सध्या प्रचंड चर्चेत असलेली इस्रायलमधील ही घटना. डॉ. हदास लेवी आणि कॅप्टन नेतनेल सिल्बर्ग यांचं एकमेकांवर निरतिशय प्रेम. दोघांनाही लग्न करायचं होतं. पण, अचानक इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू झालं. नेतनेलला युद्धावर जावं लागलं, पण दुर्दैवानं या युद्धात गाझा येथे त्याचा मृत्यू झाला. या घटनेनं हदास प्रचंड हादरली, तिचा या वृत्तावर विश्वासच बसेना. आधी तिला वाटलं, ही बातमी कपोलकल्पित असेल, आपला प्रियकर लवकरच परत येईल आणि आपली पुन्हा भेट होईल, पण तिचा हा विश्वास खोटा ठरला. नेतनेल तिला कायमचं सोडून गेला होता.
पण ही कहाणी इथेच संपली नाही. त्यांची ही प्रेमकहाणी नेतनेलच्या मृत्यूनंतरही कायम राहिली. दोघांचं लग्न तर झालेलं नव्हतं, शिवाय नेतनेल यानं आपलं वीर्यदेखील कोणत्याही वीर्य बँकेत जमा केलेलं नव्हतं. तरीही हदासला आपल्या प्रियकराच्या मृत्यूनंतरही त्याच्यापासून मूल हवं होतं. मग सुरू झाला एक कायदेशीर लढा.. हदासनं तातडीनं येरुशलम फॅमिली कोर्टात याचिका दाखल केली की तिला आपला प्रियकर कॅप्टन नेतनेल सिल्बर्ग याची ‘कॉमन-लॉ पार्टनर’ मानलं जावं. तिची दुसरी मागणी होती नेतनेलचं वीर्य वापरण्याची परवानगी तिला दिली जावी. यासंदर्भात कोर्टानं बराच विचार केला, यासंदर्भातले सगळे कायदे तपासण्यात आले आणि कोर्टानं शेवटी तिच्या दोन्ही मागण्या मान्य केल्या.
यात मुख्य अडचण होती ती म्हणजे नेतनेलचा मृत्यू झालेला असताना त्याचं वीर्य आणायचं कोठून? हदासला कुठल्याही परिस्थितीत आपल्या मृत प्रियकरापासून मूल हवंच होतं. शेवटी तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेण्याचं ठरवण्यात आलं. त्यासाठी पोस्टमार्टेम (पॉस्थुमस) स्पर्म रिट्रीवल (PSR) या तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली. या तंत्रज्ञानात पुरुषाच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीरातून वीर्य बाहेर काढलं जातं. ही पद्धत खास करून त्याचवेळी वापरली जाते, जेव्हा मृत व्यक्तीच्या पत्नीला (किंवा पार्टनरला) भविष्यात मूल हवं असतं, पण जिवंत असताना त्यानं आपलं वीर्य बँकेत जमा केलेलं नसतं. हे तंत्रज्ञान आर्टिफिशियल रिप्राॅडक्टिव टेक्नाॅलॉजीचा (ART) भाग असून, ‘इन विट्रो फर्टिलायझेशन’ (IVF) सोबत त्याचा वापर केला जातो.
या प्रकारातील मुख्य मर्यादा म्हणजे अशावेळी वीर्याची क्षमता खूप कमी होते. ३५ वर्षीय डॉ. हदासनं याच तंत्रज्ञानाचा उपयोग केला आणि प्रियकराच्या मृत्यूनंतर तब्बल दीड वर्षांनी त्याच्या मुलाला जन्म दिला! डाॅ. हदास म्हणते, मी माझ्या प्रियकराला गमावलं, पण त्याचं मूल आता मी वाढवते आहे. त्याचा वंश मी संपू दिला नाही. हा मुलगा म्हणजे आमच्या शत्रूला दिलेलं चोख उत्तर आहे.
माणसाच्या मृत्यूनंतर वीर्यातील शुक्राणू फक्त २४ ते ३६ तास जिवंत राहतात. त्यानंतर दर तासागणिक त्यांची क्षमता सुमारे दोन टक्क्यांनी कमी होत जाते, त्यामुळे वीर्य काढण्याची आणि ते बँकेत फ्रिज करण्याची प्रक्रिया तातडीनं करावी लागते. युद्धानंतर इस्रायलमध्ये PSRची मागणी अचानक वाढली आहे. इस्रायली आरोग्य मंत्रालयाच्या मते २५० सैनिकांच्या मृत्यूनंतर त्यांचं वीर्य बँकेत जतन केलं गेलं. त्यांच्या पालकांनीच ही मागणी केली होती.
Web Summary : Israeli woman, Hadas, used posthumous sperm retrieval after her partner Netanel's death in Gaza. Court approval allowed IVF, resulting in a baby boy 1.5 years later. She says the child is a victory over their enemies and keeps his legacy alive.
Web Summary : इज़रायली महिला हदास ने गाजा में अपने साथी नेतनेल की मृत्यु के बाद मरणोपरांत शुक्राणु पुनर्प्राप्ति का उपयोग किया। अदालत की मंजूरी से आईवीएफ हुआ, जिसके परिणामस्वरूप 1.5 साल बाद एक बच्चे का जन्म हुआ। उसका कहना है कि बच्चा उनके दुश्मनों पर जीत है और उसकी विरासत को जीवित रखता है।