- प्रल्हाद जाधवआकाशपाळणा हा शब्द कदाचित आपल्याला अनोळखी वाटेल, जायंट व्हील मात्र अधिक जवळचा वाटेल. पूर्वी जत्रेत आकाशपाळणे असत, आता जायंट व्हील्स असतात.मुद्दा असा की, आकाशपाळण्यात आपण बसलो की तो वर जातो आणि खाली येतो. खालून पुन्हा वर जातो, वरून खाली येतो. वर जाताना छान वाटते, खाली येताना पोटात भीतीचा गोळा येतो. अशा अनेक फेऱ्या सुरू होतात. त्या गतीशी आणि भीतीशी आपण जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो. थोडा शहाणा माणूस त्यातही मजा घेण्याचा प्रयत्न करतो.सुख आणि दु:ख किंवा आनंद आणि भीती ही अशीच दोन टोके. त्या दोन टोकांच्यामध्ये जीवनाचा आकाशपाळणा आपल्याला असाच खेळवत असतो. आपण जेवढे वर जाणार आहोत तेवढेच खाली येणार आहोत हे लक्षात घ्या, असे सांगत असतो.सुख आणि दु:ख, आनंद आणि भय किंवा वर आणि खाली या तत्कालिक स्वरूपाच्या भावना आहेत, त्या आपल्या जगण्याचा एक भाग आहेत, हे लक्षात आले तरच या खेळातली गंमत माणूस एन्जॉय करू शकतो. ज्याच्या हे लक्षात येत नाही त्याची फरफट होऊ लागते, जगणे त्याला नकोसे वाटू लागते.लहान मुलाना पाळण्यात घालण्याची वेगवेगळी कारणे असतील. इकडून तिकडे आणि तिकडून इकडे असा प्रवास तुला आयुष्यभर करायचा आहे, हे तर त्यातून त्याला शिकवायचे नसेल, असा प्रश्न माझ्या मनात येतो. झोका जेव्हा थांबतो तेव्हा बाळ झोपलेले असते, शांत झालेले असते. तुला जर शांतता हवी असेल, सुखाची झोप हवी असेल तर इकडे किंवा तिकडे लक्ष न देता फक्त मधल्या स्थिर अवस्थेवर लक्ष केंद्रित कर, असे तर पाळणा त्याला सांगत नसेल ?सुखाचा लंबक जितका एका बाजूला जाईल तितकाच तो दु:खाच्या विरूद्ध दिशेने फिरणार हे भौतिकशास्त्र देखील सांगते. त्या सुख दु:खाच्या भावनांमध्ये अडकून पडण्याऐवजी मधल्या काट्यावर मन स्थिर केले तर काय होईल?दोन परस्पर विरोधी भावनांमधील ताण हेच माणसाच्या समतोल जगण्यामागचे मुख्य सूत्र असू शकत नाही काय? अध्यात्मिक पातळीवर परस्पर विरोध या शब्दाचा अर्थ अंतर्गत सुसंगती असाही असू शकतो. जन्म आणि मरण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे मानणे म्हणजे जणू या भावनेचा परमोत्कर्षच होय.
पाळण्यातील बाळकडू
By admin | Updated: August 19, 2016 04:21 IST