शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

काळे काका!

By admin | Updated: September 6, 2016 03:44 IST

काळे काका अशांना कवटाळून घ्यायचे. ते स्वत:बद्दल फारसे बोलत नसत. त्यांना कुणी म्हटले ‘काका तुमचे काम फार मोठे आहे.

आपण फार काळ जगणार नाही ही गोष्ट त्यांना कळून चुकली असेल कदाचित, स्रेहांचलमधून निघताना काळे काकांनी थांबवले, ‘मी समाधानी आहे आणि आनंदीही...मला या वेदना अनुभवायच्या होत्या’सुरेश काळे परवा गेले. मेडिकल कॉलेजच्या कुटुंबाचे ते काका. कर्करोगाने उमेद हरवलेल्या रुग्णांच्या वेदनेशी त्यांची नाळ जुळली होती. मेडिकलमध्ये येणाऱ्या रुग्णांना त्यांचा आधार होता. दु:खितांचे अश्रू पुसण्यासाठी समाजसेवेचा वडिलोपार्जित वारसा असावाच लागतो असे नाही. मालगुजारीतून मिळालेल्या वलयातून अनेकांना अहंकाराचा रोग जडतो. असे अहंकाराने फसफसत असलेले समाजसेवक आपल्या अवती-भवती पाहायला मिळतात. काळे काकांना असा कुठलाही वारसा नव्हता आणि सेवेची शिकवणही नाही. कृषी विभागातील नोकरी सांभाळून ते रुग्णांची सेवा करायचे. एके दिवशी नोकरी सोडून दिली आणि स्वत:ला रुग्णसेवेत झोकून दिले. मेडिकलमध्ये येणारे रुग्ण हाच त्यांचा गोतावळा. तिथे ते सतत धावपळीत असायचे. रुग्णांना डॉक्टरकडे घेऊन जाणे, त्यांच्या उपचाराची व्यवस्था करणे, याच कामात ते व्यग्र असायचे. एखाद्या गरीब रुग्णासोबत रात्री कुणी नसेल तर रात्रभर त्याच्याजवळ ते थांबायचे. काका चिंतेत दिसले की समजून जावे, कुठल्या तरी रुग्णाची अवस्था त्यांना अस्वस्थ करून गेली आहे. कर्करुग्णाशी रक्ताचे नाते असले तरी आप्तस्वकीय त्याच्याशी अंतर ठेवून राहतात. काळे काका अशांना कवटाळून घ्यायचे. ते स्वत:बद्दल फारसे बोलत नसत. त्यांना कुणी म्हटले ‘काका तुमचे काम फार मोठे आहे. आम्हाला सत्कार करायचा आहे’. त्यावर त्यांचे उत्तर ठरलेले, ‘माझा सत्कार कशाला करता, त्याऐवजी रुग्णांची सेवा करा, त्यांना मदत करा. हाच खरा सत्कार आहे’. समाजाला अशा प्रामाणिक कार्यकर्त्यांचा सत्कार नेहमी करावासा वाटतो. पण, त्यांच्यासारखी रुग्णसेवा आपण करू शकत नाही. त्यासाठी मन मोठे असावे लागते. आत्म्याच्या गाभाऱ्यात दीन-दुबळ्यांबद्दल करुणा असावी लागते. हे आपण करू शकत नसल्याचे अपराधीपण मनाला सतत बोचत असते. त्याचे प्रायश्चित घेण्यासाठी मग अशा कार्यकर्त्यांच्या सत्काराचा सोईचा मार्ग आपण निवडतो. काळे काकांना या मतलबी आणि सत्कारप्रवृत्त दुनियेची रीत ठाऊक असल्याने ते अशा सत्कारांना बळी पडले नाहीत आणि त्यांनी कुणाला प्रायश्चितही घेऊ दिले नाही. मेडिकलच्या कर्करोग विभागात रुग्णांना अत्याधुनिक उपचार मिळावेत यासाठी ते सतत भांडायचे. चार वर्षांपूर्वी मेडिकलच्या गेटसमोर त्यांनी आंदोलन केले. तत्कालीन आमदार आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार दरबारी हा प्रश्न मांडला. सरकारने स्वतंत्र कॅन्सर इन्स्टिट्यूटची नंतर घोषणाही केली. त्याचे खरे श्रेय काळे काकांना. पण, या कामाचे डफडे त्यांनी कधी वाजवले नाही. वर्षभरापूर्वी त्यांना कर्करोगाने गाठले. रुग्णांची सेवा करताना प्रकृतीकडे एव्हाना दुर्लक्ष झाले होते. त्यापूर्वी त्यांना क्षयरोग झाला. त्यातून बरे होत नाही तोच कर्करोग. डॉक्टर परिचयाचे असूनही मेडिकलच्या रांगेत ते इतर रुग्णांसोबत बसलेले दिसायचे. त्या अवस्थेतही ते वेदनेने कण्हत असलेल्या रुग्णांचे डोळे पुसायचे. आठवडाभरापूर्वी त्यांची प्रकृती खूपच खालावली. मेडिकलमधून त्यांना स्रेहांचल केंद्रात भरती करण्यात आले. उपचारांमुळे त्यांचे डोक्यावरचे केस गळून गेले होते, प्राणांतिक वेदना होत असल्याचे जाणवायचे. पण, काकांच्या चेहऱ्यावरील हास्य कायम होते. त्या अवस्थेतही त्यांचा जीव मेडिकलमधील रुग्णांमध्येच गुंतला होता. आपण फार काळ जगणार नाही ही गोष्ट त्यांना कळून चुकली असेल कदाचित, स्रेहांचलमधून निघताना त्यांनी थांबवले, ‘मी समाधानी आहे आणि आनंदीही... मला या वेदना अनुभवायच्या होत्या....’. या देवमाणसाच्या वाक्याची अर्थसंगती कशी लावायची? तेवढी आपली कुवतही नाही. कर्करुग्णांची सेवा करताना त्यांच्या वेदनेशी एकरूप होणाऱ्या या भल्या माणसाला त्या वेदना अनुभवाव्या वाटाव्यात! करुणेच्या या तळाशी आपण नाही पोहचू शकत. कारण ‘दुरितांचे तिमिर जावो’ अशी प्रार्थना करीत असताना ‘हात पाय सुखाचे ठेव’ असे वैयक्तिक मागणेही आपण मागत असतो. तो माणसाचा सहजभाव आहे. काळे काका नावाचा हा भला माणूस या स्वार्थभावापलीकडे कधीचाच गेला होता. तो कुठल्या मातीचा होता, माहीत नाही. पण, सेवेची, दिव्यत्वाची प्रचिती मागे ठेवून तो निघून गेला.- गजानन जानभोर