- गजानन दिवाणघरात शॉवर की तोटी यावरून श्रीमंती ठरते आमची. जे जगण्याचे तेच पिकांचेही. पिण्याच्या पाण्याचे वांधे असताना ऊस घेतो आम्ही. बाप्पा, आता तरी ही उधळपट्टी रोखण्याची सुबुद्धी दे...घशाला कोरड पडली, की आम्हाला थेंबभर पाण्याची किंमत कळते. नाही तर दररोज घरी आणि दारीही पाण्याचे पाट वाहत असतात. त्याचे काहीच वाटत नाही आम्हाला. एकही पैसा न मोजता पाईपलाईन फोडून पाणी वापरणारे आणि भरपूर पैसे मोजून पाणी घेणारे दोघेही सारखेच. एकाला पैसेच द्यायचे नसतात, तर दुसरा भरपूर पैसे मोजून हे पाणी उडवत असतो. पाणीटंचाईला दोघेही तेवढेच जबाबदार.औरंगाबादला तीन दिवसाआड पाणी मिळते. लातूरकरांना २० दिवसानंतरही पाणी मिळेलच याची शाश्वती नाही. जालनेकरांना १० ते १२ दिवसाआड ते दिले जाते. मराठवाड्यातील प्रत्येक शहरात कमी-अधिक प्रमाणात हेच चित्र आहे. चार वर्षांपासून दुष्काळ आमची पाठ सोडत नाही. यंदा तर कळस गाठला त्याने. खरीप गेला. प्यायला आणि जनावरांना पाणी मिळते की नाही असे वाटत असताना परतीचा पाऊस पावला. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात जोरदार बरसत आहे तो. आता पिण्याच्या पाण्याची तहान भागेल, असे वाटते; पण नुसते पाणी पिऊन जगायचे काय?जोपर्यंत मानव जल आणि भूमीच्या नैसर्गिक निवड सिद्धांतास अनुकूल भूमिका घेऊन स्वत:चा विकास साधू इच्छितो, तोपर्यंत त्याला या उभयतांचा फारसा विरोध होत नाही; परंतु प्रतिकूल भूमिका घेऊन, म्हणजेच निसर्गावर विजय मिळविण्याची भूमिका घेऊन जेव्हा तो या उभयतांचा अतिरिक्त वापर करतो, तेव्हा त्याला त्यांचा विरोध सुरू होतो. कालांतराने नैसर्गिक चक्रात बिघाड होऊन त्याच्या भवितव्यातील अस्तित्वाबद्दल शंका निर्माण होऊ शकते (बलदवा बाळकृष्ण : प्राच्यसिद्धांत). सध्या आपण याच परिस्थितीतून जात आहोत. नैसर्गिक जीवनशैली कधीच मागे टाकली आहे आम्ही. घरात शॉवर की तोटी यावरून श्रीमंती ठरते आमची. पाणी जास्त उडवतो तोच श्रीमंत.जे जगण्याचे तेच पिकांचेही. ज्याच्या शेतात ऊस तोच श्रीमंत. पिण्याच्या पाण्याचे वांधे असताना ऊस घेतो आम्ही. मराठवाड्यातील एकूण जमिनीपैकी ९.४ टक्के शेतीत ऊस घेतला जातो. त्यावर वर्षभरात साधारण ४,३२२.४ दशलक्ष घनमीटर पाणी उडवतो. मराठवाड्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या जायकवाडीतील जिवंत पाणीसाठा दोन हजार १७१ दशलक्ष घनमीटर इतका आहे. यावरून एकट्या उसावर किती पाणी उधळतो हे लक्षात यावे. शेतीला वापरल्या जाणाऱ्या एकूण पाण्यापैकी ७१.४ टक्के पाणी एकट्या उसाला लागते. केवळ ९.४ टक्के पाणीच कडधान्याला देतो आम्ही. एक हेक्टरवर ऊस लावल्यास तो २५ हेक्टरवरील तूर किंवा त्यापेक्षा जास्त क्षेत्रावरील भुईमुगाच्या पिकाचे पाणी पितो. २१.६ लाख हेक्टरवर तुरीचे पीक घेण्यासाठी २१६१.२ दशलक्ष घनमीटर पाणी लागते. एवढे पाणी सध्या आम्ही केवळ १.१५ लाख हेक्टर उसाच्या पिकावर उधळतो. पाण्याची ही उधळपट्टी अशीच सुरू राहिल्यास कोणीही वाचवू शकणार नाही आम्हाला. दुष्काळ आम्हाला नवा नाही. तरीही काहीच शिकलो नाही आम्ही. घरात पैसे असले की दिवाळी-दसरा, नाही तर शिमगा अशातला हा प्रकार. अन्नदाता असूनही किती दिवस लोकांसमोर हात पसरणार आम्ही?हे लिहीत असतानाच औरंगाबादेतील एका गणेश मंडळाचे दोन कार्यकर्ते कार्यालयात धडकले. ‘उद्या बाप्पाचे आगमन होत आहे; पण यंदा गणपती बसविणार नाही आम्ही. वर्गणीही जमा करणार नाही. केवळ एक दानपेटी ठेवू. अशी दानपेटी शहरातील प्रत्येक मंडळासमोर ठेवली जाईल. प्रत्येकाने एक रुपया टाकावा, असे आवाहन केले जाईल. दहा दिवसानंतर शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत या सर्व दानपेट्या उघडल्या जातील. जमलेले पैसे दुष्काळग्रस्तांसाठी दिले जातील...’ पंचविशीतील तरुणांचा हा संकल्प प्रत्यक्षात येईल तेव्हा येईल, पण गणेश मंडळावर होणारा खर्च थांबवून अडचणीतील शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावे असे त्यांना वाटणे, हा मोठा बदल नाही का? बाप्पा, असा सकारात्मक बदल आमच्यातही होऊ दे. दुष्काळावर कायमची मात करण्यासाठी घरादारात आणि शेतीत पडणाऱ्या पावसाच्या प्रत्येक थेंबाचे नियोजन आमच्या हातूनही होऊ दे.