शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

शास्त्राच्या धाकाला वळसा घालता येतो का?... तर हो! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 08:32 IST

अभिजात गायनाबरोबरच कितीतरी वाटांनी भारतीय रागसंगीताचे अनोखेपण सांगणाऱ्या व्रतस्थ योगिनी प्रभा अत्रे यांना अखेरचा निरोप देताना... 

- वंदना अत्रे(शास्त्रीय संगीताच्या अभ्यासक)

शास्त्र काट्यावर तोललेले संगीत परंपरेच्या जोखडातून मुक्त करीत मोकळ्या अवकाशात आणण्याचा ध्यास सोपा नसतो. स्वरांच्या मोकळ्या, निरभ्र अवकाशात वावरताना जमिनीवर असलेल्या रसिकांचे बोट अलगद पकडून त्यांना आपल्यासोबत नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या कलाकारांचे संगीतावर प्रेम असतेच, पण रसिकांवर ते चिमूटभर अधिक असते ! असे प्रेम करणाऱ्या दुर्मिळ जातकुळीच्या कलाकाराला, डॉ. प्रभा अत्रे यांना रसिकांनी अखेरचा निरोप दिला. शास्त्रीय संगीत सर्वसामान्य रसिकांपर्यंत पोहोचले तरच ते टिकून राहील, कारण रसिकच त्याचा सांभाळ करतील, असा विश्वास असलेल्या प्रभाताई सतत त्यासाठी अनेक तऱ्हेने प्रयत्न करीत होत्या.

मैफली हा त्यातील एक मार्ग होता. त्याच्याशिवाय लेखन, संगीताचे मर्म उलगडून सांगणाऱ्या कार्यशाळा, भाषणे अशा कितीतरी वाटेने त्या भारतीय रागसंगीताचे अनोखेपण सांगत आणि समजावत राहिल्या. स्वेच्छेने हे व्रत स्वीकारणाऱ्या व्रतस्थ योगिनीची अखेर ही या अर्थाने अभिजात भारतीय संगीताची मोठी हानी करणारी आहे! स्त्री कलाकारांना रंगमंचावर प्रतिष्ठा मिळावी यासाठी धडपड करणाऱ्या  हिराबाई बडोदेकर या त्यांच्या गुरू. हिराबाईंची ही धडपड  एक शिष्य म्हणून प्रभाताई यांनी अगदी जवळून पाहिली होती. प्रभाताईंसारख्या स्त्री कलाकाराला त्यामुळे समाजाने सहज स्वीकारले, प्रतिष्ठा दिली ती हिराबाई यांच्या प्रयत्नांमुळे!

स्वतःची साधना करताना त्याच्या कितीतरी पलीकडे असलेल्या संगीताकडे बघण्याची, त्याच्या भविष्याचा विचार करण्याची ही दृष्टी प्रभाताई यांनी गुरूंकडून उचलली आणि मग त्या वाटेवर त्याही पुढे जात राहिल्या. संगीतानेच त्यासाठी प्रभा अत्रे यांची निवड केली असेल का? एखादी कला मळलेल्या वाटेने संथपणे पुढे सरकत असताना तिला नवी वाट दाखवण्यासाठी नियतीच अशी निवड करत असते. पंडित कुमार गंधर्व, भीमसेनजी, किशोरीताई यांच्यासह डॉ. प्रभा अत्रे हे नियतीने निवडलेले मूठभर भाग्यवंत असावेत. प्रत्येकाचे योगदान वेगळे. ‘संगीत हे आपल्या शिक्षणाचा भाग बनले नाही तर शास्त्रीय संगीत हे मूठभर रसिकांपुरते उरेल’ असे आग्रहाने सांगणाऱ्या प्रभा अत्रे यांनी आपल्या गायकीत सतत अनेक प्रयोग केले. रांगोळीचे नाजूक ठिबके काढावे तेवढ्या सुबकतेने त्यांच्या ख्याल गायनात सरगम यायची आणि रसिकांचे लक्ष वेधून घ्यायची.

उत्तम शिक्षण आणि अतिशय अनुकूल वातावरण कुटुंबात असताना संगीत हे विरंगुळ्यापुरते निवडण्याची चैन प्रभाताईंना नक्कीच करता आली असती. ती नाकारून त्यांनी संगीत निवडले. सुरेशबाबू माने आणि हिराबाई यांच्याकडून अतिशय रसाळ अशी किराणा गायकी गळ्यावर चढल्यावर फक्त मैफली करीत राहणे हेही त्यांना सहज शक्य होते; पण संगीताला निव्वळ चरितार्थाचे साधन न मानता त्यांनी त्यावर चिंतन सुरू केले. ‘परंपरा आणि शास्त्राचा धाक अडसर होऊन कलेच्या मार्गात उभा राहिला तर कला प्रवाही कशी होणार, असा सवाल याच चिंतनातून त्यांनी मांडला. तेव्हा त्यांच्या मैफलीतून कलेच्या नव्या प्रवाहाचे रसरशीत दर्शन त्या घडवत होत्या.

अमूर्त संगीत मूर्त रूपात रसिकांना दिसावे यासाठी कराव्या लागणाऱ्या साधनेबद्दल त्या बोलत राहिल्या. त्यासाठी त्यांनी अनेक नव्या, कालसुसंगत अशा बंदिशी रचल्या आणि गायल्या. मारू बिहागमधील त्यांच्या अशाच एका बंदिशीने शास्त्रीय संगीताशी कट्टर वैर असलेल्या लोकांनासुद्धा वेडे केले. मारू बिहाग (जागू मै सारी रैना) आणि कलावती (तन मन धन तोपे वारु) रागाच्या त्या एका तबकडीने डॉ. प्रभा अत्रे हे नाव शब्दशः घरोघर गेले. या अफाट लोकप्रियतेच्या पुण्याईवर जगणे नाकारून त्या नवे काही मांडत राहिल्या हे त्यांचे मोठेपण! परंपरेशी बंडखोरी करण्याचा अभिनिवेश त्यांनी कधीच दाखवला नाही; पण तरीही नव्या वाटा दाखवत राहिल्या.  असे  कलाकार जेव्हा प्रस्थान ठेवतात तेव्हा केवळ दुःख होत नाही, त्या दुःखाला काळजीची एक बारीकशी किनार असते... ती अस्वस्थ करणारी आहे! 

टॅग्स :Puneपुणे