शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

खराताची राजकीय वरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 09:37 IST

...न्यायव्यवस्थेने त्याचा चाैरंग करायला हवा आणि भोंदू भोगसम्राटांच्या पायावर झुकणाऱ्या राजकीय नेत्यांना जनतेने रोकडा जाब विचारायला हवा.

दावुनि वैराग्याची कळा । भोगी विषयाचा सोहळा I। - या तुकोबारायांच्या पंक्तींची तंतोतंत प्रचिती देणारी खळबळजनक घटना नाशिकमध्ये उघडकीला आली आहे. स्वतःला ‘कॅप्टन‘ म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात नावाच्या वासनांध भोंदूबाबाच्या लीलांचे गलिच्छ तपशील बाहेर आल्याने लोक संतापले आहेत. पतीच्या मृत्यूची भीती दाखवून एका महिलेवर अत्याचार, सोबत तब्बल ५८ व्हिडिओ अशा काळ्या कृत्याचे या खराताचे भांडे तर फुटलेच, वरून आपली राजकीय व्यवस्था किती किडलेली, सारासार विवेक गमावलेली आहे, हेही चव्हाट्यावर आले. हा केवळ एका गुन्हेगाराचा भांडाफोड नाही; तो राजकीय वास्तवाचे सडलेले प्रतिबिंब दाखवणारा आरसा आहे. 

महिलांचे शोषण, मानसिक गुलामी, अंधश्रद्धेच्या नावाखाली विकृत कारभार हे सारे संतापजनक आहेच; पण त्याहून अधिक धक्कादायक आहे ती या बाबाच्या दरबारात बडे राजकीय नेते, उच्च पदस्थांची लागणारी रांग. समस्यांनी ग्रासलेला, परिस्थितीने पिचलेला सामान्य माणूस अशा बुवाबाबांच्या आश्रयाला जाणे, त्यांच्या कच्छपी लागून सर्वस्व गमावण्याइतका आंधळा व हतबल होणे एकवेळ समजून घेता येईल. पण ज्यांच्या हाती सत्ता, संपत्ती, यंत्रणा अशी सारी सूत्रे आहेत, त्या बड्या नेत्यांनी या असल्या टीनपाट भोंदूंच्या मागे का लागावे? या मंत्री-संत्री लोकांची अशी काय हतबलता असते की भलत्या चमत्कारांचे दावे करणाऱ्या कुण्या बाबाचे पाय धुवून पुसण्याची गरज त्यांना भासावी? मुख्यमंत्री, मंत्री वा तत्सम पदे भूषविलेले सत्ताधारी- विरोधक, पुरुष-महिला या सगळ्यांचीच या खराताच्या ‘दरबारात’ लागणारी उपस्थिती केवळ योगायोग नाही. त्यामागे प्रामुख्याने तीन कारणे असतात - असुरक्षितता, लालसा आणि काळे व्यवहार. सत्तेवरील लोकांना भीती असते ती सत्ता गमावण्याची.निवडणूक जिंकायची, खुर्ची टिकवायची, प्रतिस्पर्ध्याला हरवायचे या सगळ्यासाठी ‘काहीही’ करण्याची  मानसिकता प्रसंगी कोणत्या टोकाला जाते याचे सांप्रत काळीचे दाखले कित्येक हजार. पण अंधश्रद्धेच्या कर्दमात सामान्यांना लोटून सर्व प्रकारचे भोग सुखनैव भोगणाऱ्या असल्या बाबांच्या पायी लीन होणारे, त्यांची पूजा-अर्चा करणारे राजकीय नेते ही ऱ्हासाची नक्की कोणती पातळी म्हणायची? हे सत्ताधारी किंवा सत्तेच्छू लोक चक्क वासनांधांच्या दरबारात हजेरी लावून असे लवलवून वाकतात याचे दुसरे कारण लालसा. सत्ता, तिच्यातून मिळणारा अमाप  पैसा आणि वाढता प्रभाव यातून आपण कुणाला प्रतिष्ठा देतो आहोत, हे समजून घेण्याचे भान राहात नाही. तिसरे कारण आहे काळे व्यवहार लपवण्याची धडपड. काळा पैसा पांढरा करण्यासाठी, चौकशा थांबवण्यासाठी किंवा ‘वरच्या’ स्तरावरून संरक्षण मिळवण्यासाठी अशा भोंदूंचा वापर केला जातो, हे आता गुपित राहिलेले नाही. 

अशोक खरात प्रकरणात पुढाऱ्यांच्या या जवळिकीपेक्षा अधिक धक्कादायक आहे ते, ज्यांच्यावर राज्यभरातील महिलांच्या संरक्षणाची घटनादत्त जबाबदारी त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर याच कथित ‘कॅप्टन’च्या देवस्थानाच्या विश्वस्त असाव्यात आणि महिलांचे शोषण करणाऱ्या या बाबासोबतचे त्यांचे व्हिडिओ, छायाचित्रे अटकेनंतर काही तासांत सोशल मीडियात यावीत! म्हणून किमान या भोंदूच्या काळ्या कृत्याचा न्यायनिवाडा न्यायालयात होईपर्यंत नैतिक जबाबदारी म्हणून महिला आयोगाच्या अध्यक्षांनी पद सोडायला हवे. खरात प्रकरणाच्या तपशिलांमुळे एकीकडे सामान्य माणूस संतापलेला असताना त्यातल्या त्यात सकारात्मक बाब म्हणजे नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी राजकीय दडपणाला न जुमानता केलेली कारवाई. ही केवळ एका आरोपीवरची कारवाई नाही; ती व्यवस्थेतल्या कणखरपणाची झलकदेखील आहे. मात्र, अशी कारवाई अपवाद न ठरता नियम ठरावा. 

या प्रकरणात फक्त अशोक खरात नावाचा इसम दोषी नाही. त्याच्या दरबारात उपस्थित राहून त्याला वैधता, प्रतिष्ठा देणारे राजकीय चेहरेही तितकेच जबाबदार आहेत. ‘आम्ही फक्त दर्शनाला गेलो होतो’ हा त्यांचा बचाव आता यंत्रणेने आणि जनतेनेही चालवून घेता कामा नये. ज्यांनी विवेक, विज्ञाननिष्ठा आणि कायद्याचा आदर राखायचा, तेच जर अंधश्रद्धेच्या पायाशी लोटांगण घालत असतील, तर सामान्य माणसाने कोणावर विश्वास ठेवायचा? गावोगावी भोंदूबाबा उगवतात, कारण त्यांना पोसणारी राजकीय माती सुपीक असते. ती माती बदलली नाही तर आजचा खरात जाईल आणि उद्या दुसरा ‘कॅप्टन’ उभा राहील. कदाचित आणखी प्रभावी, आणखी धोकादायक. तेव्हा या थोतांडाचा निकाल जनतेच्या दरबारातही लागला पाहिजे. न्यायव्यवस्थेने त्याचा चाैरंग करायला हवा आणि भोंदू भोगसम्राटांच्या पायावर झुकणाऱ्या राजकीय नेत्यांना जनतेने रोकडा जाब विचारायला हवा. 

टॅग्स :Nashikनाशिक