शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
5
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
6
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
7
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
8
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
9
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
10
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
11
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
12
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
13
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
14
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
15
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
16
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
17
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
18
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
19
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
20
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट

अग्रलेख - कोरोनाकाळात जिवाचे तरी भान राखा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 04:16 IST

Coronavirus in Maharashtra : महाराष्ट्रातच सर्वाधिक संसर्ग का? दररोज वाढणारी बाधितांची संख्या सर्वाधिक का? याचे उत्तर वैज्ञानिक पातळीवर देता येत नाही. एक मात्र निश्चित की, आपण सार्वजनिक शिस्त मोडण्यावर आघाडीवर आहोत.

देशाच्या अनेक भागांत कोरोना संसर्गाची दुसरी लाट येते आहे, असे वातावरण आहे. आकडेदेखील बाेलू लागले आहेत. गेल्या रविवारी देशभरात ६२ हजारांच्यावर एका दिवसातील संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या होती. त्यापैकी ३५ हजार ७२६ जण केवळ महाराष्ट्रातील होते. ही आकडेवारी फार बोलकी आहे. महाराष्ट्रात संसर्गाचा जोर वेगाने वाढतो आहे. राज्य सरकार पुन्हा लॉकडाऊन करण्याची तयारी करीत आहे. वास्तविक लॉकडाऊनने संपूर्ण जनजीवन तसेच अर्थकारण कोलमडते, याचा अनुभव  गेल्यावर्षी आपण घेतला आहे. असंख्य लोकांचा रोजगार बुडाला. हातावरचे पोट असणारी कष्टकरी जनता उपासमारीत मरण पावते की काय, असे वातावरण तयार झाले होते. वाहतूक बंद, शाळा-महाविद्यालये बंद, कारखाने, व्यापार उद्दीम बंद झाल्याने आर्थिक व्यवहार पार कोलमडले होते. आता कोठे गेल्या दोन-चार महिन्यांत परिस्थिती सुरळीत होत होती. सार्वजनिक वाहतूक सुरू होत होती. रेल्वे सुरू झाली. विमाने उड्डाण घेऊ लागली. आंतरराष्ट्रीय व्यापार सुरू झाला. शाळा-महाविद्यालये टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आली. रेस्टॉरंट, मॉल्स सुरू झाली होती. सिनेमा थिएटर सुरू होत होते. मात्र, आपण जनता परिस्थितीचे गांभीर्य ओळखत नसू तर पुन्हा संसर्ग वाढत जाणार आहे. लग्नकार्यापासून सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम करण्यापर्यंत मर्यादा असतानाही त्या पाळत नसू, तर पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढणार आहे.महाराष्ट्रातच सर्वाधिक संसर्ग का? दररोज वाढणारी बाधितांची संख्या सर्वाधिक का? याचे उत्तर वैज्ञानिक पातळीवर देता येत नाही. एक मात्र निश्चित की, आपण सार्वजनिक शिस्त मोडण्यावर आघाडीवर आहोत. महाराष्ट्र राज्य रोजगार देणारे असल्याने मागास राज्यांतून रोजंदारीसाठी मोठ्या प्रमाणात पुन्हा स्थलांतरितांचे लोंढे येऊ लागले आहेत. शिवाय अधिक कार्यक्षम वैद्यकीय व्यवस्था असल्याने तुलनात्मक संशयित रुग्णांच्या तपासण्या अधिक होत आहेत. त्याचवेळी रुग्ण आढळून येण्याचे प्रमाणही अधिक दिसते आहे.  होळीनिमित्त तसेच धुळवडीत रस्त्यावर उतरून कडक उन्हात सामुदायिक नृत्य करण्यापर्यंत आपली मजल जाते आहे. प्रशासन किंवा पोलीस दलाला याचा दोष देता येणार नाही. आपणच वेडेवाकडे वागणार आणि त्यांना कसा दोष देऊन चालणार? आपल्याला मरणाचीही भीती नसावी का? शिवाय जनता आजारी पडली तर त्याचा सामना करून कोरोनायोद्ध्यांना जीव धोक्यात घालून सेवा द्यावी लागते. पोलिसांनी कारवाई केली तर तक्रार करणार, आजारी पडून रुग्णालये भरून गेली, खाट मिळेना झाले की, तक्रार करणार, रुग्णसेवा महाग झाली तरी तक्रार करणार ! आपल्याला कोणतेही सामाजिक आणि आरोग्यविषयी भान नसताना संपूर्ण यंत्रणेला दोष द्यायला हेच लोक पुढे असणार आहेत. मुंबई-ठाणे या प्रचंड नागरीकरण झालेल्या विभागात पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक आदी दाट लाेकवस्तीच्या शहरांत कसेही वागून संसर्ग होण्यास वातावरण तयार करणारे दोषी नाहीत का? नाशिक भागात उच्चभ्रू समाजातील पन्नास-साठजण होळीची पार्टी करायला एकत्र येऊन डीजेच्या तालावर नाचत होते. त्यातील काहींनी अमली पदार्थाचे सेवनही केल्याचे समजते. पोलिसांनी वेळीच अटकाव केला.

समाजातील शिक्षित, आर्थिकसंपन्न अशा लोकांना आपण समजदार मानतो. मात्र, त्यांनीच सर्व नियम धाब्यावर बसवून अशा पार्ट्या करायचे ठरविले तर कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढणार नाही का? संपूर्ण जगाला या संसर्गाने वेढलेले असताना काही दिवस समाजभान जागृत ठेवून कुटुंबीयांसोबत राहून आपण सुरक्षित आणि समाजाला सुरक्षित ठेवण्याचे कार्य करू शकत नाही, याचे आश्चर्य वाटते. पोलीस किंवा प्रशासनानेही आता कडक निर्बंध लागू केले पाहिजेत. लॉकडाऊन करून होणारे नुकसान भरून काढता येणार नाही, पण समाजभान उधळून संपूर्ण समाजाला संकटात ओढणाऱ्या काही उडाणटप्पू लाेकांवर कारवाई केलीच पाहिजे. मॉल्स आणि रेस्टॉरंट्स अशा लाेकांमुळे रात्री आठनंतर बंद करण्याची वेळ प्रशासनावर आली. आपण एकावेळी संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करून घेऊन त्याचा फटका किती मोठा असू शकतो याचा अनुभव घेतला असताना वेडेवाकडे वागणे, मास्क न वापरणे, सामाजिक अंतर न पाळणे, आरोग्यासंबंधीच्या सूचनांचे पालन न करणे हा समाजद्रोहच आहे. त्याचा राष्ट्राच्या विकासावरही दूरगामी परिणाम होणार आहे. याचे समाजभान ठेवले पाहिजे. रंगपंचमीचा सण एक वर्ष साजरा केला नाही किंवा प्रार्थना एकत्र येऊन केली नाही तरी काही बिघडणार नाही. आपापल्या घरातून हे सर्व करू शकतो आणि समाजाचे संरक्षण कवच अधिक पक्के करू शकतो या अर्थाने आपण सारेच कोरोनायोद्धे झाले पाहिजे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबई