-संदीप प्रधान (वरिष्ठ सहायक संपादक, लोकमत, ठाणे)महापालिकांच्या निवडणुका कधी होतील हे कुणीच छातीठोकपणे सांगू शकत नाही; परंतु आता महायुती व महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये जे घमासान होईल ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकरिताच. ‘लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आम्ही हिंदू हिंदू करणार; पण महापालिका निवडणुकीत आम्ही मराठीमराठीच करणार,’ असे स्व. बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. हिंदू म्हणून आम्ही गुजराती, उत्तर भारतीय वगैरे साऱ्यांसोबत गळ्यात गळे घालून मुस्लिम समाजाच्या विरोधात आक्रमक होणार आणि मराठी अस्मितेची झूल चढवली की लगेच आम्हाला येथील रिक्षावाल्यांपासून भाजीवाल्यांपर्यंत सारे उत्तर भारतीय आहेत हे खटकणार किंवा दुकानदारांनी मराठी पाट्या लावलेल्या नाहीत. यामुळे आमची माथी भडकणार.
हे एकाच वेळी ‘हिंदू’ व ‘मराठी’ असणे हे चित्रपटातल्या ‘डबल रोल’सारखे आहे. बाळासाहेबांनी ही ‘डबल रोल’ची कसरत मोठ्या खुबीने साकारली. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची सूत्रे स्वीकारली तेव्हा आपल्याला हे झेपणार नाही, हे त्यांच्या लक्षात आले असावे. मुंबईतील मराठी माणसाचा टक्का कमी झालाय हे नेमके हेरून उद्धव यांनी ‘मी मुंबईकर’ अभियान हाती घेतले.
दीर्घकाळ मुंबईत वास्तव्य केलेल्या अमराठी लोकांना ‘मुंबईकर’ म्हणून सामावून घ्यायचे व संघर्ष टाळायचा ही भूमिका शिवसेनेसाठी दीर्घकालीन लाभाची होती; मात्र त्यावेळी पक्षात उद्धव-राज ठाकरे संघर्षात ‘मी मुंबईकर’च्या चिरफळ्या उडाल्या.
शिवसेना स्थापन झाली तेव्हा बहुतांश मराठी कुटुंबांतील आर्थिक, सामाजिक परिस्थिती सारखी होती. महाराष्ट्राची निर्मिती झाली; पण येथील नोकऱ्या मराठी माणसाला मिळत नाही, हाच कळीचा मुद्दा होता. शिवसेनेने तो उचलला. काँग्रेसमधील ज्या मराठी नेत्यांमध्ये ही मराठी अस्मिता ठायीठायी भरली होती त्यांनी शिवसेनेला वेळोवेळी बळ दिले. आता परिस्थिती बदलली आहे. आता मराठी माणूस एकसमान राहिलेला नाही.
‘अंथरूण पाहून पाय पसरा’ वगैरे अल्पसंतुष्टतेपासून तो खूप दूर गेला. शिक्षणाच्या बळावर तो मोठमोठी स्वप्ने पाहत आहे. ‘शिवाजी पार्कला माझ्या मुलाने दहा कोटींचा फ्लॅट घेतलाय. त्याच्या खिडकीतून राज ठाकरे यांचे शिवतीर्थ अगदी स्पष्ट दिसते,’ असे एकेकाळी शिवसेनेच्या संघर्षामुळे बँकेत नोकरी लागलेला व स्वकर्तृत्वावर जनरल मँनेजरपदावरून निवृत्त झालेला बाप अभिमानाने इतरांना सांगतो. या कुटुंबातील बाप व त्याचा मुलगा आर्थिक विचाराने ‘ग्लोबल’ झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मनावर गारूड केले आहे. मराठीच्या मुद्द्यावर राजकारण करणाऱ्यांची खरी गोची याच वर्गाने केली आहे.
शिवसेनेने संघर्ष केल्यामुळे ज्यांना लाभ झाला त्या कुटुंबांना आता उद्धव व राज यांचे आकर्षण राहिलेले नाही. धुणीभांडी करणाऱ्या बाईला किंवा रिक्षा चालवणाऱ्या मराठी पुरुषाला आपल्या मुलाने सीबीएसई शाळेत शिकावे व मोठे व्हावे, असे वाटते. आपल्या मराठी अस्मितेशी जोडलेल्या संकुचित आर्थिक विपन्नतेतून मला बाहेर पडायचे आहे, असे नॅरेटिव्ह लोकांच्या डोक्यात फिट्ट बसल्याने मराठी पाट्यांसारखे मुद्दे पूर्वीसारखे पेटत नाहीत.
बँक, एलआयसी वगैरेंत मराठी माणसाला नोकरी मिळावी, याकरिता स्थानीय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून शिवसेनेने संघर्ष केला. मराठी तरुण, तरुणींना नोकऱ्या मिळवून दिल्या. काहींनी कर्तृत्वाच्या बळावर वरपर्यंत मजल मारली; मात्र ज्या पक्षाच्या प्रयत्नांमुळे आपण येथवर पोहोचलो त्याच्या विचारांची अंमलबजावणी करण्याचा आग्रह या लोकांनी धरला नाही. तसे झाले असते तर बँकांमध्ये मराठी पाट्या लागाव्यात, याकरिता राज ठाकरे यांना आजही संघर्ष करावा लागला नसता.
सरकार आल्यावर आपली वैचारिक सत्ता प्रस्थापित करण्याचा शिवसेनेलाही विसर पडला. भाजपने त्यांचे सरकार येताच राम मंदिरापासून अनेक अस्मितेचे मुद्दे निकाली काढले. शिवसेनेनेही तेच करायला हवे होते.
राज यांनी बँकांमध्ये मराठी पाट्या लावण्याकरिता आंदोलन सुरू करताच उद्धव यांच्या पक्षाने मुंबईत वास्तव्य करणाऱ्या अमराठी लोकांना मराठी शिकवण्याचे वर्ग सुरू करण्याची घोषणा केली. आपला विचार लोकांच्या गळी उतरवण्यात यश कसे येईल?- ‘कानाखाली आवाज काढून’ की, ‘मराठी शिकवून’, ते काळ ठरवेल; पण मराठी भाषा अभिजात होऊनही तिच्या ललाटीचा राजकीय संघर्ष काही संपलेला नाही. (sandeep.pradhan@lokmat.com)