- अनय जोगळेकर (आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक)फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची बहुप्रतीक्षित भारतभेट होणार आहे. याबाबत अधिकृत घोषणा झाली नसली तरी २४-२६ फेब्रुवारी दरम्यान ती असेल असा अंदाज आहे. ही भेट केवळ भारत आणि अमेरिका संबंधांच्या दृष्टीनेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीसाठीही महत्त्वाची असेल.ट्रम्प यांनी आपल्या बेताल वक्तव्यांनी तसेच धरसोड वृत्तीने पारंपरिकदृष्ट्या अमेरिकेच्या अनेक मित्रराष्ट्रांशी संबंध बिघडवले. भारताने मात्र ट्रम्प यांच्या कलाकलाने घेऊन अलगदपणे आपले हितसंबंध पुढे सरकवले. ट्रम्प प्रशासनाने आशिया-पॅसिफिक भागास हिंद-प्रशांत क्षेत्र असे म्हणायला सुरुवात करून या भागावर असणाऱ्या भारताच्या प्रभावाला मान्यता दिली. ट्रम्प यांनी २०१९ सालच्या प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून यावे यासाठी भारताने प्रयत्न केले होते. पण अमेरिकेतील अंतर्गत राजकारणात व्यस्त राहिल्यामुळे ट्रम्प येऊ शकले नाहीत.गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने स्वबळावर ३०० चा आकडा पार केल्यानंतर आपल्या दुसºया टर्ममध्ये मोदी सरकारने संघ परिवाराला वैचारिकदृष्ट्या जवळच्या विषयांवर निर्णय घ्यायचा सपाटा लावला आहे. त्रिवार तलाक दंडनीय अपराध घोषित करणे, जम्मू आणि काश्मीरमधून कलम ३७० च्या तरतुदी हटवणे, सर्वोच्च न्यायालयाकडून रामजन्मभूमीच्या मुद्द्यावर निर्णय येणे, ते या वर्षीच्या सुरुवातीला लागू झालेला नागरिकत्व संशोधन कायदा यामुळे देशातील राजकारण ढवळून निघाले. यावर आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या माध्यमांनी मोदी सरकारवर कडवट टीका केली आहे.
अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुका आता १० महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना अध्यक्षीय निवडणुकीतील विजयासाठी, संभाव्य प्रतिस्पर्धी जो बायडन यांच्याविरुद्ध पुरावे गोळा करण्यासाठी ट्रम्प यांनी युक्रेनच्या अध्यक्षांवर दबाव टाकल्याच्या आरोपावरून ट्रम्प यांच्या विरोधात पदच्युतीची सुनावणी चालू आहे. सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाचे बहुमत असल्याने ट्रम्प यांच्या खुर्चीला धोका नसला तरी त्यांनीच हकालपट्टी केलेले माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन आपल्याकडील संवेदनशील माहिती माध्यमांना पुरवून ट्रम्प यांची बदनामी करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. त्यामुळे ट्रम्प यांच्यासाठीही वॉशिंग्टनबाहेर पडून प्रसिद्धीच्या झोतात येण्याची गरज आहे. त्यातून त्यांच्या भारतभेटीच्या कल्पनेला बळ मिळाले.टेक्सासमध्ये ५० हजारहून अधिक अमेरिकास्थित भारतीयांच्या उपस्थितीत नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या हावडी मोदी या कार्यक्रमात ट्रम्प यांना विशेष अतिथी म्हणून बोलावण्यात आले. एवढ्या मोठ्या जनसमुदायापुढे स्वत:च्या प्रचाराची संधी मिळाल्याने हरखून गेलेल्या ट्रम्प यांनी भारत आणि पंतप्रधान मोदींचीही मुक्तकंठाने स्तुती केली. हावडी मोदीचा पुढचा भाग म्हणून हावडी ट्रम्प कार्यक्रम जगात सर्वाधिक म्हणजे १ लाख १० हजार क्षमतेच्या अहमदाबादेतील मोटेरा स्टेडियममध्ये आयोजित करण्याचा प्रयत्न आहे. स्वत: ट्रम्प आणि त्यांच्यासोबत येणाºया अमेरिकन उद्योजकांच्या शिष्टमंडळामुळे भारताच्या आंतरराष्ट्रीय विश्वासार्हतेत वाढ होऊ शकेल. तर एवढी मोठी राजकीय सभा अमेरिकन मतदारांचे डोळे दिपवल्याशिवाय राहणार नाही, असा ट्रम्प यांचा अंदाज असावा.