‘धनुष्य’वाल्यांची अ‍ॅलर्जी

By सचिन जवळकोटे | Published: March 15, 2018 12:17 AM2018-03-15T00:17:18+5:302018-03-15T00:17:18+5:30

गेल्या काही दिवसांपासून ‘मातोश्री’वर प्रचंड अस्वस्थता पसरलेली. चार वर्षांत अशोकराव नांदेडकर अन् पृथ्वीबाबा क-हाडकर यांचेही चेहरे एवढे कधी सुकले नसतील, एवढ्या वेदना ‘मातोश्री’वरील लाल बत्तीवाल्या सरदारांच्या तोंडावर दिसू लागलेल्या.

'Bow' allergens | ‘धनुष्य’वाल्यांची अ‍ॅलर्जी

‘धनुष्य’वाल्यांची अ‍ॅलर्जी

Next


गेल्या काही दिवसांपासून ‘मातोश्री’वर प्रचंड अस्वस्थता पसरलेली. चार वर्षांत अशोकराव नांदेडकर अन् पृथ्वीबाबा क-हाडकर यांचेही चेहरे एवढे कधी सुकले नसतील, एवढ्या वेदना ‘मातोश्री’वरील लाल बत्तीवाल्या सरदारांच्या तोंडावर दिसू लागलेल्या. अनेकांचं वजन अकस्मातपणे घटत चाललेलं. भल्या-भल्यांची नाडी ओळखण्यात माहीर असलेल्या मिलिंदालाही म्हणे या दुखण्याचं मूळ सापडेनासं झालेलं.
पाठीमागं हात बांधून विमनस्क अवस्थेत येरझाऱ्या घालणाºया उद्धोंनी हाक मारताच सुरुवातीला रडत-खडत रामदास भाई आले. महाबळेश्वरला साहेबांना कानठळ्या बसताच एका क्षणात भलं-मोठं हॉटेल बंद करताना त्यांनी जो उत्साह दाखविला होता, त्याच्या दहा टक्केही एनर्जी या क्षणी त्यांच्यात कुठं दिसत नव्हता. त्यांच्या पाठोपाठ विस्कटलेली दाढी कुरवाळत एकनाथ भाईही आले. ‘तुम्ही सीएम् व्हाल,’ असा आशीर्वाद मनोहरपंतांनी देऊनही त्यांच्या चेहºयावर म्हणावा तसा आनंद दिसत नव्हता. सुभाषरावही नेहमीच्या गंभीर चेहºयानंच आले. ‘मातोश्री’वरच्या अनेक स्थित्यंतराचा अनुभव गाठीशी असल्यानं त्यांच्या चेहºयावरची रेषाही बदलली नसली तरी काहीतरी प्रॉब्लेम झालाय, हे कळत होतं.
दिवाकररावही पाठीत वाकूनच आत आले. एसटीतल्या खासगीकरणाचा प्लॅन एवढा जड असू शकत नाही, हे माहीत असल्यानं त्यांच्याही दुखण्याचा कुणालाच शोध लागेना. त्यानंतर दीपक डॉक्टरही एखाद्या रुग्णासारखंच थकल्या अवस्थेत आले. सातारी अधिकाºयांना पुरंदरच्या निवासस्थानी बोलावून तेथून परजिल्ह्यावर कंट्रोल करू पाहणारे विजयबापूही केविलवाण्या चेहºयानंच प्रवेशले.
या साºयांना वेगवेगळ्या स्पेशालिस्ट डॉक्टरांनी तपासलं. सारे रिपोर्ट नॉर्मल आल्यामुळं या साºयांचं दुखणं समजतच नव्हतं. उद्धोंची घालमेल वाढतच चाललेली. कुणीतरी मांत्रिकाचा उतारा देण्याचा सल्ला दिला. मात्र, नारायणदादांच्या लाल दिव्याचं भविष्य खोटं भरल्यापासून कोकणातले बहुतांश भगत म्हणे गायब झालेले.
‘एकीकडं ओरडून ओरडून माझा घसा बसला तरी हरकत नाही; परंतु तुम्ही सारे व्यवस्थित खाऽऽ प्याऽऽ,’ असा सल्ला आपण आपल्या लाल बत्तीवाल्यांना देऊनही हे सारे खराब का होत चाललेत, याचं कोडं काही उद्धोंना सुटत नव्हतं. अनेक राजकीय तज्ज्ञही येऊन हात हालवत परतले. आता मात्र या घटनेची चर्चा सर्वत्र सुरू झाली. नितीनराव डोंबिवलीत बोलल्यानंतर जेवढा गदारोळ उडाला, त्याहीपेक्षा जास्त ‘धनुष्यवाल्यांचा अनामिक आजार’ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रकारामुळं थोरले काका बारामतीकरही गोंधळले. चॅनेलवाल्यांसमोर धनंजय बीडकरांचं नाव घेण्याऐवजी धनंजय कोल्हापूरकरांचा उल्लेख करू लागले.
पाहता-पाहता ही बातमी जगभरात पोहोचली. चंद्राबाबूंच्याही कानावर पडली. ते मात्र हळूच हसले. त्यांनी थेट उद्धोंना मोबाईल लावला... अन् या आजारामागचं खरं कारण सांगितलं, ‘गेल्या अनेक महिन्यांपासून तुमचे सारे सरदार खिशात राजीनाम्याचा कागद घेऊन फिरत असल्यानं त्याचं इन्फेक्शन झालंय. एक तर ही बुरशी लागलेली कागदं ताबडतोब कचरा कुंडीत फेकून द्या किंवा देवेंद्रपंतांकडं तरी पाठवा.’

Web Title: 'Bow' allergens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.