शहरं
Join us  
Trending Stories
1
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
2
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
3
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
4
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
5
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
6
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
7
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
8
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
9
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
10
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
11
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
12
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
13
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
14
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
15
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
16
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
17
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
18
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
19
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
20
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?

नगरसेवकांना हवे वेतन, निवृत्तिवेतन... आणि अधिकार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2021 06:45 IST

नगरसेवक अधिकार मागत असतील, तर गैर काहीच नाही. मात्र, अधिकारांबरोबरच त्यांना अधिकची जबाबदारीही घ्यावी लागेल!

संजय पाठक, वरिष्ठ मुख्य उपसंपादक, नाशिक

आज नगरसेवकांवर कोणतीही जबाबदारी नाही काय  करतात हे नगरसेवक महापालिकेत जाऊन? टक्केवारीसाठीच महापालिकेत जातात ना?-  या  लेखाचे शीर्षक वाचून असे खोचक प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतात. महापालिका असो अथवा नगरपालिका; “नगरसेवक” नामक लोकप्रतिनिधीची एक सार्वत्रिक प्रतिमाच तशी उभी राहिलेली आहे. आपल्या भागातील एक सामान्य नागरिक; तेा नगरसेवक झाल्यानंतर अचानक त्याच्या राहणीमानात बदल झाला की, तो साऱ्यांच्या डोळ्यात भरतो. कालपर्यंत सायकल- मोटारसायकलीवर फिरणारा नगरसेवक आज कसा आलिशान मोटारीतून फिरतो, त्याच्या मालमत्ता कशा वाढल्या, याबाबत खमंग चर्चा होते. ते स्वाभाविकही असते. यात नगरसेवकांच्या बरोबरीने नगरसेविकाही काही मागे नसतात, हा आणखी एक ताजा अनुभव!परंतु, सर्वच ठिकाणी सारखी स्थिती नसते आणि नाण्याची एक दुसरी बाजूही असते. नाशिकमध्ये नुकत्याच झालेल्या नगरसेवक परिषदेत याचे प्रत्यंतर आले. नगरसेवकांना निवृत्तीवेतन मिळाले पाहिजे तसेच नोकरशाहीकडे असलेले अमर्याद अधिकार बघता काही प्रमाणात नगरसेवकांनादेखील अधिकार मिळाले पाहिजेत, अशा आग्रही मागण्या या नगरसेवक परिषदेत नोंदविल्या गेल्या.  नगरसेवकांना निवृत्तिवेतन आणि  अधिकार मिळावेत, यासाठी ही संघटना राज्यपातळीवर संघटनही करत आहे. 

मध्यंतरी आमदारांना निवृत्तिवेतन देण्यावरून देखील अशीच चर्चा झडली. तेव्हा एका माजी निष्कांचन आमदाराला कसे रोजगार हमी योजनेवर काम करावे लागते आहे, याचे उदाहरण दिले गेले होते. अर्थात, ही अपवादात्मक घटना खरी असली, तरी किती  निवृत्त / माजी आमदारांबाबत असे म्हणता येऊ शकेल? - नगरसेवकांच्याबाबतीत देखील हेच खरे नाही का? तेव्हा मानधनाचा, निवृत्तिवेतनाचा एक मुद्दा बाजूला ठेवला तरी खरा गांभीर्याने चर्चेचा मुद्दा आहे तो नगरसेवकांच्या अधिकारांचा. महापालिकेत महापौर ते नगरसेवक यांना फार अधिकार नाहीत. महापालिकेची रचना ही महासभा, स्थायी समिती आणि प्रशासन या स्वरूपाची आहे. ग्रामपंचायतीत सरंपचालादेखील धनादेशावर सही करण्याचे अधिकार आहेत, परंतु महापौरांना सभा संचलानापलीकडे कोणतेही अधिकार नाहीत. नगरसेवकांच्या बाबतीतदेखील असाच प्रकार आहे. नगरसेवकांनी आपल्या परिसरातील एखादे नागरी काम सुचवले तर ते तत्काळ मंजूर होतेच असे नाही. नगरसेवकांना स्वेच्छाधिकार निधी असला तरी त्या कामाला सहजासहजी मंजुरी मिळत नाही. महापालिकेच्या एकंदर कामकाजाच्या ढिगाऱ्यात तुच्छ असलेले पण नगरसेवक आणि त्याच्या प्रभागातील संबंधित भागातील नागरिक यांच्यादृष्टीने महत्त्वाचे असलेले कामदेखील त्या नगरसेवकाला सहजासहजी करता येत नाही. 

महापालिकांमध्ये प्रभाग समित्या आणि विषय समित्याही भरपूर आहेत. तेथेदेखील नगरसेवकांना अधिकार असतात. परंतु, शासनाने महापालिकेतील अधिकाऱ्यांचे खर्चाचे विशेषाधिकार वाढवल्याने त्यांच्या अधिकारातच अनेक कामे हेाऊन जातात, त्यामुळे अशा प्रभाग समित्यांसमोर प्रशासकीय आणि वित्तीय मंजुरीसाठी प्रस्तावच येत नाही, असे प्रकार महाराष्ट्रातील अनेक महापालिकांमध्ये घडत आहेत. मुळात पंचायतराज व्यवस्था आणि नंतरच्या काळातदेखील शहरांचे व्यवस्थापन करणाऱ्या महापालिका सक्षम करण्याच्या घोषणा झाल्या तरी प्रत्यक्षात मात्र बहुतांश अधिकार कागदावरच आहेत. आणि ७४ व्या घटना दुरुस्तीत दाखवलेले अनेक अधिकारदेखील  नगरसेवकांना मिळालेलेच नाहीत. राज्य सरकार देखील त्याबाबत सकारात्मक भूमिका घेत नाही. वास्तविक, जेथे अधिकार आहेत तेथे कर्तव्य आणि जबाबदारीदेखील ओघानेच येते. आज नगरसेवकांवर कोणतीही जबाबदारी नाही त्यामुळेच चुकीच्या कामात भ्रष्टाचार झाल्यावर प्रशासनावर दोषारोप करून ते नामानिराळे होतात. त्यामुळेच अधिकारांबरोबर जबाबदारीदेखील टाकली तर नगरसेवकांना त्या अधिकाराचा वापर काळजीपूर्वक करावा लागेल आणि तेच महत्त्वाचे आहे. महापौर आणि नगरसेवक सध्या असलेले अधिकारच वापरत नाही तर नवीन अधिकार देऊन काय साध्य होणार, असा प्रश्न करण्याऐवजी त्यांना त्या अधिकाराचा अचूक उपयोग करायला लावणे हे यंत्रणेच्या हाती आहे. त्यामुळे नगरसेवक अधिकार मागत असतील, तर गैर काहीच नाही. मात्र, कायदेशीर दायीत्वही त्यांच्याकडेच सोपवावे हे महत्त्वाचे आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका