अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा सत्ता मिळवली खरी, पण त्यांच्या या नव्या सत्ताकाळात त्यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागतं आहे. सत्तेत आल्यानंतर पहिल्या वर्षभराच्या आतच त्यांच्या लोकप्रियतेत प्रचंड घट झाली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळाला एक वर्षही पूर्ण झाले नसताना अमेरिकन मतदारांनी त्यांचा ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’चा नारा फिका केला आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये डेमोक्रॅट्सनी न्यू जर्सी, व्हर्जिनिया आणि कॅलिफोर्निया येथे ऐतिहासिक विजय मिळविला. या निकालांमुळे २०२६ मधील मध्यावधी निवडणुकांसाठी ट्रम्प व रिपब्लिकन पक्षाच्या स्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आर्थिक अडचणी, जीवनशैलीची ‘वाढती’ किंमत आणि सर्वसामान्य जनतेच्या समस्या या सर्वच आघाड्यांवर ट्रम्प प्रशासन तोंडावर आपटलं आहे. यासंदर्भात झालेल्या एका नव्या सर्वेक्षणानुसार, अमेरिकेतील बहुतांश लोक देशाच्या दिशेबद्दल आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या कामकाजाबद्दल नाराज आहेत. अर्थव्यवस्था आणि महागाई या प्रमुख चिंता आहेत. ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या अधिकारांचा विस्तार केल्याबद्दलही लोकांमध्ये चिंता आहे.
अमेरिकन नागरिक सध्या देश ज्या दिशेनं चालला आहे त्याबद्दल आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारभाराबद्दल अतिशय असमाधानी आहेत. ही नाराजी अर्थव्यवस्था ते स्थलांतर या महत्त्वाच्या मुद्दयांपर्यंत पोहोचली आहे. या सर्वेक्षणानुसार ६७ टक्के अमेरिकी मानतात की, देश चुकीच्या मार्गावर चाललाय. ९५ टक्के डेमोक्रॅट्स आणि ७७ टक्के स्वतंत्र मतदार मानतात की, ट्रम्प देशाचं गाडं चुकीच्या दिशेनं हाकताहेत. यामुळे देशाचं मोठं नुकसान होईल. खुद्द ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या २९ टक्के मतदारांनाही वाटतंय की, ट्रम्प उधळलेत. मनमानी आणि हटवादी पद्धतीनं ते देशाला वाट फुटेल तिकडे घेऊन जाताहेत.
८७ टक्के कृष्णवर्णीय, ७१ टक्के हिस्पॅनिक आणि ७१ टक्के आशियाई अमेरिकनांचंही हेच मत आहे. ६१ टक्के श्वेत अमेरिकन या मताशी सहमत आहेत. अर्थव्यवस्था आणि महागाई या लोकांच्या सगळ्यात मोठ्या चिंता आहेत. ५२ टक्के अमेरिकन्स मानतात की, ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर अर्थव्यवस्था बिघडली आहे.
५०,००० डॉलर्सपेक्षा कमी कमाई असणाऱ्या दहापैकी सुमारे सहा लोकांना वाटतं की, त्यांची आर्थिक स्थिती आधीपेक्षा वाईट झाली आहे. सुमारे ६० टक्के लोक सध्याच्या महागाईसाठी ट्रम्प यांना जबाबदार धरतात. यांपैकी एकतृतीयांश लोक तर म्हणतात, ट्रम्प यांनी सर्वसामान्य लोकांचं आणि देशाचंही वाटोळं केलं आहे. रिपब्लिकन मतदारांपैकीही पाचपैकी एक व्यक्ती ट्रम्प यांना दोषी मानते. ३७ टक्के लोक सांगतात, आमची स्थिती ‘ना घर का, ना घाट का’ अशी झाली आहे. ४५ टक्के लोक म्हणतात, आमच्या दुर्दैवाचे दशावतार आहे तसेच, मागच्या पानावरून पुढे सुरू आहेत. ट्रम्प यांच्या कामगिरीवर ५९ टक्के लोक नाराज आहेत. त्यांच्याबद्दलची तीव्र नाराजी (४६ टक्के) ही त्यांच्याबद्दलच्या तीव्र प्रशंसेपेक्षा (२० टक्के) दुपटीहून अधिक आहे. बहुतांश लोक टॅरिफ, अर्थव्यवस्था आणि फेडरल सरकारच्या व्यवस्थापनावर, त्यांच्या कामगिरीबद्दल अतिशय असमाधानी आहेत.
Web Summary : Trump faces challenges as his popularity declines within a year of his second term. Democrats' victories signal trouble for Republicans in upcoming elections. Economic woes and public dissatisfaction plague his administration, with many Americans believing the country is on the wrong track.
Web Summary : ट्रम्प को चुनौतियों का सामना करना पड़ रहा है क्योंकि उनके दूसरे कार्यकाल के एक साल के भीतर ही उनकी लोकप्रियता घट गई है। डेमोक्रेट्स की जीत आगामी चुनावों में रिपब्लिकन के लिए परेशानी का संकेत देती है। आर्थिक संकट और सार्वजनिक असंतोष उनके प्रशासन को त्रस्त कर रहे हैं, कई अमेरिकियों का मानना है कि देश गलत रास्ते पर है।