शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भावी शिक्षकांच्या परीक्षेत सरकार नापास?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2018 19:18 IST

“जीवनात सर्व काही असेल, पण जर आत्मविश्वास नसेल, तर तुम्ही काहीच करू शकणार नाहीत. मेहनतीत प्रामाणिकपणा असला पाहिजे!”काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममधून देशभरातली विद्यार्थ्यांशी संवाद साधला...

ठळक मुद्देनाशिकमधील येवल्याचा सचिन मोठ्या अपेक्षेने २०१४मध्ये डी.एड. झाला. 

-     तुळशीदास भोईटे

जीवनात सर्व काही असेल, पण जर आत्मविश्वास नसेल, तर तुम्ही काहीच करू शकणार नाहीत. मेहनतीत प्रामाणिकपणा असला पाहिजे!”काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममधून देशभरातली विद्यार्थ्यांशी संवाद साधला... तेव्हाचे त्यांचे हे विचार. त्यांची विद्यार्थ्यांशी सुरू असलेली परीक्षेवरील चर्चा संपली आणि ट्विटरवरील एका मित्राचा कॉल आला. मोदीजी म्हणतात आत्मविश्वास नसेल तर काहीच करू शकत नाही. सर, इथं सरकारच आम्हा बी.एड., डी.एड. झालेल्या तरुणांचा आत्मविश्वास संपवतेय, त्याचं काय? कुणीच लक्ष देत नाही हो...

 त्याचं बोलणं अस्वस्थ करणारं. कारण गेले काही दिवस समाजमाध्यमांमध्ये राज्यभरातील बी.एड., डी.एड.धारकांचा असंतोष उफाळलाय.#शिक्षकभरती या हॅशटॅगने या तरुणांनी ट्विटरवर एक प्रकारे आंदोलन उभारले.  जिल्ह्याजिल्ह्यात मोर्चे काढले. गेला आठवडाभर ते मुंबईच्या आझाद मैदानात साखळी उपोषण करत आहेत. मात्र अधिवेशन सुरू असूनही आजवर कुणीही त्यांची दखल घेतलेली नाही. काही नेते भेटून गेले. पण पुढे त्यांनी विधिमंडळात तरुणाईच्या असंतोषाला वाचा फोडल्याचं दिसलं नाही.

 शनिवारी सकाळी पुन्हा त्यांच्यापैकी काहींचे कॉल आले. कुणीतरी दखल घ्या. आता पोलीसही निघून जायला सांगत आहेत. आम्ही काही जण रोज मैदानात बसतोय. तेथूनही हुसकावलं तर जायचं कुठे? काहीच पदरात न पाडता गावी जायचं तरी कसं? घरच्यांना काय सांगायचं?

 ज्यांचा कॉल होता ते तुकाराम गिरी हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील वाघी गावचे. २०१२मध्ये बी.एड. केले. त्यासाठी औरंगाबादच्या वैजापूरमध्ये प्रवेश मिळाला तेथे गेले होते. त्यानंतर तीन पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाले. पहिली ते पाचवीसाठी TET, सहावी ते आठवीसाठीची TETआणि केंद्राची CTET परीक्षांचे पात्रता निकष यशस्वीरीत्या पूर्ण केले. मात्र आजवर कुठेही संधी मिळालेली नाही.

घरची परिस्थिती बेताची. घरी अडीच एकर शेती. कोरडवाहू. एकुलता एक मुलगा.

शिक्षणासाठी अर्धा एकर शेती गमवावी लागली. तुकाराम स्वत: कॉल सेंटरला काम करून शिकले. संधी मिळत नाही. शेतीचा एक तुकडाही गेला. मिळवले काय हा त्यांचा प्रश्न...आत्मविश्वासाचं महत्व सांगणाऱ्या पंतप्रधानांच्या सत्ताकाळात अधिकच खुपणारा.

 सचिन नामदेव सरकटे मातंग समाजातील तरुण. भूमिहीन कुटुंबातील. आई वडील मोलमजुरी करतात. संताजी महाराज पतपेढीतून कर्ज काढून शिक्षण घेतले. आता कर्जाची रक्कम एक लाख सत्तर हजारावर पोहचली.

नाशिकमधील येवल्याचा सचिन मोठ्या अपेक्षेने २०१४मध्ये डी.एड. झाला. CTET पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाला. तसेच शिक्षक भरती अभियोग्यता चाचणीतही पात्रता सिद्ध केली. मात्र आजवर नोकरी नाही. मध्ये एका खाजगी शाळेत उपकार केल्यासारखी नोकरी मिळाली. मात्र महिना तीन हजार रुपयात कसं भागवायचं? सचिनने आजही पंतप्रधान सांगतात तो आत्मविश्वास हरवलेला नाही. मात्र किमान आपलं शिक्षण कर्ज सरकारने माफ करावं, तसंच शिक्षक भरती लवकर करावी, यासाठी तो आझाद मैदानात ठिय्या देऊन बसलाय. त्याची एक तक्रार गंभीरतेने घेतली जावी, पात्रता परीक्षेचे निकाल सरकार दडवतंय. तसं खरंच होत असेल तर त्यापेक्षा मोठा गुन्हा कोणता असू शकत नाही.

 जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील रामसगावचा विवेक धांडे. सध्या पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करतोय ते आत्मविश्वास न गमावता लढून जगत असल्याने. मात्र, २०१२मध्ये डी.एड. आणि तीन परीक्षांमध्ये आपली योग्यता सिद्ध केल्यानंतरही आपल्याला संधी का नाही?” या प्रश्नाचे उत्तर मात्र तो मिळवू शकत नाहीए.

 सरकारी दिरंगाई तरुण पिढीच्या आत्मविश्वासाला कशी करपवते ते नगरच्या अकोले तालुक्यातील कळसगावच्या पूनम गवांदेशी बोललं की कळतं. २००९मध्ये पूनम डी.एड. झाली. त्यानंतर बीएससीही केले. पात्रता परीक्षांच्या आव्हानांमध्येही गुणवत्ता सिद्ध केली. मात्र शेतकरी कुटुंबातील पूनमसाठी शिक्षक बनण्याचे प्रयत्न नापिकीचेच ठरलेत. हे तेवढ्यावरच थांबलं नाही. तिच्या वडिलांनी तिच्या उच्च शिक्षणासाठी शिक्षणकर्जासाठी प्रयत्न केले. मात्र गावातल्या बँकेनं निराशाच केली. कर्जच दिलं नाही. नीरव मोदीला तेरा हजार कोटींची खिरापत देणाऱ्या बँका पूनमसारख्या गुणवंतांना मात्र काही हजारांच्या कर्जासाठी नालायक समजतात!

पूनमनं तरीही आत्मविश्वास गमावलेला नाही. ती जिद्दीनं लढतेय. तब्येत बरी नसल्याने आझाद मैदानात पोहोचू न शकलेली पूनम समाजमाध्यमांमध्ये खिंड लढवतेय. माझ्याशी बोलताना ती म्हणाली, “तुम्ही ऐकताय. मात्र इतर अनेक जण दखलही घेत नाहीत. सरकारही ऐकायला तयार नाही. मुलं कष्ट करतात, मात्र जे १५-१६ लाख रुपये देऊ शकतात तेच नोकऱ्या मिळवतात.  अभियोग्यतेच्या आधारे भरती व्हावी, एवढी अपेक्षा व्यक्त करणाऱ्या पूनमने स्पष्ट शब्दात बजावले, सरकार म्हणते पवित्र पोर्टलवर निकाल उपलब्ध करणार. मात्र प्रत्येकाला स्वत:चेच पाहता येतील. तसं नको. सर्वांचे निकाल देण्यात यावे. नाहीतर सेटिंग होईल.

पूनम व्यक्त करत असलेली भीती अगदीच अनाठायी म्हणता येत नाही. सध्या भावी शिक्षक सर्वात जास्त शोषणाचे बळी ठरत आहेत. त्यांच्या मागण्याही काही अवास्तव नाहीत. योग्यच आहेत. जिल्हा परिषदांच्या शाळांमधील २४ हजार शिक्षकांच्या जागा रिकाम्या आहेत. सरकार त्या भरत नाहीए. त्या जर भरल्या गेल्या तर बेरोजगारीच्या आगीत होरपळणाऱ्या हजारो तरुणांना दिलासा मिळेल. किमान पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणालेत तो आत्मविश्वास कायम राहील. आत्मविश्वास कायम राहिला तर लढण्याचं बळ मिळेल. ते बळ कायम राहिलं तरच पंतप्रधानांच्या स्वप्नातील महासत्ता घडवण्यासाठी ही तरुणाई आपला वाटा उचलू शकेल. पण ज्यांच्याकडे सर्व अधिकार आहेत त्यांच्यापैकी काही जणांकडे या तरुणाईच्या गुणवत्तेला न्याय देण्याचा आत्मविश्वास नसावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आता स्वत: तरुणाईच्या या असंतोषाची दखल घ्यावी. रिकाम्या जागा भराव्या. गुणवत्तेला न्याय द्यावा. सनदशीर मार्गानं, शांतपणे सांगितलं जात असतानाच दखल घेतली जावी. रिकाम्या हातात कुणी भलत्या अजेंड्यांचे झेंडे देऊन तरुणाईला भलत्या मार्गावर भरकटवण्याआधीच त्यांना न्याय मिळावा. नाहीतर मग सर्व काही असेल, पण तरुणाईचा विश्वास मात्र कायमचा गमावलेला असेल! त्यातूनच सत्तेचाही आत्मविश्वास हरपू शकतो. किमान त्यासाठी तरी वेळीच दखल घेणं आवश्यक. हवं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं तालकटोरा क्लासमधील लेक्चर ऐकावं! नापास होणं टळेल!!

टॅग्स :Teacherशिक्षक