जगातील सर्वात सोपी गोष्ट जर कोणती असेल, तर ती आहे सल्ले देणे. अलीकडे तर फुकटच्या सल्ल्यांना खूपच उधाण आले आहे. कोणीही उठतो आणि सल्ले देऊन मोकळे होतो. राजकारणी लोकांनी तर असे सल्ले देण्यात कहरच केला आहे. ते आधी आणि आताही आश्वासने द्यायचे आता त्याची मात्रा लागू पडत नाही म्हणून की काय सल्ले देण्याचा मार्ग पत्करल्याचे दिसून येते. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्त्या लक्षात घेता वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून मराठवाड्यात ज्ञानोबा-तुकोबा आधार दिंडी काढण्यात आली. त्या दिंडीचा समारोप विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या रोखण्याची ताकद वारकरी संप्रदायात व भजन - कीर्तनात आहे. नापिकी व कर्जबाजारीपणामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना धीर देऊन त्यांना सकारात्मक दृष्टिकोन दिला पाहिजे असे आवाहन हरिभाऊंनी केले. मोठा आर्थिक भार आणि न परवडणारी शेती हे आत्महत्त्येमागचे प्रमुख कारण असल्याचे सांगायलाही ते विसरले नाहीत. काही अघटित घडले की नेतेमंडळी घटना कशी घडली, का घडली याचा ऊहापोह करतात, मात्र भविष्यात त्या घटना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कोणताही नेता छातीठोकपणे सांगताना दिसत नाही. वास्तविक हरिभाऊ हे भारतीय जनता पार्टीतील वरिष्ठ नेते आहेत आणि केंद्रात व राज्यात त्यांच्याच पक्षाचे सरकार आहे. असे असताना त्यांनी सरकारचे प्रतिनिधी या नात्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या रोखण्यासाठी आम्ही काय करणार आहोत किंवा मी स्वत: शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकविलेल्या शेतमालाला हमीभाव कसा मिळवून देता येईल हा मुद्दा पक्षश्रेष्ठींसमोर मांडणार असल्याचे जरी सांगितले असते तरी ते वारकरी साहित्य परिषदेच्या आधार दिंडीला आधार दिल्यासरखे झाले असते. नुसत्या आवाहन आणि सल्ल्याने प्रश्न निकाली थोडीच निघतात.
आवाहन करणे सोपे
By admin | Updated: February 2, 2016 03:09 IST