चीनचा जागतिक व्यूह व गलवान खोरे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 02:58 AM2020-06-23T02:58:51+5:302020-06-23T02:59:08+5:30

कम्युनिस्ट चीनला महासत्ता बनविणारी ध्येय-धोरणे सुव्यवस्थित स्वरूपात आखून, ती साध्य करण्यासाठी स्पष्ट डावपेचांची आखणी जिनपिंग यांनी केली आहे.

China's global strategy and the Galvan Valley | चीनचा जागतिक व्यूह व गलवान खोरे

चीनचा जागतिक व्यूह व गलवान खोरे

Next

- प्रशांत दीक्षित

गलवान खोऱ्यातील चीनची घुसखोरी समजून घेण्यासाठी चिनी राज्यकर्त्यांच्या मनात असलेला जागतिक व्यूह लक्षात घेतला पाहिजे. ज्याप्रमाणे २०२० हा मोदींचा भारत आहे, १९६२चा नेहरूंचा भारत नव्हे. त्याचप्रमाणे २०२० मधील चीन हा शी जिनपिंग यांचा चीन आहे, माओ वा डेंग यांचा नव्हे. कम्युनिस्ट चीनला महासत्ता बनविणारी ध्येय-धोरणे सुव्यवस्थित स्वरूपात आखून, ती साध्य करण्यासाठी स्पष्ट डावपेचांची आखणी जिनपिंग यांनी केली आहे.
चीन हे कम्युनिस्ट राष्ट्र असले तरी राष्ट्रवाद चीनला घातक वाटत नाही. सर्व अंगांमध्ये राष्ट्रवादाचे बीज पेरले तर एकसंध घडण होते व बलवान राष्ट्र निर्माण होते, असे चिनी राज्यकर्ते मानतात. चीन हे एकेकाळी महान साम्राज्य होते. ब्रिटिशांमुळे या साम्राज्याचे लचके तोडले गेले. १८४० च्या अफू युद्धापासून हे साम्राज्य संकोचत गेले. त्याची सल चिनी राज्यकर्त्यांच्या मनात सतत असते. १८४०पासून पुढील शंभर वर्षे चीनची सतत मानखंडना होत गेली व कम्युनिस्ट क्रांतीनंतर ती थांबली. चीन बलवान होत गेला. माओंनी राष्ट्रीय सामर्थ्य दिले, डेंग यांनी आर्थिक. या सामर्थ्याच्या बळावर गत २० वर्षांत चीन लष्करी महासत्ता बनला.
वाढत्या लष्करी बळाच्या जोरावर १८४० पूर्वीचे चिनी साम्राज्य २०५० मध्ये पुन्हा उभे करण्याची शी जिनपिंग यांची महत्त्वाकांक्षा आहे. ही महत्त्वाकांक्षा डेंग यांनीही ‘लपा व वाट पाहा’ असे धोरण राबवत जपली होती. त्यानुसार चीनने लपून हातपाय पसरले. वाट पाहण्याची वेळ संपली. आता उघडपणे काम करू, असे शी जिनपिंग मानतात. कम्युनिस्ट पार्टीच्या १९व्या काँग्रेसमध्ये शी जिनपिंग यांनी उघडपणे चीनची जागतिक व्यूहरचना मांडली. या व्यूहरचनेनुसार २०३५पर्यंत चीन मूलभूत सोयी-सुविधांनी युक्त असे ‘आधुनिक एकपक्षीय सोशलिस्ट राष्ट्र’ होईल आणि २०५० मध्ये चिनी कम्युनिस्ट क्रांतीच्या शताब्दी वर्षात बलवान, श्रीमंत, आधुनिक एकपक्षीय सोशलिस्ट राष्ट्र म्हणून जगाचे नेतृत्व करणारी महासत्ता होईल. १८४०पासून सुरू झालेली मानखंडना संपेल.


व्यूहरचनेत काय करायचे आहे, एवढेच सांगून जिनपिंग थांबलेले नाहीत, तर ते कसे करायचे आहे, याचा स्पष्ट तपशील त्यांनी मांडला आहे. त्यात अंतर्गत सुधारणांपासून परराष्ट्रांतील आक्रमणांपर्यंत सर्व बाबींचा समावेश आहे. त्यातील परराष्ट्रांतील आक्रमण आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. मूळ चिनी साम्राज्य पुन्हा प्रस्थापित करायचे असेल तर चीनने पुढील तीस वर्षांत सहा युद्धे खेळलीच पाहिजेत, यावर चीनमध्ये एकमत आहे. प्रथम तैवान, त्या भोवतालची बेटे, त्यानंतर दक्षिण तिबेट, मग जपानने गिळंकृत केलेली बेटे घेणे, पूर्ण मंगोलिया व रशियाच्या ताब्यातील प्रदेश पुन्हा हस्तगत करून १८४०चे चिनी साम्राज्य पुन्हा अस्तित्वात आणणे, असा हा कार्यक्रम आहे. या प्रत्येक युद्धाचे तपशीलवार आराखडे व ती कधी करायची याचा प्राथमिक अंदाज चीन लष्कराकडे तयार आहे. तैवान, फिलिपाईन्स, व्हिएतनाम समुद्रात त्यानुसार छापेमारी सुरूही झाली आहे.
यातील तिसरे युद्ध तिबेटचा दक्षिण भाग ताब्यात घेण्याचे आहे. तिबेटचा दक्षिण भाग म्हणजे आपला अरुणाचल प्रदेश व तवांग. अरुणाचल प्रदेशात सैन्य उतरविण्याचा प्रयत्न राजीव गांधींच्या बीजिंग भेटीच्या वेळीच चीनने केला. त्याआधी नथूला येथेही घुसखोरी केली. दोन्ही वेळा भारतीय लष्कराने चीनला सणसणीत चपराक दिली. भारताने लगोलग अरुणाचल प्रदेशाला राज्याचा दर्जा दिला. चीन त्यावेळी आजच्याइतका बलवान नव्हता; पण आताची स्थिती वेगळी आहे. चीनच्या व्यूहरचनेनुसार २०३५ ते २०४०पर्यंत हा प्रदेश चीनला जोडला पाहिजे. त्यादृष्टीने पावले टाकण्यात येत आहेत.
अक्साई चीन व त्याला जोडून असलेले गलवान खोरे हा दक्षिण तिबेटचा भाग नाही. मात्र, शिंगझियांग, तिबेट व पाकव्याप्त काश्मीर यांना जोडणारे चीनचे रस्ते अक्साई चीनमधून जातात. चीनचा हा इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे. भारताने गेली दहा वर्षे या भागात सीमेनजीक मोठ्या प्रमाणात रस्ते बांधणी सुरू केली. मोदी सरकारने त्याला गती दिली. गेल्या वर्षी काश्मीर व लडाखचा दर्जा बदलला. पाकव्याप्त काश्मीरबरोबर अक्साई चीनही ताब्यात घेण्याची घोषणा गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत केली. पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीन ताब्यात घेऊन भारताच्या मूळ नकाशाला वास्तविक रूप देण्याचे डावपेच आपल्याप्रमाणेच भारत आखत आहे असा संशय चीनला येतो. भारतीय नेत्यांची भाषणे आता वल्गना राहिलेल्या नसून उत्तम रस्ते बांधणीमुळे या घोषणा प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे, हे लक्षात येताच चीनने आक्रमक पवित्रा घेऊन लष्करी बळाचा वापर सुरू केला. चीनच्या तथाकथित साम्राज्यावर हे अतिक्रमण आहे, असे चीन मानतो, तर हा भारताचा मूळ भाग आहे असे भारत मानतो.

भारताबरोबर मोठे युद्ध झाले तर आपलेही बरेच नुकसान होईल, हे चीनला माहीत आहे. म्हणून सीमेवरील आक्रमणाबरोबर भारतात वैचारिक वा प्रादेशिक अस्वस्थता निर्माण करणे, पाकिस्तानला अत्याधुनिक शस्त्रास्रे पुरवून काश्मीरवर पुन्हा आक्रमणास उद्युक्त करणे व पाकिस्तानचे आक्रमण सुरू असतानाच अचानक सैन्य घुसवून अरुणाचलसारखा भारताचा प्रदेश हस्तगत करणे, अशी चीनची व्यूहरचना आहे. ही व्यूहरचना उद्ध्वस्त करण्याचे काही मार्ग भारताकडे आहेत. त्यात नौदलाची भूमिका महत्त्वाची असेल. मात्र, व्यूहरचना व डावपेच आखून चीन थांबत नाही तर ते अमलात आणतो. वाद-विवाद करण्यात मश्गुल होत नाही. भारतीय जनतेने हे लक्षात ठेवावे.
मुख्य संदर्भ : ‘वेनवियापो’ या चिनी वृत्तपत्रातील लेखाचे ‘इंडिया डिफेन्स रिव्ह्यू’मधील भाषांतर, ‘आॅगस्ट २०१५, द डिप्लोमॅट’ या जर्नलमधील डी चेन यांचा लेख, लेफ्टनंट जनरल एच. एस. पनाग यांचे प्रिंटमधील लेख.

(संपादक, लोकमत, पुणे.)

Web Title: China's global strategy and the Galvan Valley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :chinaचीन