शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
2
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
3
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
4
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
5
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
6
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
7
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
8
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
9
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
10
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
11
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
12
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
13
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
14
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
15
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
16
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
17
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
18
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
19
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
20
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप

मूकनायकाची शताब्दी : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पाक्षिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 8:54 PM

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक पक्षिकाचा पहिला अंक शनिवार ३१ जानेवारी १९२० रोजी काढला. आंबेडकरी चळवळीच्या मुखपत्राचे हे शताब्दी वर्ष आहे.

मूकनायकडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काढलेले पहिले पाक्षिक होय. आंबेडकरी चळवळीच्या मुखपत्राचे शताब्दी वर्ष आहे. शंभर वर्षापूर्वी एखादे वृत्तपत्र, मासिक, नियतकालिक, अनियतकालिक अथवा पाक्षिकसुद्धा काढणे अत्यंत अवघड बाब होती. अशावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक पाक्षिक काढले. ती अस्पृष्य समाजाची गरज होती. मूकनायक काढणे अपरिहार्य होते. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दलित, शोषित, पीडितांच्या व्यथा-वेदनांना वाचा फोडायची होती. भणंग आयुष्याला नवी कलाटणी द्यायची होती. नवचैतन्य पेरायचे होते. अस्पृष्य समजाची दशा पालटायची होती. दिशा द्यायची होती. अस्मिता नि अस्तित्व बहाल करायचे होते. ही निकड लक्षात घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक पक्षिकाचा पहिला अंक शनिवार ३१ जानेवारी १९२० रोजी काढला. त्याचा रजि नं.बी-१४३० असा होता. तसेच १ हरारवाला बिल्डिंग पोयबावडी परेल मुंबई या कार्यालयातून प्रकाशित होत असे.

मूकनायक पाक्षिकाचे आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे. या वैशिष्ट्यपूर्ण मूकनायक या शिर्षकाखाली संत तुकारामाच्या अभंगांचे ब्रीद लिहिलेले होते.काय करु आतां धरुनिया भीडनि:शंक हे तांड वाजविले ।।नव्हे जगी कोणी मुकियाचा जाणसार्थक लाजून नव्हे हितसंत तुकाराम विद्रोहाची परंपरा जपणारे महाराष्टातल्या भूमितलेच आहेत. त्यांची अभंगवाणी विसाव्या शतकामध्येही किती प्रेरणादायी आहे. याची जाणी आजही आपणास येते. तरीसुद्धा समाजप्रबोधन संतभूमीच्या तुकारामाला सदेही वैकुंठागमन का करावे लागले? त्यांचे अभंग इंद्रायणीच्या नदीत का बुडविले, हा प्रश्न वेदनादायी आहे. मूकनायकाच्या उजव्या वार्षिक दर अडीज रूपये तर डाव्या बाजूस जाहिरातीचे दर ओळीस पहिल्या वेळी ५ आणे आणि दुसऱ्या वेळी ४ आणे, कायमचे अडीज आणे अशा प्रकारचे दर ढापलेले होते. मूकनायक पक्षिकाचे एकूण १९ अंक प्रकाशित झाले आहे. प्रत्येक अंकाचे वेगळेपण आहे. लोकांचे खऱ्या अर्थाने प्रतिनिधित्व करणारे मूकनायक अर्थपूर्ण नाव होते. मूकनायक अल्पकाळ जगले असले तरी तत्कालीन अस्पृष्य समजाला कायमचे जागविले. ते एखाद्या ताऱ्याप्रमाणे प्रकाशयात्री ठरले. समाजप्रबोधनाचा वसा घेवून जनसामान्याचा आवाज बुलंद करता आला. गाऱ्हाणे मंडता आली. मूकनायक पाक्षिकाचा जन्म जातीअंताच्या पर्वाची ठिणगी होते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.डॉ. बाबासाहेब आंबेडर सिडनेहॅम कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यामुळे मूकनायक पाक्षिकाचे संपादक झाले नाही. परंतु संपादकाची जबाबदारी पांडुरंग नंदराम भटकर यांचेकडे होती. नंतरच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षणपूर्ण करण्यासाठी विदेशात गेले. तेव्हा ज्ञानदेव घोलपांनी मूकनायकची जबाबदारी स्वीकारली. परंतु मूकनायकाच्या संदर्भात काही आर्थिक गडबडच्या कारणारून डॉ. बाबासाहेबांनी पदमूक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वृत्तपत्रीय कारकिर्द १९२० पासून सुरू झाली. परंतु २७ जानवारी १९१९ ला साऊथ ब्युरो समितीपुढे साक्ष दिली अन् अस्पृष्यांची कैफियतही लेखी स्वरुपात मांडली. मूकनायकातील एकूण १३ लेख, अग्रलेख आहेत. त्यापैकी ११ अग्रलेख डॉ. बबासाहेब आंबेडकरांनी लिहिले आहेत. लेख अग्रलेख वर्तमान (वास्तव) आणि भविष्यातील वेध घेणारे आहेत. एकोणवीसाव्या शतकातील अग्रलेख विसाव्या शतकातसुद्धा तंतोतंत लागू पडतात. आजच्या राजकीय परिस्थितीचा लेखाजोखा त्यांच्या अग्रलेखाची आठवण करून देतो. सामाजिक, धार्मिक, लेखाची मार्मिकता अधोरेखांकित करता येते. अस्पृष्य बहिष्कृत वर्गाला मूकनायक पाक्षिकाने वैचारिक खाद्य पुरविले. मूकनायकाच्या अलौकिक नी भरीव कामगिरीमुळे लोकलढे यशस्वी करता आले. उदा. महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह आणि नाशिकच्या काळाराम मंदिराचा सत्याग्रह, पर्वती सत्याग्रह इत्यादी.डॉ. आंबेडकरांनी मूकनायक पाक्षिकाबरोबर समाजजीवनात खऱ्या अर्थाने पदार्पण केले तत्कालीन समाजव्यवस्थेने, सनातनी धर्माने अस्पृष्य वर्गाला अज्ञान अंधश्रद्धेच्या खाईत लोटून दिले. अस्मिता नी अस्तित्व हिरावले. त्यांची आर्थिक, शैक्षणिक कोंडी केली. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली. अशी अवहेलना करणाऱ्या सनातनी धर्माबद्दल बाबासाहेब लिहतात की, ‘‘हिंदू समाज हा एक मनोरा आहे व एक जात म्हणजे त्याचा एक मजलाच होय. दुसऱ्या मजल्यावर जाण्यास मार्ग नाही. ज्या मजल्यात ज्यांनी जन्मावे. त्याच मजल्यात त्यांनी मरावे. खालच्या मजल्यावर इसम, मग तो कितीही लायक असो, त्याला वरच्या मजल्यात प्रवेश नाही. वरच्या मजल्यातला माणूस मग तो कितीही नालायक असो त्याला खालच्या मजल्यात लोटून देण्याची कोणाची प्राज्ञा नाही. (मूकनायक ३१ जानेवारी १९२०) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समग्र हिंदूधर्मशास्त्राची चिकित्सा केली. समाजशास्त्रीय दृष्टीकोणातील सापेक्ष विचार सांगतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘ब्रोकन मॅन’ची थिअरी मांडतात. सामाजिक वैचारिक जाणिवेने ओतप्रोत असलेले अग्रलेख केवळ सम्यक क्रांतिची दिशाच नव्हे तर माणसाला प्रतिष्ठा, सन्मान बहाल करण्याचे धाडस मूकनायकातून केले आहे.सम्यक क्रांतीचे द्योतक असलेल्या लेखातून समाजाला बोलके करणारी भाषा आणि अन्या, अत्याचाराला वाचा फोडणारी भाषा होती. शिक्षणाचा विचार तर अंर्तभूत होता. ह्या संदर्भात बाबासाहेब म्हणतात की, ‘‘प्राथमिक शिक्षण मुलांना आणि मुलींना मोफत व सक्तीचे शक्य तितक्या लवकर सुरू व्हावे.’’(मूकनायक ५ जून १९२०)डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायक पाक्षिकातील विचार अत्यंत मार्मिक, भेदक आहे. तत्कालीन लेख, अग्रलेखातून समाजातील ज्वलंत प्रश्नांवर आपले मत प्रकट केले. ते प्रश्न जगण्याचे होते. असे माणसाच्या जिव्हाळ्यांचेच प्रश्न आजही भेडसावताहेत. उदा. स्वराज्याची सर सुराज्याला नाही (मूकनायक २ फेब्रुवारी १९२०) हे स्वराज्य नव्हे तर आमच्यावर राज्य (मूकनायक - २८ फेब्रुवारी १९२०) ,स्वराज्यातील आमचे आहोरण व त्याची पद्धती (मूकनायक- २७ मार्च १९२७) , अ.भा. बहिष्कृत समाज परिषद (मूकनायक ५ जून १९२०), काकगर्जना (मूकनायक ३१ जुलै १९२०) सिंहगर्जना (१४ ऑगस्ट १९२०), दास्यावलोकन (मूकनायक २८ ऑगस्ट १९२०) हिंदी राष्ट्राची प्राणप्रतिष्ठा (मूकनायक २३ ऑगस्ट १९२०) इत्यादी दिशादर्शक अग्रलेखातून सामाजिक धार्मिक, राजकीय शैक्षणिक इत्यादी वैचारिक पार्श्वभूमीचा तळ निर्माण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सनातनी धर्मजाती व्यवस्थेला हादरे दिलेत. जातीधर्माच्या विषमतावादी धोरणावर प्रहार केला. द्वेष मत्सराने बरबटलेली जुल्मी मानसिकता व त्यांच्या कुत्सिम मनाबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपली भूमिका विषद करतात. मूकनायकाच्या पहिल्या अंकात (३१ जानेवारी १९२०) बाबासाहेब म्हणाले, ‘‘ आमच्या या बहिष्कृत लोकांवर होत असलेल्या व पुढे होणाऱ्या अन्याायवर उपाययोजना सूचविण्यास तसेच त्यांनी भआवी उन्नती व तिचे मार्ग यांच्या खऱ्या स्वरूपाची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी अन्य भूमीच नाही. परंतु मुंबई इलाख्यात निघत असलेल्या वृत्तपत्रांकडे पाहिले असता असे दिसून येईल की, त्यातील बरीचशी पत्रे विशिष्ट अशा जातीचे हिंतसंबंध पाहणारी आहेत. इतर जातीच्या हिताची पर्वा त्यांना नसते. इतकेच नव्हे तर केव्हा केव्हा त्यांना अइहतकारक असेही त्यातून प्रलाप निघतात. अशा वृत्तपत्रकारांना आमचा एवढाच इशारा आहे की, कोणतीही एखादी जात अवगत झाली तर तिच्या अवनतीचा चट्टा इतर जातीत बसल्याशिवाय राहणारी नाही.समाज ही नौकाच आहे. ज्याप्रमाणे आगबोटीतून बसून प्रवास करणाºया उतारूने जाणूनबुजून इतरांचे नुकसान करावे म्हणून म्हणा किंवा आपल्या विनाशक स्वभावामुळे म्हणा जर का मागाहून जलसमाधी ही घ्यावीच लागणार आहे. त्याचप्रमाणे एका जातीचे नुकसान केल्याने अप्रत्यक्ष नुकसान करून आपले हित करावयाचे पढतमूर्खांचे लक्षण शिकू नये.’’डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका जनसामान्याची होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूकनायकातील रास्त भूमिकेला काही पत्रे उचलून धरत होते. त्यांना न्याय मिळावा अशी मागणी करीत होते. तर काही वृत्तपत्रे नियतकालिके डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लिखाणाला विरोध करीत होते तर काही नुसती उठाठेव म्हणून टीका करीत होते. उदा. भा.ब. भोपटकर ‘भाल’मधून प्रचंड टीका केली. पण त्याच्या टीकेला डॉ. आंबेडकरांनी आपल्या खास शैलीत उत्तरे दिली आहेत. तसेच लोकमान्य टिळकचे केसरी सुद्धा टीका करण्यात तरबेज होते. ‘‘ आम्हास पक्के आठवते की, जेव्हा १९२० साली आम्ही मूकनायक पत्र सुरू केले तेव्हा केसरीला आमची जाहिरात फुकट छापा अशी विनंती केली होती. पण ती धुडकावून लावण्यात आली. तद्नंतर ‘तुमचा आकार देतो छापा’’ असे लिहिल्यावर भेटही दिली नाही. (बहिष्कृत भारत २० मे १९२७) अशाप्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर त्यांच्या लिखाणातील विचारांवर टीका करीत होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वृत्तपत्रीय भाषा आणि ग्रंथ लेखनाची भाषा वेगळ्या आहेत. वृत्तपत्रीय मराठी भाषा उपरोधिक, दृढतापूर्वक, निश्चयता, संकल्पता, ध्येयवादी, भेदक, सूचक, प्रहार करणारी भाषा अलंकृत होती. त्यात वाक्प्रचार, म्हणी , दृष्टांत, सुविचार अशा विविधरंगी मराठी भाषेचा प्रयोग करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पाक्षिक, वृत्तपत्रातील भाषासुद्धा समृद्ध होती. यात शंका नाही. तसेच इंग्रजी भाषेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अतिप्रेम होते. त्यामुळे त्यांचे इंग्रजी संवाद, भाषणे आणि ग्रंथलेखन इंग्रजीमधून केले आहे. बाबासाहेबांनी ग्रंथलेखन करताना अतिशय सूक्ष्मपद्धतीने निरीक्षण केले असून त्यातील जटील सत्यता शोधून काढणे, संदर्भासहीत विचारांच्या खोलीचे मोजमाप कसे करता येईल, याचा प्रत्यय येतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भाषा सहज सोपी साधी भोळी होती. जनसामान्याची भाषा ‘दिल और दिमाग’ वर मारा करणारी होती. दंभस्फोट करणारी प्रायोगिक भाषा दिशादर्शक होती. त्यामुळेच जनसामान्याचे परिवर्तन करता आले. पौराणिक दाखले, कथाचा वापर करताना खरे, खोटे तपासून पाहिल्याशिवाय सांगत नव्हते. अशा ह्या मराठी, इंग्रजी भाषेची वैभवशाली संपन्नतेची साक्ष बाबासाहेबांनी आपल्या लिखाणात अधोरेखीत केले आहे.  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूकनायक पाक्षिकामध्ये पत्रव्यवहार करून कहाणी, वेडी कोकरे , बहिष्कृतांच्या नावावर चरणारे गुंड इत्यादी, विविध विचार वार्ता, कुशल प्रश्न, शेला पागहोटे, इत्यादी प्रकारच्या विविध वृतांचा खजीना प्रकाशित होत असे. बरेच लिखान सदर वास्तव, वर्तमानातील घडामोडीवर भाष्य करणारे होते.  ३१ जानेवारी १९२० चा मूकनायक पाक्षिक काढण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी २५०० रूपयाचे अर्थसाहाय्य केले होते. त्यानंतर काही दिवसांनी मूकनायक आर्थिक अडचणीत सापडले तेव्हा छत्रपती शाहू महाराजांनी संस्थानचे दिवाण आर.व्ही. सबनीस यांना या वृत्तपत्रास आर्थिक मदत करण्याविषयी २४ जानमेवारी १९२१ रोजी पत्र लिहिले. मूकनायकचे संपादक श्री घोलप यांना ७०० रूपयाचा चेक पाठविण्याची व्यवस्था करावी. ही रक्कम देणगी म्हणून मानली जावी. (छत्रपती शाहू महाराज व डॉ. आंबेडकर समग्र पत्रव्यवहार संपादक डॉ. संभाजी बिरांजे पान नं. १२०-१२१ त्यानंतर २१ फेब्रुवारी १९२१ रोजी मूकनायक चे संपादक डी.डी. घोलप यांना पुन्हा कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांकडून चेकने १००० रूपये मिळाले. तरीसुद्धा मूकनायक पाक्षिकाची आर्थिक कोंडी फुटेना , खडतर मार्ग सुकर होत नाही असे चिन्ह दिसत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवलग मित्र नवल भथेना यांनी मूकनायकाला सहकार्य केले होते. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दलितेतर सहकारी नवल भथेना यांच्यामध्ये पत्रव्यवहार झाला. त्या पत्रव्यवहारात उद्योगपती गोदरेजचा उल्लेख सापडतो. मूकनायक आपल्या सुरूवातीच्या अंकात गोदरेज कंपनीच्या सेफची (तिजोरी, कपाट) जाहीरात छापत असे. गोदरेजसारख्या नामांकित कंपनीची जाहीरात मूकनायक सारख्या दलित पाक्षिकाला मिळण्यामध्ये नवल भथेनांचाच मोठा वाटा होता. (परिवर्तनाचा वाटसरू डॉ. आंबेडकरांचे सहकारी नवल भथेना :प्रबोधन पोळ पा.न. ३४ अंक १६ ते ३० एप्रिल १९१८) नवल भथेनांनी मबकनायकांच्या आठ अंकात जाहीरात मिळवून दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूकनायक पाक्षिकामुळे अस्पृष्य बहिष्कृतांच्या चळवळीला नवी झळाली आली. मूकनायक पाक्षिकाची शताब्दी वर्ष आहे. त्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने वर्तमानपत्रातील पत्रकारिता बघून मन खिन्न होते. पत्रकारिता लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटले जाते. परंतु चौथ्या स्तंभाचे दर्शन दिग्दर्शन होतच नाही.  ज्या पद्धतीने वृत्तपत्रे, मासिके, नियतकालिके, अनियतकालिके इत्यादीनी भूमिका पार पाडायला पाहिजे. त्या पद्धतीने वृत्तपत्रे कार्य करीत नाही. कुठेतरी सत्यांवेषाची बाजू कमजोर झाली आहे. आणि कुठल्यातरी बंधनात अडकून अथवा दबावाखाली कार्य करणारी पत्रकारिता परावलंबी होत चालली. त्यामुळे सामाजिक स्वास्थ बिघडवताहेत. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेबाबतीत असे घडलेले नाही. स्वयंसिद्ध, सजग अनुभवातून सहजाणिवेतून अविष्कारलेली पत्रकारिता आक्रमक होती पण ती सम्यक अभिसरणाच्या दिशेनेच गेली होती. मूकनायकातून समाजाचे प्रतिबिंब झलकत होते. कारण समाजपरिवर्तनाच्या दृष्टीने पाक्षिक अथवा वृत्तपत्राचा हेतू डोळस असावा, ही भूमिका बाबासाहेबांची होती. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना प्रबुद्ध भारताचे स्वप्न साकार करता आले. दर्पणकार बाळशास्त्री  जांभेकरांच्या नावाने महाराष्ट्र शासन पत्रकारिता पुरस्कार देतो. त्याप्रमाणे मूकनायक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने महाराष्ट्र शासनाने पत्रकारितेचा पुरस्कार देण्यात यावा. त्यामुळे पत्रकारितेला नवे वैभव प्राप्त होईल. 

  • महेंद्र गायकवाड 

(आंबेडकरी साहित्याचे अभ्यासक)अंबाझरी टेकडी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ नागपूर  मो. ९८५०२८६९०५

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर