प्रेम?- नाही!.. लिव्ह इन?- नकोच!.. सेक्स?- बापरे!

By Aparna.velankar | Published: November 22, 2022 08:55 AM2022-11-22T08:55:01+5:302022-11-22T09:00:12+5:30

घरच्या आधाराला मुकलेली, चुकलेली मुले एकट्याने लढाई लढत राहणार. हरली तर मरणार; घरी परतायला त्यांना तोंड नसणार. आपल्याला हे हवे आहे?

Articles on Bad Effects of Love and Live in Culture | प्रेम?- नाही!.. लिव्ह इन?- नकोच!.. सेक्स?- बापरे!

प्रेम?- नाही!.. लिव्ह इन?- नकोच!.. सेक्स?- बापरे!

googlenewsNext

अपर्णा वेलणकर, कार्यकारी संपादक, लोकमत

आफताब आणि श्रद्धा या दोघांच्या निमित्ताने तरुण जोडप्यांच्या प्रेमसंबंधांचे (आणखी एक) भीषण रूप देशासमोर आले. “मी पंचवीस वर्षांची आहे, आता माझे निर्णय मला घेऊ द्या,” म्हणून आईवडिलांच्या मर्जीविरुद्ध घर सोडून जाणारी मुलगी, या हिंदू मुलीचा प्रियकर मुस्लीम असणे आणि तिने त्याच्यासोबत लग्न न करता उजळ माथ्याने लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणे इतका तपशील देशातल्या सध्याच्या वातावरणात  ‘लव्ह जिहाद’ची आग पेटवायला पुरेसा; पण सुदैवाने (अजून तरी) तसे काही झालेले नाही. थंड काळजाने आफताबने केलेला श्रद्धाचा खून आणि काही महिने फ्रीजमध्ये भरून ठेवलेले तिच्या शरीराचे तुकडे, रोज दोन-तीन असे जंगलात भिरकावण्यासाठी त्याचे रात्री-बेरात्री घराबाहेर पडणे या आरोपांची सिद्धता करण्यासाठी सध्या दिल्ली पोलीस पुराव्यांच्या शोधात आहेत; आणि रोज उघड होणारे तपशील सांगतात ती एका भरकटलेल्या तरुण नात्याची कहाणी कोणाही क्राइम-थ्रीलर वेब सिरीजला लाजवेल इतकी भीषण आहे.

यानिमित्ताने मध्यमवर्गीय भारताच्या घराघरांमध्ये सध्या काय चाललेले असू शकते, त्याचे काही तुकडे समोर आले आहेत. ज्याचे मन जागे आहे, डोके शाबूत आहे आणि विचार खुले आहेत अशा प्रत्येकाला या तुकड्यांच्या धारदार कडा टोचत असतील. खुल्या स्वातंत्र्याची हाक घालणारे बाहेरले जग आणि आर्थिक-सामाजिक पत बदलत गेली तरी अजूनही जुन्या नियमांनी बांधलेले बोचके असावे तसे घरातले वातावरण यात घुसमटलेली तरुण मुले... तरुण मुला-मुलींच्या  ‘व्यक्तिस्वातंत्र्या’च्या कल्पनांना आलेली धार आणि घराबाहेर पडायची घाई झालेले त्यांचे पाऊल रोखून धरण्यासाठी चाललेला आईवडिलांचा केविलवाणा संघर्ष... लैंगिक अनुभव घेण्याच्या विपुल संधी उपलब्ध असलेल्या वातावरणात वाढणारी मुले आणि मुलांच्या निकोप वाढीसाठी गरजेचा झालेला अवकाश त्यांना मिळू देण्याऐवजी शरीर-शुद्धतेच्या जुन्या संदर्भांना चिकटून राहणारे, जुन्या चौकटी मोडण्याचे धैर्य नसलेले आणि त्या हट्टापायी आपल्या मुलामुलींशी असलेले संबंध तोडेपर्यंतचे टोक गाठणारे आईबाप... असे काहीतरी विचित्र मिश्रण सध्या आपल्या घराघरांमध्ये उकळू लागलेले आहे.

नवस्वातंत्र्याची आस लागलेल्या मुलामुलींना आईवडील सांगतात ते सगळेच जुनाट, टाकाऊ वाटते.  हातातल्या स्क्रीनवर दिसणाऱ्या स्वप्निल जगाचे आकर्षण इतके जबरदस्त, की या  प्रयोगशीलतेच्या हट्टापायी कुठे थांबावे हे मुलांना उमगत नाही... आणि पूर्वी होतो तिथेच थांबण्याचा हट्ट न धरता  मुलांच्या बरोबरीने चार जास्तीची पावले चालण्याची वेळ आली आहे हे पालकांना समजत नाही.
परिणाम? 

दारे बंद. मनाची आणि घराचीही! 
वाट चुकलेली मुले आत्महत्या करतात, गळे चिरले जाईतो चुकल्या निर्णयांचे परिणाम भोगतात; पण आपण मागे परतलो तर घराची दारे आपल्यासाठी उघडी असतील, असा दिलासा त्यांना वाटत नाही... आणि घर सोडून आकाशात उंच उडायला गेलेल्या मुलांच्या आठवणीने  अखंड झुरणारे आईबाप आपला सामाजिक-नैतिक हट्ट सोडून दार जराही किलकिले करायची तयारी दाखवत नाहीत... आपले हे समाज-चित्र  काय सांगते? 

पुढची ओढ लागलेल्यांना वेळ पडलीच तर वेळीच पाऊल मागे घेऊन रस्ता बदलण्याचे शिक्षण/ समज/ सामर्थ्य  आपल्या व्यवस्थेत दिले जात नाही. आणि मागेच राहण्याचा हट्ट धरून बसलेल्यांना पुढच्यांशी जमवून घेण्याची अपरिहार्यता, त्यासाठीची कौशल्ये शिकण्याची संधी-शिकवण्याची व्यवस्थाही आपल्याकडे तयार झालेली नाही.

- म्हणून तर जीव गमावून बसलेल्या श्रद्धाने  ‘लिव्ह इन’मध्ये राहण्याचा  ‘मूर्खपणा’ केलाच कशाला, असे युक्तिवाद होतात; आणि  ‘अशा’ घटना म्हणजे  संस्कृती मोडून भलतेच काहीतरी करू धजणाऱ्या (बेताल, बेलगाम) तरुण-तरुणींना एक धडाच आहे, असेही बजावणारे लोक दिसतात.  बदलाचे कष्ट सहन न होणाऱ्या आपल्या बौद्धिक आळसाचे हे शेलके लक्षण आहे.

महाविद्यालयीन  उंबरठ्यावरच शरीर-संगाचा अनुभव घेण्याची घाई आणि कोवळ्या वयातल्या गर्भपातांची संख्या वाढते आहे. सेक्स हा शब्दही खुलेपणाने उच्चारलेला ज्या घराने कधी ऐकलेला नाही अशा घरातल्या मुलामुलींना प्रत्यक्ष अनुभवाची ओढ आणि संधीही आहे. अवेळी घेतलेल्या छुप्या लैंगिक अनुभवांचे हे आंधळे गारुड अनेकदा अख्खे आयुष्य भलत्याच दिशेला फरफटत नेते. 

या कठीण, नाजूक काळात मुलामुलींशी ना पालकांचा संवाद असतो ना शाळा-महाविद्यालयांचा. समाज म्हणूनही आपण अजूनही अळीमिळीगुपचिळीच्या खेळातच रमलेलो आहोत. पुढे प्रौढ आयुष्यातही स्त्री-पुरुष सहजीवनाच्या (रूढ लग्नाखेरीज) वेगवेगळ्या पद्धती आणि प्रयोग यांचे आकर्षण तरुण पिढीमध्ये रुजलेले आहे. लिव्ह-इन हा त्यातला सध्याचा सर्वाधिक आकर्षक  प्रकार! लग्नाआधी दोन-तीन वेगवेगळ्या लीव्ह-इन रिलेशनशिप्स जोडून, अपेक्षाभंग झाल्यास अशी नाती मोडून ‘मनाजोगा’ जोडीदार शोधण्याचा खुला प्रयोग करणारे फिल्म स्टार्स आजवरच्या छुप्या बदलांना उघड चेहरे देऊ लागले 
आहेत. 

आता सामान्य घरातली मुले-मुलीही या वळण-वाटांनी जाणार. प्रेम?- नाही!.. लिव्ह इन?- नकोच!.. सेक्स?- बापरे! - अशा नकारघंटा वाजवत राहणारे पालक अधिकाधिक केविलवाणे होत राहणार आणि त्यापायी घरच्या सुरक्षित आधाराला मुकलेली  मुले एकेकट्याने आपली लढाई लढत राहणार. हरली तर मरणार; पण घरी परतायला त्यांच्यापाशी तोंड नसणार.

आपल्याला खरेच हे असे चित्र हवे आहे का? 
‘मी माझ्या मुलीला आणि मुलालाही सांगितले आहे, तुझ्या मनाप्रमाणे आयुष्य जग, जबाबदारीने निर्णय घे. पण, चुकशील तेव्हा आधी मला सांग; आणि हरशील तेव्हा आधी घरी परत ये!’- असे सांगणारे मोकळे घर आपण आपल्या मुलांना देऊ शकू का?... आणि  ‘त्यांना हवे ते निर्णय’ घेताना वापरता येईल असे थोडे (जास्तीचे) सैलसर शहाणपण?

aparna.velankar@lokmat.com

Web Title: Articles on Bad Effects of Love and Live in Culture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.