शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
2
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
3
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
4
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
5
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
6
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
7
वारंवार हल्ले करणाऱ्या कुत्र्यांना जन्मठेप होणार! उत्तर प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय
8
इश्क का जुनून! ६ मुलांचा ३८ वर्षीय बाप पडला १७ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात; पुढे झालं असं काही...
9
ऑनलाईन गेमचा नाद लय बेकार! ११ लाख गमावल्यानंतर सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
10
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन 
11
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
12
वाशीच्या दिशेने येणारा ट्रक उड्डाणपुलावरून कोसळला, मुंबई-पुणे महामार्गावरील घटना
13
Pitru Paksha 2025: पितृपक्षात कसे केले जाते दशमी श्राद्ध? वाचा महत्त्व, मुहूर्त आणि श्राद्धविधी!
14
दुकानं-बस वाहून गेल्या, सगळीकडे पाणीच पाणी! हिमाचलच्या मंडीमध्ये पावसामुळे हाहाकार; ३ जणांचा मृत्यू
15
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
16
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
17
अभिनेत्री हुमा कुरेशीने गुपचूप उरकला साखरपुडा, खाजगी समारंभातील फोटो आला समोर
18
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
19
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
20
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?

श्वासातून ऑक्सिजन घेत आहोत की विष?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 07:11 IST

पुढच्या पिढीला आम्ही काय देणार आहोत? पैसा, गाडी, बंगला हवाच; पण आरोग्यही ठणठणीत हवे! तेच नसेल तर या भौतिक समृद्धीचा काय उपयोग?

विजय बाविस्करसमूह संपादक, लोकमत vijay.baviskar@lokmat.com

पुढच्या पिढीला आम्ही काय देणार आहोत? पैसा, गाडी, बंगला हवाच; पण आरोग्यही ठणठणीत हवे! तेच नसेल तर या भौतिक समृद्धीचा काय उपयोग? 

प्रश्न केवळ जागतिक तापमानवाढीचा नाही. तो प्रदूषणवाढीचादेखील नाही. मूळ प्रश्न आहे आपल्या आरोग्याचा! चिंतामुक्त, आनंदी आणि निरोगी जगण्याचा! शहरे प्रदूषणाच्या विळख्यात सापडली हे खरेच. पण, खिशात दमडी नसतानाही आनंदी जीवन जगणारा गावातला सर्वसामान्य शेतकरीदेखील अस्वस्थ झाला आहे. आरोग्याचे अनेक गंभीर प्रश्न त्याच्याही घरापर्यंत धडकले आहेत. बीपी, शुगरपासून हार्ट अटॅक, किडनी फेल होण्यापर्यंतच्या सर्व आजारांशी हा गावातला माणूसही झगडत आहे. गावांचा जीडीपी वाढला, आनंद मात्र कमी झाला! पैसा येऊ लागला; पण खर्चही कितीतरी पटीने वाढला. विकास आपल्याला  हवा आहेच; पण त्यासाठी मोजायची किंमत कोणती आणि किती, हे ठरविण्याची वेळ आता आली आहे.  आपली जगण्याची जी पद्धत आहे, त्यावरच पुन्हा विचार करण्याचीही वेळ आली आहे.  ‘रॅंचो’ने त्याची सुरुवात केली आहे. 

जागतिक तापमानवाढीमध्ये स्थानिक प्रदूषणाचादेखील वाटा आहे. त्यामुळे लडाखच्या पर्यावरणाला फटका बसू नये हा प्रश्न हाती घेऊन ‘थ्री इडियट‌्स’मधला ‘रियल रॅंचो’ सोनम वांगचूक समोर आला आहे. पर्यावरणाच्या ऱ्हासाचा हा फटका केवळ लडाखला किंवा वांगचूकलाच बसतोय असे नाही. तुम्ही-आम्ही सर्वजण रोजच्या जगण्यात क्षणोक्षणी हे फटके अनुभवत आहोत; परंतु ‘रॅंचो’ होऊन रस्त्यावर उतरण्याची हिंमत आपल्यामध्ये नाही. जे चालले आहे ते चूक आहे, असे सांगण्याचे धाडसही आपण दाखवत नाही. कळून, सवरूनही गंजीजवळ निखारा ठेवण्याचाच हा प्रकार! मग काय, आज ना उद्या आग लागणारच! सारे काही खाक होणारच! विकासासाठी होणाऱ्या काही कामांमुळे उत्तराखंडातील जोशीमठमध्ये घरं, रस्ते, दुकानं, हॉटेल सर्वांना तडे गेले आहेत, लोकांना स्थलांतर करावं लागलं आहे. समुद्रावरील अतिक्रमण आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे मुंबईसह देशातील १० शहरे २०५० पर्यंत पाण्याखाली जाण्याचा धोका शास्त्रज्ञांनी दिला आहे. तरीही आपण सावध व्हायला तयार नाही. 

एकीकडे नव्या वर्षाच्या स्वागताचा जल्लोष सुरू असताना, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत प्रदूषित शहरांची आकडेवारी जाहीर केली. त्यात देशाची राजधानी दिल्ली पहिल्या क्रमांकावर, दिल्लीला लागूनच असलेले हरयाणातील फरिदाबाद दुसऱ्या, तर उत्तर प्रदेशातील गाझियाबाद तिसऱ्या स्थानावर झळकले. या आकडेवारीनुसार देशातील १८५ पैकी १८ शहरांमध्ये हवेची गुणवत्ता अतिशय खराब आहे. १५ शहरांमधील स्थिती काठावर आहे. ३७ शहरांमध्ये समाधानकारक, तर ४२ शहरांमधील स्थिती खराब आहे. प्रदूषित ‘टाॅप टेन’मध्ये महाराष्ट्रातील एकही शहर नाही, हा काहीसा दिलासा; पण म्हणून जल्लोष करण्याची ही वेळ नाही. नवी मुंबई, नागपूर, पुणे शहरातील प्रदूषणाची स्थिती अतिशय वाईट नसली तरी चांगलीही नाही. राज्याची राजधानी मुंबई, औरंगाबाद, सोलापूर या शहरांमधील प्रदूषण काठावर आहे. अमरावती, नाशिक या शहरांची स्थिती मात्र समाधानकारक आहे.

प्रदूषणात जगाच्या नकाशावरही आपण पुढे आहोत. सर्वाधिक वायू प्रदूषण करणाऱ्या ‘टॉप टेन’ शहरांमध्ये भारतातील तीन शहरे आहेत. एक देशाची राजधानी दिल्ली, दुसरे कोलकाता आणि तिसरे शहर आहे महाराष्ट्राची मुंबई. हे काही भूषण नाही. प्रदूषणाकडे असेच दुर्लक्ष होत राहिले, तर आज ज्या शहरांची स्थिती खराब आहे ती अतिशय वाईट व्हायला, जे काठावर आहेत ते खराब स्थितीमध्ये यायला आणि समाधानकारक आहेत ती शहरे काठावर येण्यास फारसा वेळ लागणार नाही. तापमान किंवा प्रदूषण वाढले तर मला काय फरक पडणार, मी एकट्याने बदलून काय उपयोग, मी एकट्याने प्रदूषण केल्याने अशी किती वाढ होणार, या व अशा भाबड्या प्रश्नांमुळे परिस्थिती आणखी बिघडत चालली आहे.  

आपण नाकावाटे जो ऑक्सिजन घेतो, त्यातून शरीराला ९० टक्के ऊर्जा मिळते. उर्वरित दहा टक्के ऊर्जा खाण्या-पिण्यातून मिळते. ९० टक्के ऊर्जा देणारा आपला श्वास खरंच ऊर्जा देत आहे की आजारपण? जागतिक आरोग्य संघटेनेच्या निकषानुसार हवेत अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण २५ मायक्रोग्रॅमपर्यंत असायला हवे. प्रत्यक्षात आपल्या शहरात यापेक्षा जास्त धूलिकणांची नोंद होते. लहान मुले आणि वृद्धांना याचा सर्वाधिक फटका बसतो. या कणांमुळे फुप्फुसांमध्ये संसर्ग, दम्याचे आजार वाढतात. आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार एकूण मृत्यूंपैकी २३ टक्के मृत्यू हे प्रदूषणामुळे होतात.  

राज्यातील चंद्रपूरचे उदाहरण पाहू. २०२२ या वर्षामध्ये चंद्रपूरमध्ये ३६५ पैकी केवळ २९ दिवस दररोज घेतला जाणारा श्वास आरोग्यदायी होता. १६४ दिवस कमी प्रदूषण होते. १५० दिवस जास्त प्रदूषण होते. २२ दिवस अत्यंत हानिकारक होते. प्रदूषणाची तीव्रता पाहण्यासाठी वर्षभरापूर्वी शहरात कृत्रिम फुप्फुस लावण्यात आले. अगदी सहा दिवसांत ते काळवंडून गेले. शहरात राहणाऱ्यांच्या  फुप्फुसांचे काय होत असेल? या जीवघेण्या प्रदूषणामुळे ९२ टक्के चंद्रपूरकरांचा जीव शहरात गुदमरत आहे. तब्बल ७० टक्के लोकांची गाव सोडून जाण्याची तयारी आहे. एका ऑनलाइन सर्वेक्षणातून ही माहिती अलीकडेच समोर आली आहे. औद्योगिक भरभराट झालेल्या सर्वच शहरांमध्ये कमी-अधिक प्रमाणात हीच स्थिती आहे. सध्याचीच स्थिती इतकी गंभीर, तर उद्या काय वाढून ठेवले असेल?  श्वसनाद्वारे घेतला जाणारा ऑक्सिजन ऊर्जा देण्याऐवजी शरीरात विष पसरवणार असेल, तर पुढची पिढी आपल्याला माफ कशी करील? पुढच्या पिढीला आम्ही काय देणार आहोत? लाखो-करोडो रुपयांमधली संपत्ती पुढच्या पिढीला देण्याचा अभिमान बाळगायलाच हवा. पैसा, गाडी, बंगला असायलाच हवा; पण सोबत आरोग्यही ठणठणीत हवे! तेच नसेल तर या भौतिक समृद्धीचा काय उपयोग? आजारपणात पिचलेल्या शरीराला आणि मनालाही या गाडी-बंगल्याचा आनंद तरी कसा मिळेल ?