शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

गांधीयुगाच्या प्रारंभाचे स्मरण; इतिहासातील क्षणही काही सांगावा घेऊन येतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 06:27 IST

Editorial : जुलमी ब्रिटिश राजवटीला एकेक हादरा बसत गेला. अठ्ठावीस वर्षांनंतर स्वातंत्र्याचा सूर्योदय झाला. भारतातील हिंदू-मुस्लीम ऐक्याचा सुवर्णबिंदू, असे नागपूर काँग्रेसचे वर्णन करता येईल.

कोरोना संकटामुळे महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईला हलवले गेले नसते, तर एव्हाना नागपूरच्या बहुचर्चित थंडीत हुरडा पार्टी नावाचे ते अधिवेशन आटोपलेही असते आणि कोणी सांगावे १९२० मधील काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दीलाही उजाळा मिळाला असता. अनेक कारणांनी हा उजाळा गरजेचा आहे. एकतर या शताब्दीचा संबंध केवळ काँग्रेस पक्षाशी नाही. कारण, पाच वर्षांनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना होईपर्यंत, हिंदू महासभेने स्वतंत्र राजकीय चूल मांडेपर्यंत आणि मुस्लीम लीगने १९३७ च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सवता सुभा तयार करेपर्यंत इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजे वेगवेगळ्या धार्मिक, राजकीय, सामाजिक विचारांच्या मंडळींनी एकत्र येण्याचे, देशाच्या भल्याचा विचार करण्याचे सामाईक व्यासपीठ होते. किंबहुना सवत्या सुभ्याची बीजेही नागपूरमध्येच रोवली गेली, असे म्हणता येईल. इथेच हिंसा व अहिंसेच्या स्वतंत्र वाटा आखल्या गेल्या. अहिंसक असहकार आंदोलनाची खिल्ली उडवण्याची सुरुवात या अधिवेशनातच झाली होती. तरीही लाठ्याकाठ्या खाण्यासाठी लाखो नि:शस्त्र रस्त्यावर आले.

जुलमी ब्रिटिश राजवटीला एकेक हादरा बसत गेला. अठ्ठावीस वर्षांनंतर स्वातंत्र्याचा सूर्योदय झाला.  भारतातील हिंदू-मुस्लीम ऐक्याचा सुवर्णबिंदू, असे नागपूर काँग्रेसचे वर्णन करता येईल. आधीच्या दहा-बारा वर्षांमध्ये फाटाफुटीमुळे विदीर्ण झालेल्या काँग्रेसचे ऐक्य इथे दिसले. जालियनवाला बाग नरसंहार आणि तुर्कस्थानशी संबंधित खिलाफत चळवळीमुळे असंतोषाने धुमसत असलेला ब्रिटिश इंडिया असहकार आंदोलनाच्या रूपाने आक्रमक वळणावर येऊन उभा राहिला होता. मर्यादित राजकीय हक्कांसाठी स्थापन झालेल्या काँग्रेसचे अंतिम ध्येय ‘स्वराज्य म्हणजे संपूर्ण स्वातंत्र्य’च असेल, हे येथेच अधोरेखित झाले. बॅरिस्टर, वकील, डॉक्टर, रायबहादूर व मालगुजारांची काँग्रेस हे  सामान्य देशवासीयांचे हक्काचे व्यासपीठ बनावे यासाठी चार आण्याचे स्वस्त सदस्यत्व नागपूरमधून सुरू झाले. महत्त्वाचे म्हणजे पुढे संपूर्ण जगाला मोहिनी घालणारे सहस्रकाचे जननायक महात्मा गांधी यांच्या युगाचा प्रारंभ नागपूरमधूनच झाला.

सेवाग्राम आश्रमामुळे हाच परिसर त्यांची कर्मभूमी बनला. चार महिने आधी राष्ट्रीय नेते लोकमान्य टिळक यांचे निधन झाल्याने हा युगप्रारंभ वरवर अपघाती वाटणारा असला तरी पाच वर्षांआधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतलेले मोहनदास करमचंद गांधी दरम्यान महात्मा बनले होते, हे विसरून चालणार नाही. हिंदू महासभेचे नेते डॉ. बाळकृष्ण मुंजे यांच्यापासून झाडून सगळे आयोजक टिळकपंथी आणि पंधरा हजारांच्या आसपास प्रतिनिधींवर मात्र महात्मा गांधींची मोहिनी, असे चित्र विसाव्या शतकातील दुसऱ्या दशकाच्या अखेरच्या आठवड्यात नागपूरमध्ये होते. सन्माननीय अपवाद एकच, गांधींनी ज्यांना पाचवे पुत्र मानले ते उद्योजक सेठ जमनालाल बजाज यांचे स्वागताध्यक्षपद. केवळ गांधीयुगाचा प्रारंभ म्हणूनच नागपूर अधिवेशनाचे स्मरण करायला हवे, असे नाही. शंभर वर्षे उलटली तरी स्थिती फार बदललेली नाही. विशेषत: धार्मिक सौहार्द, सहिष्णुता, सर्वधर्मसमभावाची गरज, धार्मिक कट्टरता, हिंसा, त्यातून मागे पडणारे दुबळ्या वर्गाचे जगण्यामरण्याचे प्रश्न आदी तेव्हाच्या व आताच्या स्थितीत काही मूलभूत बदल झाला असे नाही.

तेव्हा ब्रिटिशांची फोडा व राज्य करा, ही नीती कारणीभूत होती, तर आता आम्ही स्वत:च धार्मिक पायावर देश दुभंगण्यासाठी कारणीभूत ठरलो आहोत. एक विचित्र विषारी वातावरण सगळीकडे पसरले आहे. प्रामुख्याने हिंदू व मुस्लीम हे धर्म कट्टरतावाद्यांनी ताब्यात घेतल्याचे चित्र आहे. मध्यममार्गी, मवाळ भूमिका घेणाऱ्यांची, सहिष्णुता व सर्वधर्मसमभाव जपणाऱ्यांची प्रचंड कुचंबणा सुरू आहे. परिणाम म्हणून सामान्य माणसाच्या जगण्यामरण्याचे प्रश्न मागे पडले आहेत. कष्टकरी, शेतकरी, कामगार, अशा दुबळ्या समाजघटकांच्या वेदना ऐकून घेण्यामध्येही राजकारण सुरू आहे. संसदेत प्रचंड बहुमत असलेले सत्ताधारी आणि कमजोर विरोधक जणू एकमेकांचे शत्रू बनले आहेत. विरोधी सूर ऐकून घ्यायला सत्ताधारी तयार नाहीत. राजकीय धोरणे, निर्णयाचा विरोध देशद्रोह ठरवला जात आहे. विरोधकांच्या मागे तपासयंत्रणांचा ससेमिरा लावला जात आहे. सुडाची भावना इतकी टोकाला पोहोचली आहे की या संघर्षाला विचारधारांची लढाईदेखील म्हणता येत नाही. तेव्हा लक्षात ठेवायला हवे की, इतिहासातील क्षणही काही सांगावा घेऊन येत असतात. भविष्याचे संकेत देतात. काय स्वीकारायचे व काय नाकारायचे, याचा मार्गही दाखवतात.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीcongressकाँग्रेस