जनगणना म्हणजे जातिनामक रोगाचा एक्स-रे!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 07:50 AM2023-10-11T07:50:43+5:302023-10-11T07:52:41+5:30

जातीनिहाय जनगणनेविषयी अनेक गैरसमजुती आहेत. या जनगणनेमुळे प्रत्येक जातीचा मागासलेपणा किंवा पुढारलेपण याचे संपूर्ण चित्र समोर येईल.

Census is X-ray of caste disease | जनगणना म्हणजे जातिनामक रोगाचा एक्स-रे!

जनगणना म्हणजे जातिनामक रोगाचा एक्स-रे!

योगेंद्र यादव, अध्यक्ष, स्वराज इंडिया सदस्य, जय किसान आंदोलन -

‘जनगणनेसारख्या देश तोडण्याच्या विचारांचे समर्थन आपल्यासारखे बुद्धिजीवीसुद्धा कसे करू शकतात? आपल्याशी मतभेद नक्कीच आहेत; परंतु आपण किमानपक्षी सामाजिक सद्भावावर विश्वास ठेवता, असे मी मानत होतो.’ मी हैराण झालो हे ऐकून. बागेत फेरफटका मारताना हेच ते काका जे मला नेहमी भेटतात. भाजपचे समर्थक, मोदीभक्त आणि राखीव जागांचे कडवे विरोधक.

राजकीय विचार जुळत नसले तरी नेहमीप्रमाणे नमस्कार करतात, कुटुंबाचे क्षेमकुशल विचारतात आणि शालीनपणे वागतात. ते चिडले आहेत, हे त्यांच्या आवाजावरून जाणवत होते.

काका जे काही बोलत होते ते न जाणो कित्येक लोकांच्या मनात असेल. त्याचे तार्किक आणि खरे उत्तर देणे गरजेचे आहे. म्हणून राग आवरून मी त्यांना उत्तर दिले. 

‘काका, आपले बरोबर आहे. तुम्ही किंवा मी चुकूनसुद्धा असे काम करता कामा नये, ज्यामुळे देश तुटण्याचा धोका निर्माण होईल. जातीगणनेने तो धोका संभवतो असे तुम्हाला वाटते हे ऐकून मी हैराण झालो आहे. आपल्यासारखा माणूस जातीनिहाय जनगणनेचे समर्थन का करीत नाही, असा प्रश्न पडल्याने माझी संत्रस्तता वाढली आहे.’

ते अस्वस्थ झाल्याचे त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. मग मी माझा मुद्दा पुढे मांडला. ‘काका, असं बघा, तुमच्या-माझ्यात भले मतभेद असतील; पण जातिव्यवस्था भारतीय समाजाचा समाजाला लागलेला एक रोग आहे, यावर आपल्यात एकमत आहे ना? या रोगावर उपचार केले पाहिजेत की नाही? न उमगून असेल, त्यांनी होकार भरला आणि ते म्हणाले, ‘रोग तर आहे; पण आपण त्याच्यावर उपचार कुठे करीत आहात? जातीनिहाय जनगणना करून आपण तर रोग वाढवत आहात.

जाती मोजून जातिव्यवस्था संपुष्टात कशी येईल? संवाद सुरू झाला होता. मी माझा तर्क मांडणे सुरू केले. ‘काका, असे बघा, आजारी पडतो तेव्हा आपण डॉक्टरकडे जातो. हो की नाही? डॉक्टर आपल्याला तपासल्याबरोबर सगळ्यात पहिल्यांदा सांगतात की, ही चाचणी करा, ती चाचणी करा. हो की नाही? हाड मोडले असेल तर एक्स-रे काढायला सांगतात. पोटात दुखत असेल तर अल्ट्रासाउंड चाचणी, ताप असेल तर रक्ताची चाचणी करायला सांगतात. अशा चाचण्या केल्याने आजार बरा होत नाही; पण उपचारांची ही पहिली पायरी नक्कीच असते. तर मग आपण आता असे समजून घ्या, की जातीवार जनगणना म्हणजे जातिव्यवस्था नामक रोगाचा इलाज करण्यासाठी काढला गेलेला एक्स-रे आहे.’

माझे बोलणे मध्येच तोडत ते म्हणाले, जनसंख्या मोजून जातिव्यवस्थेच्या आजाराची चिकित्सा कशी होईल?’
 त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटायच्या आतच मी उत्तर देणे सुरू केले. ‘ही तर जातीनिहाय जनगणना करण्याविषयीची सर्वांत मोठी गैरसमजूत आहे. जनगणना केवळ वजन किंवा आकार मोजण्याची पद्धत नाही. जातीनिहाय जनगणना आपल्याला प्रत्येक जातीची शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक स्थिती काय आहे, याचा विस्तृत तपशील देत असते. 

आता आज बिहार सरकारने जनगणनेच्या आकड्यांचा पहिला हप्ता समोर ठेवला; विधानसभेच्या अधिवेशनात जेव्हा दुसरा हप्ता समोर येईल तेव्हा कळेल, बिहारमध्ये कोणत्या जिल्ह्यातल्या कोणत्या तालुक्यात कोणत्या जातीचे किती लोक अशिक्षित आहेत? किती मॅट्रिक उत्तीर्ण, किती पदवीधर, किती जणांना सरकारी नोकरी आहे, किती जणांकडे जमीन आहे? किती जणांकडे जीप किंवा कार आहे? संगणक किती जणांकडे आहे? कितीजण रोजंदारी करून आपला चरितार्थ चालवतात? याचा अर्थ जातीनिहाय जनगणनेमुळे प्रत्येक जातीचा मागासलेपणा किंवा पुढारलेपणा याचे संपूर्ण चित्र समोर येईल. म्हणून मी ‘एक्स-रे’ हा शब्द वापरतो आहे.’

काका पुन्हा चिडले. ‘जर आपला एक्स-रे इतका चांगला आहे, तर केवळ हिंदू समाज का? मुसलमानांमधील जातींची गणना का करीत नाही?’ प्रश्न अगदी सरळ होता आणि उत्तरसुद्धा. ‘काका, आपण बिहारच्या जातीनिहाय सर्वेक्षणाचा अहवाल वाचलेला नाही, असे दिसते. त्यात जशी हिंदूंच्या प्रत्येक जातीची गणना केली गेली आहे त्याचप्रकारे मुस्लिमांतील सुमारे दोन डझन जातींमधला तपशील दिला गेला आहे. या जनगणनेतून पहिल्यांदा मुस्लिमांमधले जे मागासलेले आहेत त्यांचे वास्तव समोर आले आहे.’

शेवटी गोष्ट मोदींपर्यंत जाणारच होती. ते म्हणाले, ‘जातीय जनगणनेमुळे देशाच्या ऐक्याला धोका आहे.’ आता मात्र मला हसू आवरले नाही. याचा अर्थ असा की, पंतप्रधान म्हणत आहेत की, २०१० मध्ये जातीवार जनगणनेचे संसदेत समर्थन करून भाजपाने देश तोडण्याचा गुन्हा केला होता. २०१८ साली त्यांचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेच्या पटलावर जातीय जनगणनेचे आश्वासन का दिले होते? बिहारमधील भाजपा आजसुद्धा या जनगणनेचे समर्थन का करीत आहे? माझे हे उत्तर पूर्ण होण्याच्या आतच काका पुढे निघून गेले होते.

Web Title: Census is X-ray of caste disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.