शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लंच पे चर्चा’! राज ठाकरे आईसोबत पुन्हा मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंसोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम
2
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पुन्हा पत्रकार परिषद घेणार, महिला पत्रकारांना विशेष आमंत्रण
3
अफगाणिस्तान vs पाकिस्तान; थेट युद्धात कोणाचे सैन्य वरचढ ठरेल? जाणून घ्या...
4
Rajya Sabha Election: भाजपने मुस्लीम नेत्याला उतरवले निवडणुकीच्या रिंगणात, तीन नावाची घोषणा
5
हवाई हल्ल्यानंतर तालिबानचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, १५ सैनिक ठार; अनेक प्रांतांमध्ये गोळीबार
6
IND vs WI : कुलदीपचा 'पंजा'! टीम इंडियानं पाहुण्या वेस्ट इंडिजला दिला फॉलोऑन
7
“ऑपरेशन ब्ल्यू स्टार चुकीच्या पद्धतीने राबवले, इंदिरा गांधींना किंमत मोजावी लागली”: चिदंबरम
8
स्कूल बस चालकाने टेम्पोची काच फोडत धमकी दिली; पुणे पोलिसांनी काही तासातच त्याच ठिकाणी गुडघ्यावर चालवले
9
मृत्यूनंतरही डिजिटल मालमत्तेची चिंता नाही! डिजिलॉकरमध्ये नॉमिनी कसा जोडायचा? जाणून घ्या सोपी प्रक्रिया
10
आधी मिठाई खायली दिली अन् नंतर ३ मुलांचा चिरला गळा; बायको माहेरी जाताच नवरा झाला हैवान
11
थिएटर मध्ये जाऊन "मनाचे श्लोक" चित्रपट बंद पाडणे उज्वला गौड यांना भोवले; गुन्हा दाखल
12
“वेळ पडल्यास लढायची तयारी, आम्ही घाबरत नाही”; १०० टक्के ट्रम्प टॅरिफवर चीनचे चोख प्रत्युत्तर
13
कॅनरा बँकेच्या FD मध्ये २ लाख रुपये गुंतवा; ३ वर्षांत मिळवा ४५ हजार रुपयांचे निश्चित व्याज!
14
कमालच झाली राव! WhatsApp वर खाच फीचर; प्रोफाइलवर क्लिक करताच सुरू होणार Facebook
15
कबुतरांमुळे महायुतीचे सरकार पडेल, जैन मुनींच्या इशाऱ्यावर CM फडवीसांचे थेट भाष्य; म्हणाले...
16
जम्मू-कटरा एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात; काँग्रेस नेत्याच्या मुलासह ४ जणांचा मृत्यू
17
IND vs AUS Women’s World Cup 2025 Live Streaming : टीम इंडियासमोर तगडे आव्हान; इथं पाहा दोन्ही संघातील रेकॉर्ड
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींची दिवाळी गोड, शुभ-लाभ; सौभाग्य-संपन्नता, ३ राशींनी ‘हे’ टाळाच
19
₹५,००० वाचवा, लखपती व्हा! 'या' सरकारी योजनेत दरमहा गुंतवणूक करुन जमा होईल २७ लाखांचा निधी
20
अतूट नातं! मृत्यूशी झुंज देणाऱ्या नवऱ्याचा वाचवला जीव, बायकोने दिली किडनी, म्हणाली...

बासित म्हणतात ‘संवाद’... पण ?

By admin | Updated: June 7, 2016 07:43 IST

भारत आणि पाकिस्तान यांच्यात सलोख्याचे संबंध असणे या दोन्ही देशांएवढेच त्यांच्या भावी पिढ्यांच्या सुखी व शांततामय जीवनासाठी आवश्यक आहे

‘भारत आणि पाकिस्तान यांच्यात सलोख्याचे संबंध असणे या दोन्ही देशांएवढेच त्यांच्या भावी पिढ्यांच्या सुखी व शांततामय जीवनासाठी आवश्यक आहे.’ पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त डॉ. अब्दुल बासित यांनी व्यक्त केलेल्या या मताशी या दोन्ही देशांतील लोक सहमत होतील. अशा सलोख्यासाठी त्यांच्यात संवाद सुरू राहाणे गरजेचे आहे व प्रश्न कायम राहिले तरी तो जारी असणेही महत्त्वाचे आहे. मात्र बासित यांचे हे मत ‘हा संवाद खंडित करणारे कोण?’ या प्रश्नामुळे वादाचा विषय होणारे आहे. ‘लोकमत’ वृत्तपत्राने सुरू केलेल्या ज्ञानपीठ या नव्या व्यासपीठावरून बोलत असताना व उपस्थितांच्या प्रश्नांची उत्तरे देताना डॉ. बासित कमालीचे मोकळे, स्पष्ट, परखड आणि संवादीही होते. भारत व पाकिस्तान यांच्यात काश्मीरसह अनेक प्रश्न आहेत. त्यात आता वाढत असलेल्या धार्मिक असहिष्णुतेच्या प्रश्नाची भर पडली आहे. कोणताही प्रश्न नुसता राजकीय न राहता धार्मिक होत जाणे हा प्रकार दोन्ही देशांसाठी घातक ठरणारा व त्यांच्यातील शांततामय जीवनाला अस्थिर करणारा आहे हे सांगत असतानाच बासित यांनी त्यांच्या देशासमोरील अडचणींचाही यावेळी ऊहापोह केला. भारताशी सलोख्याचे संबंध राहू नयेत असा विचार करणारे अनेक प्रवाह पाकिस्तानात आहेत आणि ते शक्तिशाली आहेत हे सांगून त्यांच्यावर बंधने आणून व त्यांना दबावाखाली राखून पाकिस्तान सरकार सध्याच्या संवादासाठी घेत असलेला पुढाकार महत्त्वाचा आहे व त्याचे भारतात स्वागत व्हावे असे ते म्हणाले आहेत. पाकिस्तानसमोर असलेला सध्याचा मोठा व तातडीचा प्रश्न अफगाणिस्तान हा आहे हे सांगताना त्या देशातील तीस लक्ष निर्वासीत पाकिस्तानात आले असून त्यांना सुरक्षित व सुस्थितीत ठेवण्याचे आव्हान मोठे आहे असे ते म्हणाले. अफगाणिस्तानात सुरू असलेला तालिबानी अतिरेक्यांचा हैदोस व हिंसाचार जोवर थांबत नाही तोवर ही समस्या गंभीरच होत जाणार आहे आणि तिला जगाचे सहाय्यही लागणार आहे. पाकिस्तानचे लष्कर या अतिरेक्यांशी आपल्या परीने लढत असले तरी ही समस्या दिवसेंदिवस जटील होत जाणारी आहे. साऱ्या मध्य आशियाएवढीच ती दक्षिण आशियातही पसरण्याचा धोका मोठा आहे असे सांगताना ‘धार्मिक कट्टरवाद रोखणे हे राजकारणासमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे’ असेही ते म्हणाले. पाकिस्तानच्या निर्मितीनंतर ते राष्ट्र स्वत:च्या पायावर उभे राहू शकणार नाही अशी जी भाकिते काही शहाण्यांनी तेव्हा वर्तविली ती आम्ही कधीच खोटी ठरविली आहेत, असे सांगून बासित म्हणाले, ‘आम्ही जलसाधनांबाबत स्वयंपूर्ण आहोत. आमची शेती समृद्ध आहे. १९७० च्या दशकात राष्ट्रीय संपत्तीच्या वाढीचा आमचा वेग भारत आणि चीनहून मोठा होता. शिवाय आम्ही अण्वस्त्रधारी आहोत आणि आमची क्षेपणास्त्रेही अतिशय शक्तीशाली आहेत. सोने, तांबे व अन्य खनिजांबाबतही आमचा देश समृद्ध आहे.’ बासित यांचे हे म्हणणे खरे असले व त्यांनी सांगितलेली दोन देशांमधील संवादाची निकड महत्त्वाची असली तरी काही प्रश्नांची उत्तरे जोवर त्यांच्या देशाकडून येत नाहीत तोवर या संवादात खंड पडत राहील हे उघड आहे. मुंबई शहरावर पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी केलेला हल्ला, पठाणकोटवरचे त्यांचे आक्रमण, भारताच्या संसदेवर पाकिस्तान्यांनी केलेला हल्ला हे प्रश्न अजून अनुत्तरित आहेत. काश्मीरचा तिढा साठ वर्षांनंतरही जेथल्या तेथे आहे. या प्रश्नावर दोन देशांत दोन अघोषित व एक घोषित युद्धही झाले आहे. ताश्कंद व सिमला येथील वाटाघाटीही निष्फळ ठरल्या आहेत. नेहरूंपासून वाजपेयींपर्यंतच्या भारतीय पंतप्रधानांनी या दिशेने केलेल्या सर्व प्रयत्नांना पाकिस्तानने अनुकूल प्रतिसाद दिल्याचे कधी दिसले नाही. शिवाय सीमेवरच्या हाणामाऱ्या तशाच आहेत आणि सुरक्षा समिती व संयुक्त राष्ट्र संघातील वादही कायम आहेत. दाऊद इब्राहीम या आंतरराष्ट्रीय गुंडाबाबतची पाकिस्तानची लपवाछपवीही भारतीय नागरिकांचा संताप वाढविणारी आहे. पाकिस्तानचे अणुशास्त्रज्ञ व त्याच्या अणुबॉम्बचे निर्माते डॉ.ए.क्यू. खान यांची ‘पाच मिनिटांच्या आत दिल्ली बेचिराख करण्याची’ ताजी दर्पोक्तीही नोंदविण्याजोगी आहे. एवढे सारे काटेरी प्रश्न दरम्यान असताना दोन देशांतील संवाद यशस्वी कसा होईल या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर बासित यांनी दिले नाही. मात्र संवादावाचून प्रगती नाही हे त्यांचे सूत्रही अमान्य करता येणारे नाही. काश्मीर व राजकीय तेढीचे इतर प्रश्न बाजूला सारूनही या संदर्भात काही बाबी दोन्ही देशांना करता येणे जमणारे आहे. व्यापारी संबंधात वाढ, आरोग्यसेवांमधील सहकार्य, दोन्ही देशांदरम्यान प्रवासाची सुलभ सोय आणि भारतीय व पाकिस्तानी जनतेतला परस्पर सुसंवाद या सारख्या गोष्टी सुरू राहिल्याने दोन देशातील आताचे तेढीचे वातावरण निवळू शकणारे आहे. तसे झाल्यास दोन्ही देश व त्यांचे नेतृत्व आपसातील तेढीच्या प्रश्नांनाही सहजपणे सामोरे जाऊ शकणार आहे. जनतेत विश्वासाचे वातावरण जोवर तयार होत नाही तोवर राजकीय नेतृत्वही संवादाबाबत पुढाकार सहजपणे घेऊ शकत नाही हे उघड आहे. तो तत्काळ सुरू व्हावा या डॉ. बासित यांच्या आग्रहाचे स्वागत करताना उपरोक्त अपेक्षा व्यक्त करणे निश्चितच अस्थानी ठरणारे नाही.