भाजपला एक शिवसेना मिळाली, आता एक ठाकरे हवेत!; समजून घ्या भाजपाचं १+१ चं 'गणित'

By यदू जोशी | Published: September 2, 2022 09:00 AM2022-09-02T09:00:23+5:302022-09-02T09:03:09+5:30

राज ठाकरेंसारखा गर्दीखेच नेता विरोधात राहणे भाजपला परवडणारे नाही. व्हिडिओ लावत बसले तर? पण भाजपच्या हाकेला राज कसा प्रतिसाद देतील?

BJP got a Shiv Sena now they want a Thackeray here is full plan of bjp for elections | भाजपला एक शिवसेना मिळाली, आता एक ठाकरे हवेत!; समजून घ्या भाजपाचं १+१ चं 'गणित'

भाजपला एक शिवसेना मिळाली, आता एक ठाकरे हवेत!; समजून घ्या भाजपाचं १+१ चं 'गणित'

googlenewsNext

यदु जोशी
सहयोगी संपादक, लोकमत

राज ठाकरेंसारखा गर्दीखेच नेता विरोधात राहणे भाजपला परवडणारे नाही. व्हिडिओ लावत बसले तर? पण भाजपच्या हाकेला राज कसा प्रतिसाद देतील?

मुंबई, ठाणे आणि परिसरात शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपने शिंदे सेना उभी केली आहे. शिवसेनेत उभी फूट पाडल्यानंतर आता भाजप एक ठाकरेही (राज) सोबत घ्यायला निघाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखीलराज ठाकरे यांच्या भेटीला (गणपती दर्शनाला) गेले. भाजप-शिंदे-राज हा फॉर्म्युला तयार होताना दिसत आहे.

एक शिवसेना आणि एक ठाकरे सोबत असले की 'मातोश्री'चा खेळ खल्लास होईल, असे गणित भाजपने मांडलेले दिसते. कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिका ताब्यात घेण्याची भाजपची महत्त्वाकांक्षा आहे. फडणवीसांसारखा चमत्कार घडवून आणणारा दमदार नेता आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची साथ आहे आणि उद्या राज ठाकरेही सोबत आले तर मराठी मतांच्या आघाडीवर उद्धव ठाकरेंना मोठा फटका बसेल हे उघड आहे. फडणवीस-राज, तावडे-राज, बावनकुळे-राज या भेटी हवापाण्याच्या गप्पा मारायला नक्कीच नव्हत्या. कुछ तो लोच्या है!

मात्र, राज ठाकरेंच्या मनसेशी युती करावी की नाही, याबाबत भाजपमध्ये अजूनही दोन प्रवाह आहेत. एक ठाकरे त्रासदायक ठरले, आता दुसऱ्या ठाकरेंना कशाला मोठे करता? - अशी भूमिका असलेले काही जण नक्कीच आहेत. एका ठाकरेंना शह द्यायचा असेल तर दुसरे ठाकरे सोबत लागतीलच, लोहा लोहे को काटता है, असा तर्क देणारेही आहेत. मनसेला वेगळे लढू द्यावे आणि त्यासाठी त्यांना रसद पुरवावी, त्यातून शिवसेनेच्या परंपरागत मतांमध्ये फूट पडेल आणि ती बाब भाजपच्या पथ्यावर पडेल, असे समीकरणही काही जण मांडतात. राज ठाकरेंना प्रत्यक्ष सोबत घ्यायचे की अप्रत्यक्षपणे त्यांची साथ घ्यायची, यावर भाजपमध्ये एकमत झालेले नसले तरी राज यांच्याशी जवळीक वाढविण्यावर आणि त्यांना कुठल्या का पद्धतीने होईना; पण सोबत घेण्यावर एकमत झाल्याचे दिसते. वाढलेल्या गाठीभेटी तेच सांगतात. मनसेचा एखादा नेता किंवा राज यांचे पुत्र अमित यांना मंत्रिमंडळात घेऊन राज यांच्या समर्थकांची सहानुभूती मिळविण्याची खेळीही भाजपकडून खेळली जाऊ शकते.

भाजपला एक शिवसेना मिळाली, आता एक ठाकरे हवे आहेत! मुंबई महापालिका  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत फूट पाडणे ही भाजपची गरज होती, एक ठाकरेही सोबत असणे ही महागरज आहे. मुंबई-ठाकरे हे नाते त्यांना ठाऊक आहे. ठाकरेंशिवाय मुंबईचे राजकारण पुढे जाणार नाही, ही बाळासाहेबांनी निर्माण करून ठेवलेली पुण्याई आहे. भाजप तर दूरच राहिला, पण उद्धव आणि राज या दोन ठाकरेंनाही बाळासाहेबांच्या गारुडातून बाहेर पडता येणे शक्य नाही. ठाकरे  ब्रँड भाजपला लागेलच.  

प्रश्न एवढाच की भाजपच्या ऑफरवर राज काय प्रतिसाद देतील? एकनाथ शिंदे गटाचे मुंबईत तेवढे  प्राबल्य नाही, म्हणूनही कदाचित भाजपला राज लागतील. शिवाय राज हे गर्दी खेचणारे नेते आहेत, ते विरोधात राहणे भाजपला परवडणारे नाही. उगाच व्हिडिओ लावत बसले तर? राज चाणाक्ष आहेत; भाजपला असलेली आपली गरज हेरून ते अटी-शर्ती ठेवतील, त्या मान्य झाल्या तरच दोघांत तिसऱ्याची गोष्ट पुढे जाईल.  भाजपमध्ये वरखाली चर्चा करून निर्णय होतात; राज यांच्याकडे ती सिस्टिम नाही. ते स्वत:च निर्णय घेतात आणि स्वत:ला अन् इतरांना सांगतात. ठाकरे सेना सध्या कमकुवत झाली आहे, या परिस्थितीचा फायदा घेऊन ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येच पालिकेच्या निवडणुका घेण्याचाही एक विचार चालला आहे. ठाकरेंना सावरण्याची संधीच द्यायची नाही, असा गेमप्लॅन आहे. 

काँग्रेस सध्या आजारी आहे; त्याचाही फायदा मिळेल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोमवारी मुंबईत येताहेत. भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मुंबई महापालिका जिंकण्याचा कानमंत्र ते नक्कीच देतील. दुसरा कोणता पक्षच शिल्लक ठेवायचा नाही, या धोरणावर टीका होतेय; पण भाजपकडून शिकण्यासारखे खूप आहे. पक्ष-सरकार आणि संघ परिवारात समन्वयक म्हणून विश्वास पाठक यांना नेमले. महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाला ‘आपल्या’ माणसांना सांभाळून घेण्यासाठी असे पद निर्माण करावेसे वाटले नव्हते. भाजपमध्ये नेते, पदाधिकारी, मंत्री सगळ्यांना कामाचा हिशेब रोजच्या रोज द्यावा लागतो. रोजंदारीवर काम चालते. काम दाखवा तरच पुढचे काम मिळेल, असा हा फॉर्म्युला आहे. काँग्रेस म्हणजे संथ वाहते कृष्णामाई.. ती स्वत:ला बुडवायला निघाली आहे. तीरावरल्या सुखदु:खाची तिला जाणीव नाही. वरची निवडणूक झाली की नाना पटोले हटाव मोहिमेला वेग येईल. त्यासाठीच्या गुप्त बैठका सुरू झाल्या आहेत.

जाता जाता 
उद्योग खात्यात गिरीश पवार या सत्ताबाह्य सत्ताकेंद्राची जोरदार चलती आहे. साडेसात वर्षांपासून त्यांचाच बोलबाला आहे. ते बोले, मंत्री हाले म्हणतात. एमआयडीसीमध्ये प्रादेशिक अधिकारी असलेले उपजिल्हाधिकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी असलेले अतिरिक्त जिल्हाधिकारी मोठ्या प्रमाणात बदलण्याच्या आणि त्यासाठीच्या अर्थपूर्ण हालचालींची सध्या जोरदार चर्चा आहे.

Web Title: BJP got a Shiv Sena now they want a Thackeray here is full plan of bjp for elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.