शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
2
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
3
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
4
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
5
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
6
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
7
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
8
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
9
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
10
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
11
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
12
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
13
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
14
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
15
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
16
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
17
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
18
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
19
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
20
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

अन्वयार्थ: लाखो लेकींचे जीवन उजळणाऱ्या 'सावित्रीमाईं'ची आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 07:32 IST

भारतात स्त्री शिक्षणाचा पाया घालणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा आज स्मृतिदिन. बदलत्या भारतातही समकालीन राहिलेल्या या सत्यशोधक स्त्रीचे हे कृतज्ञ स्मरण !

डॉ. रणधीर शिंदे मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

आधुनिक भारतातील आद्य स्त्री समाजसुधारक, पहिल्या शिक्षिका आणि स्त्रीमुक्ती चळवळीच्या आद्यप्रणेत्या म्हणून सावित्रीबाई फुले यांना आपण ओळखतो. महाराष्ट्राच्या समाजकार्य व स्त्री सुधारणा चळवळीत सावित्रीबाई फुले यांचे कार्य असाधारण ठरले. मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी केलेले कार्य मोलाचे होते. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाच्या पायाभरणी काळातील हा महत्त्वाचा आरंभटप्पा होता. त्यामुळे भारताच्या सामाजिक इतिहासात फुले दाम्पत्य व त्यांच्या कार्याला असाधारण महत्त्व आहे.

सावित्रीबाईनी आयुष्यभर जोतिबा फुले यांच्या कार्यात मोलाची साथ दिली. स्त्री शिक्षणाबरोबर, अस्पृश्य सुधारणा व बालहत्या प्रतिबंधक गृहातील कार्य असो की दुष्काळ व प्लेगमधील कार्य आणि सत्यशोधक चळवळीतला सहभाग; या सर्व पातळ्यांवर सावित्रीबाईनी केलेले कार्य महत्त्वाचे होते. सेवाभाव हा त्यांच्या कार्याचा विशेष होता. मानवसेवा हा त्यांच्या आयुष्यभरातील कार्याचा ध्यास होता.

धाडस, निर्भयता हे सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे विशेष होत. त्यावेळच्या परंपरावादी व्यवस्थेने त्यांच्या कामात असंख्य अडचणी आणल्या, त्याचा त्यांना त्रास झाला; परंतु त्या डगमगल्या नाहीत. एकोणिसाव्या शतकात स्त्रियांना कोणत्याही प्रकारचा सामाजिक अवकाश उपलब्ध नव्हता, अशा प्रतिकूल काळात त्यांनी केलेले काम हे धाडसाचे आणि मौलिक होते. त्यामुळे भारताच्या सामाजिक इतिहासात त्यांच्या कार्याच्या फलश्रुतीस वेगळे असे महत्त्व आहे. तसेच बहुजन समाजात समाजसुधारणेचे कार्य करणाऱ्या स्त्रियांच्या त्या प्रेरणा ठरल्या. महात्मा फुले यांच्या चळवळीत स्त्रियांचा सहभाग व स्त्रियांच्या मुक्तिदायी समाजकारणास महत्त्वाचे स्थान होते. महात्मा फुले यांच्या 'कुळंबीण' कवितेत नरनारीतत्त्वाचा व समतेचा श्रेष्ठ असा आविष्कार आहे. स्त्री-पुरुषांतील या समतेचा आग्रह सावित्रीबाई फुले यांच्या कार्यदृष्टीत होता.

फातिमा शेख, मुक्ता साळवे, ताराबाई शिंदे व जनाक्का शिंदे या एकोणिसाव्या शतकातील समाजसुधारणा करणाऱ्या स्त्रियांच्या कामात सावित्रीबाई फुले यांच्या कार्यदृष्टीचे अनुबंध आहेत. एका अर्थाने त्या बहुजन समाजातील स्त्री-जागरण पर्वाच्या आद्यसुधारक ठरतात.

सामाजिक विचार संवेदनांमुळे लेखिका म्हणून सावित्रीबाई फुले यांचे वाङ्मय महत्त्वाचे ठरते, ते त्यातील प्रागतिक दृष्टीमुळे. त्यांच्या लेखनदृष्टीवर महात्मा फुले यांच्या विचारदृष्टीचा प्रभाव असणे स्वाभाविक आहे. सावित्रीबाई फुले यांची कविता ही मानवजीवन व सृष्टीविषयीच्या आत्मीय शैलीतील सरस अशी मनोगत कविता आहे. त्यांच्या वाङ्मयाचा स्वर हा प्रबोधनाचा आणि मानवतावादाचा आहे. 'शिक्षणाने येते मनुष्यत्व पशुत्व हटते' अशी त्यात दृष्टी आहे. त्यात नव्या युगाचे स्वागत आहे. 'वीरांची रणदेवाई ताराबाई, माझी मर्दिनी' असे वीरनायिकेचे इतिहास स्मरण आहे. शेती व निसर्गाची आनंदगाणी सावित्रीबाईनी गायिली. त्यांच्या कवितेत ग्रामीण जीवनाची, शेतीशिवाराची व जन्मभूमीची लोभस अशी चित्रे आहेत. 'कितीक जातीजमाती, शिवारात या सुखे नांदती' हा भाव आहे. सावित्रीबाईच्या कवितेस 'फुलांची कविता' म्हणूनही वेगळे महत्त्व आहे. जाई जुई-मोगरा, कण्हेरी, चाफा, गुलाब आणि हळदफुलांची बहरती उत्सवरूपे त्यांच्या कवितेत आहेत. या कवितेचे नाते मानवसृष्टी आणि भूमीप्रेमाशी घट्ट जोडलेले आहे.

सावित्रीबाई नव्या पिढीच्या आयकॉन ठरल्या. स्त्रियांच्या आत्मविश्वास पर्वाच्या त्या अग्रदूत ठरल्या. 'जोती-सावित्री' या शब्दांना महाराष्ट्राच्या इतिहासात वेगळे असे महत्त्व प्राप्त झाले. सावित्रीबाई फुले यांच्यावर विपुल कथा-कादंबऱ्या लिहिल्या गेल्या. 'साऊ माझी माय' किंवा 'साऊ, पेटती मशाल' म्हणून त्या अनेकांच्या जीवनाच्या व लेखणीच्या प्रेरणासांगाती बनल्या. 'सावित्रीच्या आम्ही लेकी' असा सार्थ अभिमान बाळगणारी अभिमान परंपरा निर्माण झाली; परंतु आजही सावित्रीबाई फुले यांच्या स्वप्नसृष्टीतील वास्तव पूर्णत्वाला गेले असे म्हणता येत नाही. स्त्री-पुरुषसमतेचे चक्न अधुरेच आहे. स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना आजूबाजूस पाहायला, ऐकायला मिळतात. माध्यमांत केवळ परंपराशील स्त्री-प्रतिमेचेच गुणगान गायिले जाते. तर स्त्रियांना समानतेची वागणूक द्यायला समाज आजही खळखळ करतो. यासाठी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे प्रेरणास्मरण फार फार गरजेचे! 

rss_marathi@unishivaji.ac.in

टॅग्स :Savitri Bai Phuleसावित्रीबाई फुले