बदलते अर्थकारण बदलत्या हवामानास कारणीभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 05:06 AM2018-06-24T05:06:13+5:302018-06-24T05:06:35+5:30

हवामानासह तापमानातील बदल थांबवायचे असल्यास वातावरणावर प्रभाव टाकतील, असे वायू मर्यादित प्रमाणात सोडणे क्रमप्राप्त आहे.

Changing economy causes climate change | बदलते अर्थकारण बदलत्या हवामानास कारणीभूत

बदलते अर्थकारण बदलत्या हवामानास कारणीभूत

Next

सचिन लुंगसे
हवामानासह तापमानातील बदल थांबवायचे असल्यास वातावरणावर प्रभाव टाकतील, असे वायू मर्यादित प्रमाणात सोडणे क्रमप्राप्त आहे. याकरिता प्रत्येकाने स्वत:वर बंधन घालणे गरजेचे आहे. अमेरिका व युरोपने एवढे प्रदूषण केले आहे की, ते रोखण्यासाठी त्यांनीच प्रयत्न करण्याची गरज आहे. ऊन, पाऊस, वारा यांच्या दिशा, तीव्रता आणि दशा बदलत आहेत. बदलांचा संबंध राहणीमानाशी जोडला जात आहे. इंधनाच्या जळणामुळे वातावरण प्रदूषित होत आहे. हे घटक हवामान बदलास कारणीभूत आहेत.
समुद्राची पातळी वाढल्याने शहरे पाण्याखाली जाण्याची भीती आहे. वेळी-अवेळी पाऊस, गारा यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. पिके नष्ट होत आहेत. परिणामी, शेतकरी वर्गाचे जीवन जगणे कठीण होत आहे. तापमानाच्या चटक्याने सामान्य माणूस हैराण होत आहे.
कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी प्रत्येक देशाने प्रयत्न करण्याची गरज असताना, विकसनशील आणि विकसित देश यांच्यामधील याबाबतचे धोरण स्पष्ट नाही; आणि धोरण स्पष्ट असले, तरी प्रत्यक्षात कृती वेगाने होत नाही, असे चित्र आहे. निसर्गाचे चक्र बिघडण्यास हवामानातील बदल कारणीभूत आहेत. हवामान बदलाचा फटका कृषी, पाणी, वन व मानवी आरोग्य यास बसत आहे. मात्र, हे कोणीही मान्य करत नाही. महत्त्वाचे म्हणजे, याचा सर्वात मोठा परिणाम आरोग्यावर होत असून, यावरही देशांना मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागत आहे.
आपली अर्थव्यवस्था कृषीवर अवलंबून आहे. त्यामुळे हवामानाच्या बदलाला सामोरे जाण्याची गरज शेतीसह त्यावर अवलंबून असलेल्या प्रत्येकाला आहे. कृषीला हवामान बदलाचा फटका बसणार नाही, अशी यंत्रणा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. यासाठी सरकारने प्रयत्नशील असले पाहिजे. विकसित देश हवामान बदलास सामोरे जात असताना त्यांच्या उपाययोजना असल्या, तरी विकसनशील देशांची अवस्था तशी नाही. परिणामी, त्यांना नैसर्गिक आपत्तींचा सामना मोठ्या प्रमाणावर करावा लागत आहे. याचा परिणाम विकसनशील देशांच्या आर्थिक प्रगतीवर होत आहे.
एका अर्थाने बदलती आणि चुकीच्या पद्धतीने जाणारी अर्थव्यवस्था, औद्योगिकीकरणाचा वाढता भस्मासूर, बदललेली जीवनशैली हे घटक बदलत्या हवामानाशी जोडले गेले आहेत. हवामान बदलत असल्याने त्याचा वेगाने वेध घेताना हवामान विभागासमोरही आव्हाने उभी आहेत. अलीकडच्या काळात हवामान विभाग अत्याधुनिक होत असला, तरीदेखील प्रत्यक्षात निसर्गाच्या पुढे तंत्रज्ञान फार काळ टिकत नाही, हे सर्वश्रुत आहे.
हवामानाचे अंदाज चुकत नाहीत तर ते बदलतात, हे हवामान विभागाचे नेहमीचे वाक्य आहे. तरीदेखील बदलत्या हवामानाचा अचूक अंदाज घेण्याबाबत हवामान विभागाने अत्याधुनिक तंत्राचा वापर करून आपल्या कार्यप्रणालीत वेग आणला असला, तरीदेखील आपणास अद्याप मोठा पल्ला गाठायचा आहे. हवामान बदल ही अपवादात्मक परिस्थिती नाही. तो बदल सुरूच आहे. परिणामी, जगाला भीती वाटते आहे. आता नुसता विचार करून चालणार नाही, बदलत्या हवामानाचा बदलता अंदाज घेण्यासाठी हवामान खात्याने सक्षम झाले पाहिजे.

Web Title: Changing economy causes climate change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.