठ-पुत्रदा एकादशीलाच भाविकांना दर्शन हवे असते.
देव विशिष्ट मुहूर्तालाच भेटतो, ही एक अंधश्रद्धाही आपल्याकडे आहे. परिणामी गर्दी मुहूर्त साधते. गर्दी नियंत्रणासाठी आधुनिक प्रणालीचा वापर करावा याची गरज ना अद्याप देवस्थानांना वाटते, ना सरकारला. ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ नावाची व्यवस्था आली आहे. पंढरपूरच्या वारीचे नियंत्रण करण्यासाठी ‘एआय’चा वापर आता विचाराधीन आहे. मुंबई विद्यापीठाने मंदिर व्यवस्थापन अभ्यासक्रम सुरू केला आहे. हे उपक्रम स्वागतार्हच, पण मुद्दा मानसिकतेचाही आहे. काल-परवा माजी खासदार सुजय विखे यांनी ‘साईदरबारी फुकट भोजन मिळते म्हणून शिर्डीत भिकाऱ्यांची गर्दी उसळली आहे’ असे विधान केले. त्यांच्यावर लागलीच टीका झाली. पण, मोफत अन्नछत्रांऐवजी हा पैसा शिक्षणावर खर्च करायला हवा या त्यांच्या अपेक्षेत गैर काय आहे? प्रबोधनकार ठाकरे म्हणाले होते, ‘हिंदुस्थान दरिद्री झाला, पण देवळांत संपत्ती अपार आहे.
दुष्काळात लोक अन्नान करून मेले, तरी देवळातल्या दगडधोंड्यांना शिरा, केशरीभाताचा त्रिकाळ नैवेद्य अखंड चालूच आहे’. संतांची व ठाकरेंची प्रबोधन परंपरा आजचा महाराष्ट्र व देशही का स्वीकारायला तयार नाही? ‘महाराष्ट्र येथे का थांबतो?’ हा प्रश्न आहेच. आपली मुले कोणत्या इयत्तेत शिकतात हे ठाऊक नसलेले लोक तिथी, मुहूर्त मात्र पाठ करून ठेवतात. तात्पर्य एकच, गर्दीचे नियंत्रण सरकारने करायला हवेच. पण, समाजाने मनाचे नियंत्रण करावे.
प्रदूषण टाळण्यासाठी व इंधन बचतीसाठी सार्वजनिक वाहनांचा पर्याय आला, तसे धार्मिक स्थळी पाळल्या जाणाऱ्या सोहळ्यांना, मुहूर्तांनाही पर्याय हवेत. देवाची शेजारती, धुपारती सुरू आहे म्हणून दर्शन बंद. पूजा सुरू आहे म्हणून मंदिर बंद. अशा अनेक प्रथा आहेत. या प्रथांमुळे भक्त ताटकळणारच. देवदर्शनाचे असे ‘शटडाउन’ चालूच राहिले तर रांगा, गर्दी वाढणारच. आपत्ती व्यवस्थापनाची सुरुवात या धार्मिक बाबींपासून करायला हवी. म्हणून देवाच्या दारी प्रबोधन हवे, मृत्यू नकोत.