- नंदकिशोर पाटीलसंपूर्ण जग सध्या कोरोना विषाणूच्या विळख्यात आहे. या साथीच्या आजारामुळे अनेकांचे वर्तमान व भविष्यही अंधकारमय झालेले असताना मानवी मूल्यांसाठी आपल्या चरितार्थाच्या साधनांवर पाणी सोडण्याचा वेडेपणा कोण करेल? पण ब्रिटनमधल्या चार लेखकांनी तो केला आहे. फॉक्स फिशर, ड्र्यू डेव्हिस आणि उगला स्टेफानिया जेंस्टीटीर हे ते ब्रिटिश वेडेपीर. चौथा लेखक अनामिक आहे. या चौघांनी लिंग परिवर्तित (ट्रान्सजेंडर) लोकांच्या हक्कांसाठी एका नामांकित प्रकाशनविषयक संस्थेचा राजीनामा दिला आहे. ‘हॅरी पॉटर’ची जगप्रसिद्ध लेखिका जे. के. रोलिंग यांच्यासाठी ही संस्था काम करते.रोलिंग यांच्यामुळे सध्या ब्रिटनमध्ये मोठे वैचारिक आणि सामाजिक वादळ उठले आहे. समलैंगिकता आणि लिंग परिवर्तित लोकांच्या लैंगिक संबंधांना काही अपवाद वगळता जगभर मान्यता मिळालेली असताना या रोलिंगबार्इंनी ट्रान्सजेंडर कम्युनिटीच्या विरोधात सोशल मीडियात पोस्ट टाकून खळबळ उडवून दिली आहे. रोलिंग यांच्या मते, ‘जर ३० वर्षांनंतर माझा जन्म झाला असता तर मी कदाचित लिंग परिवर्तनाबद्दल विचार केला असता. स्त्रीत्व टाळण्याचे वा ते मिळविण्याचे आकर्षण मोठे असते; पण अशा प्रकारच्या शारीरिक बदलातून काही साध्य होईल असे मला वाटत नाही.’ लहानपणी आपण घरगुती हिंसाचार आणि लैंगिक अत्याचाराच्या शिकार ठरल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला आहे. रोलिंग सध्या लहान मुलांसाठी ‘द इकाबॉग’ नावाची कादंबरी लिहिण्यात व्यस्त आहेत. या कादंबरीचा पहिला अध्याय त्यांनी आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केला आहे. एकीकडे या कादंबरीला बच्चे कंपनीकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असताना, दुसरीकडे ट्रान्सजेंडरविरोधी मतामुळे त्या टीकेच्या धनी ठरल्या आहेत. अनेकांनी त्यांना ‘ट्रोल’ केले आहे. ‘रोलिंग यांनी ‘हॅरी पॉटर’च्या काल्पनिक विश्वातून जरा बाहेर डोकावून पाहिले तर त्यांना आधुनिक जगाच्या वास्तवाची जाणीव होईल,’ अशी टीका होत आहे. रोलिंगबाई आपल्या ट्रान्सजेंडरविरोधी मतांसाठी यापूर्वीही टीकेच्या लक्ष्य ठरल्या आहेत. नव्या वादाला ठिणगी पडली ती एका वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या ‘कोविड-१९ नंतर अशा जगाची निर्मिती होईल की, ज्यात मासिक पाळी येणाऱ्या लोकांना समानता मिळेल’ अशा शीर्षकाच्या एका लेखामुळे! या लेखावर प्रतिक्रिया व्यक्त करताना रोलिंगबार्इंनी ‘ज्यांना मासिक पाळी येते, त्यांना स्त्री म्हणतात, लोक नव्हे!’ अशी काहीशी व्यंगात्मक टिप्पणी केली आणि वादाला तोंड फुटले.
'या' लेखकांची जातकुळी कंची?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 03:11 IST