अलीबाबाच्या गुहेवर चिनी सरकारचे पहारे-चीन सरकार आणि जॅक मा यांचं नक्की काय बिनसलं आहे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 12:20 PM2021-01-05T12:20:47+5:302021-01-05T12:23:16+5:30

अलीबाबा आणि जॅक मा या चाैकशीच्या फेऱ्यात आता अडकले आहेत आणि असं म्हणतात की, ते गायबच झालेले आहेत!

Chinese government guards at Alibaba's cave- why there is tension between jack ma & china government? | अलीबाबाच्या गुहेवर चिनी सरकारचे पहारे-चीन सरकार आणि जॅक मा यांचं नक्की काय बिनसलं आहे ?

अलीबाबाच्या गुहेवर चिनी सरकारचे पहारे-चीन सरकार आणि जॅक मा यांचं नक्की काय बिनसलं आहे ?

Next
ठळक मुद्देअलीबाबा आणि जॅक मा हे एकेकाळी चिनी सरकारचे पोस्टर बॉय होते.

‘तिळा तिळा दार उघड’ असा कळीचा मंत्र अलीबाबाने म्हटला की सोन्यानाण्याने खचाखच भरलेल्या गुहेचा दरवाजा लगेच उघडतो ही गोष्ट जगभरातल्या माणसांना माहिती आहे. चिनी अलीबाबाचंही तसंच काहीसं झालंय. ‘अलीबाबा’ ही चीनमधली दादा मल्टिनॅशनल कंपनी. ई-कॉमर्स, रीटेल, तंत्रज्ञान यात अलीबाबाची सत्ता एवढी तगडी की, आशियातलं अमेझॉन म्हणून त्यांचा नावलौकिक! बिलीअन डॉलर्सची उलाढाल करणारी ही कंपनी आणि तिचे संस्थापक जॅक मा. त्यांचं आयुष्य, त्यांचा संघर्ष, उमेद, त्यांनी निर्माण केलेली अपरंपार संपत्ती हे सारं चिनी तारुण्यासाठी मोठ्या नवलाचं! चीनच कशाला आशियासह जगभरातल्या यशस्वी उद्योजकांच्या ज्या कहाण्या वा दंतकहाण्या आजवर प्रसिद्ध झाल्या त्यात जॅक मा यांचं नाव आघाडीवरच आहे. चीनच्या कुलूपकोयंडा घालून ठेवलेल्या व्यवस्थेतही एक जण झपाटून काम करतो आणि जेमतेम वयाच्या पन्नाशीच्या आतबाहेर असतानाच प्रचंड सत्ता आणि संपत्तीचं साम्राज्य निर्माण करतो ही गोष्ट काही सोपी थोडीच? जॅक मा यांनी ते करून दाखवलं...

पण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही असं म्हणण्याचा काळ सरला. जो सत्तेच्या विरोधात असेल, त्याचं काम तमाम करण्याचा, डुख धरून विरोधकाला वैरीच समजण्याचा काळ जगभरात सुरू झाला, ताे चिनी सत्तेला तसाही नवीन नाही. काही महिन्यांपूर्वी जॅक मा यांनी चिनी सत्तेवर, देशातल्या बँकिंग व्यवस्थेवर ताशेरे ओढत उघड टीका केली आणि त्यांचे दिवस फिरले. संपत्तीनिर्माणाचं प्रतीक असलेल्या जॅक मा यांच्या मागे आता सरकारी चौकशीची शुक्लकाष्ठं लागली असून त्यांच्या उद्योगावरही टाच येऊ घातली आहे. चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यावरही त्यांनी टीका केली होती. चिनी वित्त नियंत्रकांवर टीका करत सरकारी बँकांच्या कारभारावर आसूड ओढले होते. या बँका म्हणजे तारण ठेवणारी दुकानं आहेत, असंही त्यांनी ऑक्टोबरमध्ये शांघायमधल्या एका भाषणात स्पष्ट सांगितलं होतं.

त्यानंतर चिनी सरकारने डोळे वटारले आणि मा यांच्यासह अलीबाबाचे वासे फिरले.

काल अनेक भारतीय माध्यमांत विशेषत: दूरचित्रवाहिन्यांत ठळक मथळे झळकले की अलीबाबाचे जॅक मा हे दोन महिन्यांपासून गायबच झालेले आहेत, त्यांचा काही ठावठिकाणा नाही आणि त्यांनी चिनी सरकारशी घेतलेल्या वैराची ही परिणती आहे. या बातम्यांची खातरजमा अर्थातच होऊ शकलेली नाही. अन्य आंतरराष्ट्रीय माध्यमांनी मा यांच्या ‘गायब’ असण्याबद्दल काहीही वृत्त दिलेलं दिसत नाही. मात्र चीनसह हाँगकाँगच्या काही वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या बातम्या पाहिल्या, तर हे स्पष्ट दिसतं की जॅक मा आणि चीन सरकार यांच्यात उघडउघड काही तरी बिनसलेलं आहे आणि मा यांच्यासह अलीबाबाच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागलेला आहे. त्याचा एक स्पष्ट पुरावा म्हणजे अलीबाबा या कंपनीने स्पॉन्सर केलेला ‘आफ्रिकाज बिझनेस हीरोज’ नावाचा रिॲलिटी शो. या रिॲलिटी शोच्या संदर्भात एक बातमी इंग्लंडच्या टेलिग्राफ दैनिकाने काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केली होती. त्यानुसार या रिॲलिटी शोच्या अंतिम भागात परीक्षक म्हणून स्वत: जॅक मा सहभागी होणार होते. तसे प्रोमोजही चॅनेलने मोठा गाजावाजा करत प्रसिद्ध केले. अनेक ठिकाणी पोस्टर्सही झळकली. स्वत: जॅक मा यांनी ट्विटही केलं की, या सर्व स्पर्धकांना भेटण्याची मला भारी उत्सुकता आहे. आणि अचानक असं जाहीर करण्यात आलं की, महत्त्वाच्या कामांमुळे कार्यक्रमाला येण्याची वेळ जुळत नसल्याने जॅक मा सहभागी होऊ शकणार नाहीत. चॅनेलच्या वेबसाइटवरून परीक्षक मंडळांतून त्यांची छायाचित्रंही हटवण्यात आली. १५ लक्ष अमेरिकन डॉलर्स एवढं घसघशीत बक्षीस देणाऱ्या या स्पर्धेत ऐनवेळी अलीबाबा कंपनीत काम करणाऱ्या साध्या अधिकाऱ्याला प्रतिनिधी म्हणून पाठवण्यात आलं.

डिसेंबर २०२० मध्ये चिनी सरकारने मक्तेदारीविरोधातल्या कायद्यानुसार जॅक मा यांच्या ॲण्ट ग्रुपची चौकशीही सुरू केली. नोव्हेंबर २०२० मध्ये ३७०० कोटी अमेरिकन डॉलर्सचा आयपीओ जॅक मा यांचा ॲण्ट ग्रुप बाजारात आणणार होता. मात्र सरकारने अचानक त्याला स्थगिती दिली. त्या स्थगितीपूर्वी दोनच दिवस आधी शांघाय आणि हाँगकाँगच्या शेअर बाजारात या ग्रुपच्या शेअर्सच्या किमती धडाधड पडायला लागल्या होत्या. हाँगकाँग बाजारात अलीबाबाचे शेअर्स तब्बल ६ टक्क्यांनी घसरले होते.

 

चीनमध्ये सत्तेत असलेल्या कम्युनिस्ट पक्षाचं मुखपृष्ठ ‘पीपल्स डेली’ने आपल्या अग्रलेखात अलीबाबासंदर्भात टिप्पणी केली आहे. हा अग्रलेख म्हणतो, ‘मुक्त अर्थव्यवस्थेचा गाभा असतो मुक्त स्पर्धा. बाजारपेठेत कार्यरत उद्योजकांसह ग्राहकांच्या हितावर मक्तेदारीचा थेट परिणाम होतो. मक्तेदारी हा विकासाच्या मार्गातला एक मोठा अडथळा आहे.’

- अलीबाबा आणि जॅक मा या चाैकशीच्या फेऱ्यात आता अडकले आहेत आणि असं म्हणतात की, ते गायबच झालेले आहेत!

जॅक मांची संपत्ती घटली

अलीबाबा आणि जॅक मा हे एकेकाळी चिनी सरकारचे पोस्टर बॉय होते. चिनी यश, सुबत्ता, मुक्त बाजारपेठ, गुणवत्तेला संधी आणि तंत्रज्ञानाची निर्विवाद मक्तेदारी म्हणून जगासमोर चीन अलीबाबा आणि जॅक मा यांना पेश करत आला आहे. आता मात्र ब्लूमबर्ग बिलीओनिअर्स इंडेक्सने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार मा यांची संपत्ती गेल्या दोन महिन्यांत बरीच घटली आहे. ऑक्टोबर २०२० मध्ये त्यांची संपती ६१०० कोटी अमेरिकन डॉलर्स इतकी होती. ती दोनच महिन्यांत घटून ५०६० कोटी अमेरिकन डॉलर्स इतकी झाली.

Web Title: Chinese government guards at Alibaba's cave- why there is tension between jack ma & china government?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.